खरा इतिहास मांडणे गरजेचे

0
62
  • – देवेश कडकडे

इंग्रजी लेखकांनी तर चुकीचा इतिहास लिहून महापुरुषांची बदनामी करण्याची एकही संधी सोडली नाही. हल्ली राजकारणी आपण इतिहास संशोधक असल्यासारखे या विषयी आपली मते मांडून सामाजिक वातावरण कलुषित करीत असतात ही बाब जास्त धोकादायक आहे.

सत्याचा शोध ही एक सनातन आणि अंतहीन अशी यात्रा आहे. आपली संस्कृती हीच आपल्या इतिहासाचा आधार आहे. सत्य इतिहास मांडण्यासाठी एक निष्पक्ष दृष्टिकोन ठेवून संशोधन करावे लागते. मानवाच्या प्रारंभापासून ते २१ व्या शतकापर्यंत इतिहास लेखनासंबंधी अनेक वादविवाद चालू आहेत. अनेक तारखा, कालखंड यासंबंधी जाणूनबुजुन चुका केल्या आहेत, तर काही घटनांमध्ये छेडछाड केल्याचे आढळते. जसे शिवाजी महाराजांच्या जन्मतारखे विषयी अजूनही एकमत होत नाही. कुठे काही विशेष विशिष्ट विचारधारेच्या प्रभावाने इतिहासलेखनाचा दुष्प्रभाव नव्या पिढीवर टाकला गेला आहे. एक ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ आणि दुसरे ‘धर्मनिरपेक्ष’ अशी दोन वेगवेगळी शिवाजी महाराजांची चरित्रे लिहिण्याची सध्या चढाओढ लागली आहे. इतिहास लेखकाची दृष्टी जर किंचित संकुचित असेल, तर इतिहासात त्रुटी राहणारच. आणि जर सत्य घटनांना रोचक आणि काल्पनिक गोष्टी जोडल्या तर लोक उत्सुकतेने वाचतात.

कोणत्याही राष्ट्राच्या इतिहासलेखकाने निष्पक्ष आणि राष्ट्रनिष्ठ असणे ही प्रथम अट आहे. अन्यथा हाच लेखक आपल्या इतिहास लेखनाद्वारे राष्ट्राच्या विद्ध्वंसाची मुहूर्तमेढ रोवतो. दुर्दैवाने काही भारतीय इतिहास लेखकांनी हजारो वर्षांच्या भारतीय इतिहासाचे अर्धसत्य आणि भग्न चित्र समाजापुढे मांडले आहे. त्यामुळेच २१ व्या शतकाच्या आरंभी भारताच्या इतिहासाच्या पुनर्लेखनाची मागणी जोर धरू लागली आहे. इतिहासाचे अनेक प्रकार आहेत. यात सामाजिक इतिहास, ज्यात तत्कालीन लोकांचे दैनंदिन जीवन, विचार आणि कार्य, त्यांच्या परंपरा, पूर्वज आदींविषयी अध्ययन केले जाते, तर सांस्कृतिक इतिहासाच्या अंतर्गत रितीरिवाज, शिक्षण, साहित्य, वास्तुकला, संगीत यांचे अध्ययन होते. इतिहासकारांनी इतिहास क्षेत्राचे तीन क्षेत्रांत वर्गीकरण केले आहे. प्राचीनकालीन इतिहास हा मानवाच्या प्रारंभापासून इ. स १ हजार वर्षांपर्यंत मानला जातो. मध्यकालीन इतिहास हा इ. स १ हजार पासून १८१८ पर्यंतचा काळ समजला जातो, तर इ. स १८१८ पासून वर्तमानकाळापर्यंत हा आधुनिक काळ समजला जातो.

