ब्रिटनहून भारतात परतलेले सहाजण नवीन कोरोनाने बाधित

0
119

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या रुपाचा फैलाव आतापर्यंत १६ देशात पोहोचला असून या नवीन कोरोनाने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले सहा रुग्ण आढळल्याची माहिती काल भारत सरकारकडून देण्यात आली आहे.
या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहे. मात्र, दि. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या. यात ११४ प्रवासी कोरोनाबाधित आढळले असून त्यांचे नमुने देशातील १० प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांतील तीन रुग्णांमध्ये तर हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांमध्ये एकामध्ये कोरोनाचे नवे रूप आढळून आले आहे. या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्य प्रवाशांची माहिती घेण्याचेही काम सुरू केले आहे.
काही महिन्यापूर्वी ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला होता. या प्रकाराच्या प्रसाराचा वेग प्रचंड असल्याचे ब्रिटन सरकारने सांगितले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे.
भारत सरकारकडून, २३ ते ३१ डिसेंबरपर्यंत ब्रिटनवरून येणार्‍या सगळ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनवरून भारतात दाखल झालेल्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येते असून त्यानंतर रुग्णांचे नमुने कोरोनाच्या नव्या रुपाच्या चाचणीकरता पाठवले जात आहे.
कोरोनाचे हे नवे रूप प्रथम ब्रिटनमध्ये आढळले होते. त्यानंतर आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलँड, जर्मनी, कॅनडा, जपान, लॅबनन, सिंगापूर या हे रूप आढळून आले असून आता त्यात भारताचाही समावेश झाला आहे.

हवाई वहातुकीवरील
बंदी वाढण्याची शक्यता
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे ब्रिटनला जाणार्‍या विमान उड्डाणांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती आणखी काही काळ लांबू शकते, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काल दिली. यावेळी या मंत्रालयाच्यावतीने देशात लशीच्या वाहतुकीबाबतही माहिती देण्यात आली.
कोरोनाचा नवा विषाणू समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशी जे गेल्या १४ दिवसांत (९ ते २२ डिसेंबर) भारतात आले आहेत. ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणं आढळून आली असतील आणि त्यांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तर त्यांना जिनोम सिक्वेंसिंगमध्ये समाविष्ट केले जाईल असे म्हटले आहे.

लशीकरण तयारीला सुरूवात
दरम्यान, केंद्र सरकारने भारतात कोरोनाच्या लशीकरणाच्या तयारीला सुरूवात केली असून काही राज्यांत चाचणी (ड्राय रन) घेण्यात आली. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील प्रत्येकी दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना लस देण्याआधी ही चाचणी करण्यात आली. त्या राज्यांत तेथे लशीकरण सुरू करण्यासाठी निर्धारित पद्धती तपासल्या गेल्या.
या ड्राय रनमध्ये प्रथम कोणाला लस देण्यात येणार आहे हे निश्‍चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना प्रथम लस देण्यात येणार आहे. ड्राय रनमध्ये कोणाला लस दिली जाणार आहे व कणाला मिळणार नाही याचा डेटा घेतला गेला. सर्वप्रथम गंभीर आजारी असलेले लोक, आरोग्य सेवेतील कर्मचारी, कोविड योद्धे व ५० वर्षांवरील लोकांना प्रथम लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून प्रस्तावित लशीकरण योजना जानेवारीपासून सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

ब्रिटनहून आंध्रप्रदेशमध्ये
आलेली महिला बाधित
ब्रिटनहून आंध्रप्रदेशमधील राजामहेंद्रवरम इथे आलेली एक ४७ वर्षीय महिला नवीन कोरोना विषाणूमुळे बाधित झालेली आढळली. आंध्रप्रदेशच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती देताना सांगितले की, ब्रिटनहून १२ प्रवासी आले होते. त्यात ही महिलाही होती. या महिलेने पुढे रेल्वेने प्रवास केल्याचेही समोर आले आहे. या सर्वांची कोरोना चाचणी केल्यानंतर केवळ या एकाच महिलेमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली. दरम्यान, १४३२ नागरिक गेल्या काही दिवसांत ब्रिटनहून आंध्रप्रदेशमध्ये आले असून त्यातील १४०६ नागरिकांचा शोध लागलेला आहे. या सर्वांची चाचणी केलेली आहे.