खबरदारी हाच उपाय

0
129

ब्रिटनहून भारतात आलेल्या आणि कोरोनाबाधित आढळलेल्या प्रवाशांपैकी किमान सहा जणांमध्ये त्या विषाणूचे सध्या ब्रिटनमध्ये थैमान घालणारे नवे रूप आढळून आलेले असल्याचे काल भारत सरकारने अधिकृतरीत्या जाहीर केले. ताजी आकडेवारी तपासली तर असे दिसते की २५ नोव्हेंबरपासून ते ब्रिटनच्या विमानांना बंदी घातली गेली तोपर्यंत म्हणजे २३ डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून भारतातील सर्व विमानतळांवर मिळून जवळजवळ ३३ हजार प्रवासी उतरले होते. त्या सर्व प्रवाशांशी संपर्क साधण्याचे काम देशभरातील विविध राज्यांतील जिल्हा प्रशासनांकडे सोपवण्यात आले होते. आजवर त्यामध्ये ११४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता त्यापैकी किमान सहाजणांमध्ये जर त्या विषाणूचे नवे अधिक घातक रूप आढळून आलेले असेल तर त्याचा अधिक फैलाव होण्याच्या आधीच त्याला अटकाव करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणे आवश्यक ठरते. पूर्वीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत हा नवा विषाणू सत्तर टक्क्यांपर्यंत अधिक संसर्गजन्य असल्याने ही काळजी अत्यंत महत्त्वाची ठरते.
देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सर्वांत खाली आलेली असताना आणि नव्याने बाधित होण्याचे प्रमाण अवघ्या २.२५ टक्क्यांवर येऊन पोहोचलेले असतानाच ह्या नव्या रूपातील विषाणूच्या आगमनामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. सन २०२० हे जवळजवळ संपूर्ण वर्ष कोरोनाने गिळंकृत केले. अर्थव्यवस्थेला हादरे तर त्याने दिलेच, परंतु माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार्‍या आणि जीवन अर्थपूर्ण बनविणार्‍या साहित्य, संगीत, कलादी सर्व गोष्टींवर त्याने प्रहार केले. अर्थात मानवी जिद्दीने त्यावरही मात केली आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन माध्यमातून आपल्या जीवनाचे हरवलेले रंग परत आणण्याचा प्रयास केला. सुरवातीला बेफाट फैलावलेल्या कोरोनाला आटोक्यात आणण्यातही सरकारला शेवटी शेवटी यश आल्याचे दिसत असतानाच पुन्हा एका नव्या संकटाचे भयसूचक वारे – तेही नववर्ष उंबरठ्यावर येऊन उभे असताना वाहू लागले आहे.
ब्रिटनमधून येणार्‍या विमानांवर सरकारने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे, परंतु तेवढे पुरेसे नाही आणि ही बंदी वाढविली जाण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे ती वाढवली जाईल. पण केवळ ब्रिटनपुरता हा विषाणू आता राहिलेला नाही. ब्रिटनमधून नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, सिंगापूरपर्यंत अनेक देशांमध्ये या नव्या रूपातील कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे जगभरातून भारतात येणार्‍या प्रवाशांपैकी कोणामार्फत हा विषाणू अवतरेल सांगता येत नाही.
वर्षअखेर जवळ आली आहे आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देशी – विदेशी पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी गोव्याकडे धावू लागलेल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी यंदाही गोवा गाठल्याचे दिसते आहे. कोरोनाची तमा कोणाला दिसत नाही आणि आपल्या बेबंद वर्तनामुळे आपण दुसर्‍याचा जीव धोक्यात घालत आहोत याचे भानही त्यांना नसते. खरे तर गेल्या वर्षभरातील अनुभवामुळे मास्क, सॅनिटायझर, सामाजिक दूरी या सर्व गोष्टी एव्हाना आपल्या अंगवळणी पडायला हव्या होत्या. परंतु जरासा कोरोनाचा कहर कमी काय झाला, जणू सारे काही पूर्वपदावर आले अशा थाटात लग्नसोहळ्यांपासून नाताळच्या पार्ट्यांपर्यंत सारे काही बेफिकिरपणे चालले आहे. हे घातक ठरू शकते याची जाणीव पुन्हा पुन्हा करून देण्याची वेळ येते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पर्यटकांच्या संचाराला तर काही ताळतंत्रच दिसत नाही. कोरोनाच्या नव्या अधिक घातक रूपाच्या भारतातील आगमनाच्या पार्श्वभूमीवर तरी किमान सरकारने या बेबंदशाहीला आळा घालण्यासाठी अधिक जागरूकता दाखवणे आवश्यक आहे. काल केंद्रीय आरोग्य सचिवांनी तीच अपेक्षा राज्य सरकारांकडून व्यक्त केलेली आहे.
नववर्षामध्ये चांगली बातमी मिळेल असेही केंद्र सरकारने काल सूतोवाच केले. मोदी सरकारची एकूण कार्यपद्धती लक्षात घेता, भारतात सिरम इन्स्टिट्यूटच्याद्वारे निर्मिल्या जाणार्‍या ऑक्सफर्ड लशीच्या उत्पादनाला आपत्कालीन परवाना येत्या एक जानेवारीचा मुहूर्त साधून सरकार देऊ शकते. कोरोनाच्या नव्या रूपावरही या लशी गुणकारी ठरू शकत असल्याचे दावे तज्ज्ञांनी केलेले आहेत. तसे झाले तर देवच पावला, परंतु जोवर लस येत नाही, जोवर काही निश्‍चित औषध येत नाही, तोपर्यंत खबरदारी, खबरदारी आणि खबरदारी हाच कोरोना रोखण्याचा एकमेव उपाय आहे हे विसरून चालणार नाही. नव्या संकटाची जाणीव ठेवून केंद्र सरकारच्या निर्देशांबरहुकूम राज्य सरकारने तत्परतेने सर्व नववर्ष पूर्वसंध्येच्या पार्ट्यांवर कडक निर्बंध घालावेत आणि त्यांची कार्यवाही कसोशीने होईल हेही पाहावे. कोणत्याही परिस्थितीत मांगूर हिलची पुनरावृत्ती गोव्याला नको आहे.