भारतवर्षाला आदिमानवापासून इतिहास आहे. या शोधामध्ये गुहेत आदिमानवाची हत्यारे सापडतात. लेण्यांमध्ये चित्रे, पुतळे दिसतात. त्यापासून त्यांची जीवनशैली कळते. नाण्यांमधून विविध राजांच्या कालगणनांचा अंदाज येतो. शिलालेखात दान दिलेल्या जमिनीची नोंद सापडते. मंदिर उभारण्यासाठी, तलाव बांधण्यासाठी जागा यांची नोंद शिलालेखात आढळते. कधी कधी तत्कालीन राजाने दिनांकासह आपल्या पराक्रमाच्या घटना नोंदवलेल्या असतात. इतिहासाचे चित्र हे मौखिक रूपात, उत्खननातून, शिलालेख, नाणी याची सांगड घालून तयार होते. यात राजकीय इतिहास, विविध जाती – धर्म – पंथांचा इतिहास, सांस्कृतिक स्थित्यंतरे, विविध परंपरा, कलाक्षेत्रातील वेगवेगळे टप्पे, आर्थिक घडामोडी, निसर्गासंबंधी इतिहास या सर्व बाबींचा अंतर्भाव होतो. भारतात नेमके काय घडले, लोकांची स्थिती कोणत्या कालखंडात कशी होती हे जाणण्यासाठी इतिहासाचे अध्ययन आवश्यक आहे, तसेच त्यातून विचारांचा अभ्यास, तत्वज्ञानाचा इतिहास याचाही समावेश आहे. इतिहास संशोधन हे तसे सोपे नसते. हजारो वर्षांपूर्वीच्या घटनांचा मागोवा घेऊन पुराव्यांची छाननी करताना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. ज्याला इतिहास संशोधन करायचे असते, त्याला सर्व क्षेत्रांतल्या भूतकाळातील घटनांचे सुसंगत, यथार्थ आणि वस्तुनिष्ठ धागेदोरे जुळवण्याचे ज्ञान हवे असते. माणूस जरी नसला तरी त्यांनी जो भौतिक पुरावा ठेवला आहे, त्या साधनातून इतिहास संशोधनाला वाव मिळतो. हा इतिहास मनुष्याने कशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करत वर्तमान स्थिती प्राप्त केली आहे हे दर्शवतो.

लिखित साहित्य म्हणजे बखरी, पत्रे, कागदपत्रे, राजांनी दिलेली आज्ञापत्रे ही इतिहासाची साधने आहेत. काही वेळा मौखिक रूपात म्हणजे एखाद्या समाजाचा इतिहास, परंपरा आणि जीवनशैली त्या समाजाकडून समजावून घ्यावा लागतो. काही ठिकाणी उत्खननात मूर्ती सापडतात, मंदिरात सापडतात. आज इतिहास संशोधनाला नव्याने साधने उपलब्ध झालेली असल्याने नव्या संशोधनाला वाव मिळाला आहे. जग जवळ आल्याने विविध नवीन ऐतिहासिक साधने उपलब्ध होण्यास सोपे झाले आहे. संगणक, इंटरनेट, मोबाईल, फोटोग्राफी, दूरदर्शन, अनुवादाची साधने यामुळे संशोधनाचे क्षेत्र सोपे आणि आणि विस्तारलेले आहे. गतकालीन घटनांना इतिहास असा म्हणण्याचा प्रघात असला तरी जिज्ञासू संशोधकांना यात खोलात जाऊन त्याची सत्यता-असत्यता जगापुढे मांडल्याशिवाय चैन पडत नाही. अनेक इतिहासकारांनी आजपर्यंत लपवलेला खरा इतिहास जगासमोर आणला आहे. वा. सी. बेंद्रे, कमल गोखले आणि सेतू माधवराव पगडी यांनी खरा इतिहास समोर आणला नसता तर संभाजी महाराज आजही व्यसनी आणि बदफैली ठरले असते, तसेच नाना फडणवीस यांच्या दुर्गुणांचीच चर्चा झाली, परंतु ४० वर्षे नानांनी आपल्या राजकीय डावपेचांनी इंग्रजांना एकहाती थोपवून धरले तो इतिहास शिकवला जात नाही.

