खाणप्रश्‍नी तोडग्यासाठी मुख्यमंत्री आज दिल्लीत

0
226

गोव्यासाठी अत्यंत डोकेदुखी ठरलेल्या खाण प्रश्‍नावर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या गट समितीची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आज नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. तद्नंतर ९ ऑगस्ट रोजी तेथूनच पर्रीकर हे आपल्या पुढील उपचारासाठी अमेरिकेकडे प्रयाण करणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आज मंगळवारी नवी दिल्लीला जाणार आहेत या वृत्ताला काल सोमवारी त्यांच्या कार्यालयाने दुजोरा दिला.

राज्यातील बंद पडलेल्या खाण उद्योगासंबंधी हल्लीच झालेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जो ठराव घेण्यात आला होता तो ठराव पर्रीकर हे केंद्रीय मंत्र्यांच्या वरील गटासमोर ठेवणार आहेत. गोवा, दमण अँड मायनिंग कन्सेशन्स (ऍबोलिशन अँड डिक्लेरेशन ऍज मायनिंग लिजेस) कायदा, १९८७ मध्ये दुरुस्ती घडवून आणावी. ज्याद्वारे गोव्यातील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवून राज्यातील खाणी २०३७ पर्यंत चालू ठेवता येतील असा ठराव सरकारने विधानसभेत घेतला होता. सदर ठराव मुख्यमंत्री पर्रीकर केंद्रीय मंत्र्यांच्या गट समितीसमोर ठेवणार आहेत.

वरील कायदा हा २० डिसेंबर १९६१ पासून नव्हे तर १३ मे १९८७ पासून लागू झाला आहे अशी कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पर्रीकर हे केंद्रीय मंत्र्यांच्या गटासमोर ठेवणार आहेत. एमएमडीआर कायदा १९५७ मध्येही दुरुस्ती करण्यात यावी ज्याद्वारे राज्यातील खाण कंपन्यांना ५० वर्षांच्या कार्यकाळाचा लाभ मिळावा अशीही गोवा सरकारच्या ठरावातून मागणी करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या गटासमोर वरील प्रस्ताव ठेवल्यानंतर पर्रीकर हे ९ ऑगस्ट रोजी अमेरिकेकडे प्रयाण करतील. तेथून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १८ किंवा १९ रोजी ते गोव्यात परततील असे सीएमओ कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.