खांडोळ्यातील महागणपती मंदिरात १० लाखांची चोरी

0
19

खांडोळा येथे महागणपती देवसस्थानात काल चोरी होऊन अंदाजे १० लाख रुपयांचा ऐवज लंपास केला गेला. मिळालेल्या माहितीनुसार काल गुरूवारी सकाळी अंदाजे ७ ते ८ च्या दरम्यान देवस्थानचे पुजारी प्रमोद भट यांचा मुलगा गणेश भट मंदिराचा दरवाजा उघडण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याला दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. लगेच त्याने आपल्या वडिलांना याबाबत सांगितले. त्यावर त्वरित प्रमोद भट यांनी देवस्थानचे अध्यक्ष प्रीतम खांडेपारकर यांच्याशी संपर्क साधला. अध्यक्ष खांडेपारकर यांनी इतर समितीच्या सदस्यांना याबाबत माहिती दिली व फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. त्यानंतर देवस्थान समिती तसेच उपनिरीक्षक सुरज काणकोणकर आपल्या फौजफाट्यासहीत घटनास्थळी उपस्थित झाले.

त्यांनी पाहणी केली असता त्यांना मंदिरातील काही चांदीची भांडी व रोख रक्कम मंदिराच्या आवारात टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. ही भांडी तसेच रक्कम चोरट्यांकडून पडली असल्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

देवस्थानच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार महागणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावरचा मुकुट, गणपतीची चांदीची प्रभावळ, हात, आका पायाचे पाऊल, अक्षयपात्र, सूर्य, चंद्र प्रतिमा, रथाचे काही साहित्य यांची चोरी झाली आहे. अजून काही वस्तूंचा सुगावा लागला नाही. अंदाजे रोख रुपये दहा हजार लंपास केले असावेत. कारण काही दिवसांपूर्वीच फेडपेटी काढण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष खांडेपारकर यांनी दिली.

पोलीस उपनिरीक्षक सूरज काणकोणकर यांनी मंदिरात जाऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास सुरू होता. मंदिरात सीसी टीव्ही आहे. त्याच्या डिस्कमध्ये फुटेज असू शकते. त्याचा शोध घेण्यात येत आहे.