आपल्या जीवनात ज्या बर्‍यावाईट घटना घडतात, त्या इतिहासातून योग्य बोध न घेतल्याने. केवळ इतिहासातून धडा घेऊन सर विन्स्टन चर्चिल यांनी जर्मनी आणि जपानचा पराभव केला. काळाची पावले ओळखू न शकल्याने आणि बदल करण्याची मानसिकता नसल्याने अनेक औद्योगिक कंपन्यांचे अस्तित्व कायमचे मिटले आहे. इतिहास म्हणजे मागच्या चुकांपासून आपण शिकुन येणार्‍या आव्हानांना सामोरे जाऊन पुढे जाणे. इतिहास हा भावी पिढीचा आधार आहे. इतिहासाच्या अध्ययनाशिवाय ना आपण वर्तमान जाणू शकतो, ना भविष्याचे आकलन होऊ शकते. इतिहासातून दुसर्‍या राष्ट्रांच्या विचारधारेची ओळख होते. त्यांचे मनसुबे ओळखता येतात. जसे चीनने भारतावर ६१ साली आक्रमण केले कारण चीनचा इतिहास सदैव विस्तारवादी नीतीचा राहिला आहे, म्हणून एका राष्ट्रासाठी आवश्यक आहे भूतकाळातील चुकांमधून धडा घेऊन वर्तमानकाळात चुका टाळून भविष्यात एका सुरक्षित राष्ट्राची निर्मिती करणे. इतिहासाची उपेक्षा करणार्‍या राष्ट्राला कधीही सुरक्षित भविष्य नसते. चुकीचा इतिहास पिढी दर पिढीचे नुकसान करतो. आपल्याला जो इतिहास शिकवला जातो, त्यातील जास्त भाग इंग्रजांनी लिहिला होता. त्यामुळे आपला इतिहास काही कालखंडात सीमित राहिला गेला. भारत हा असा देश आहे ज्याला फार प्राचीन इतिहास आहे. आपले देशवासीय सीमा ओलांडून व्यापार करीत असत. विदेशी आक्रमणाचा मूळ उद्देश होता इतिहासाला दडपून टाकणे, कारण त्यांना जाणीव होती की लोक तेव्हा जागरूक होऊन लढण्यासाठी उभे ठाकतात, जेव्हा त्यांना इतिहासंबंधी गौरव आणि अभिमान वाटतो. इतिहासाचे क्षेत्र व्यापक आणि विस्तृत आहे. प्रत्येक व्यक्ती, विषय, अन्वेषण, आंदोलन या सर्व पर्वाचा इतिहास असतो. इतिहासाचा सुध्दा एक इतिहास असतो. इतिहास आमच्या विचारांच्या क्षमतेला बळकटी देतो. एका दृष्टीने पाहिले तर इतिहास विविध परिस्थितीतील मानवाच्या कार्याचे चित्र आहे जे वेळोवेळी बदलत राहते. सत्याचा शोध आणि कथन हाच इतिहासाच्या स्वरूपाचा आत्मा आहे. चुकीचा इतिहास प्रस्तुत करणे यात चित्रपट माध्यमे सतत आघाडीवर असतात. केवळ मनोरंजनासाठी सत्याशी फारकत घेऊन काल्पनिक प्रसंग घुसवले जातात. यात आपल्या महापुरुषांची बदमानी होते, याचेही भान राहत नाही. दुर्दैवाने जनता असले चित्रपट डोक्यावर घेऊन सुपरहिट बनवतात. राजकीय स्वार्थापोटी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणून काही इतिहासकार हे शास्त्र बिघडवतात. जातीवादी असलेल्या काही तथाकथित इतिहासकारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचा इतिहास लोकांच्या मनावर बिंबवला आणि आपला भोळाभाबडा समाज याला बळी पडतो. इंग्रजी लेखकांनी तर चुकीचा इतिहास लिहून महापुरुषांची बदनामी करण्याची एकही संधी सोडली नाही. हल्ली राजकारणी आपण इतिहास संशोधक असल्यासारखे या विषयी आपली मते मांडून सामाजिक वातावरण कलुषित करीत असतात ही बाब जास्त धोकादायक आहे.