26.1 C
Panjim
Friday, June 25, 2021

कौल कोणाला?

शेवटी तो क्षण येऊन ठेपला आहे! सात टप्प्यांमध्ये झालेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. तमाम मतदानोत्तर पाहण्यांनी आजचे निकाल कसे असतील याचे अंदाज वर्तवले आहेत, ते खरे मानले तर नरेंद्र मोदी पुन्हा एकवार धुँवाधार पुनरागमन करतील असे दिसते. या मतदानोत्तर पाहण्यांचे निष्कर्ष तपासले तर काही अंदाज लक्षवेधी ठरतात. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या भरभक्कम संख्याबळाचा कणा उत्तर प्रदेश ठरला होता. मात्र, यावेळी ती परिस्थिती नाही असे या पाहण्या सांगत आहेत. तेथे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आलेले असल्याने जातीपातींच्या राजकारणाने हिंदुत्वाच्या राजकारणाला शह दिल्याचे या पाहण्या सांगत आहेत. पण उत्तर प्रदेशमध्ये जरी २०१४ ची कमाल होणार नसली, तरी राजस्थान आणि मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्ष जोरदार पुनरागमन करणार असल्याची अटकळ या पाहण्यांनी व्यक्त केलेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या हिंदीभाषक राज्यांमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली होती, परंतु तरीही लोकसभेसाठी पुन्हा मोदींचीच निवड या राज्यांतील जनता करील असे ह्या पाहण्या सांगत आहेत. गुजरात हा तर नरेंद्र मोदी – अमित शहांचा बालेकिल्ला. त्यामुळे तो खिशात गेल्यात जमा आहे. उत्सुकता आहे ती महाराष्ट्राबाबत. तेथे भाजपा – सेनेचे सरकार असले तरी राज ठाकरेंनी आपल्या घणाघाती मोदीविरोधी प्रचाराचा जो सपाटा लावला होता, त्याचे खरोखरच परिणाम मतदानयंत्रांतून प्रकटणार का याबाबत उत्सुकता आहे. या वेळच्या निकालांमध्ये सर्वांत धक्कादायक निकाल पूर्व भारतामधून येतील असे अंदाजही ह्या पाहण्यांनी वर्तवलेले आहेत. विशेषतः पश्‍चिम बंगाल आणि उडिशा या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे दमदार पदार्पण होईल असे या पाहण्या सांगत आहेत आणि खरोखरच तसे घडले तर ती एक ऐतिहासिक घटना ठरेल. पश्‍चिम बंगालमध्ये या निवडणुकीदरम्यान सर्वाधिक हिंसाचार झाला. अत्यंत अटीतटीने तृणमूल कॉंग्रेस – भाजपा मुकाबला तेथे झाला. पण या निवडणुकीतून भाजपा पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलवरही मात करू शकतो असे ह्या पाहण्या सांगत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट पसरत असल्याची चर्चा गेले बरेच दिवस चालली आहे. त्याची काही कारणे त्या भागामध्ये संघटनात्मक कार्य केलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर यांनी नुकतीच एका लेखामध्ये नमूद केलेली आहेत. त्यांच्या मते पश्‍चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांचे स्थलांतर वगैरेमुळे तेथील हिंदू समाजामध्ये नाराजी आहे. त्यातच ममता बॅनर्जींचे सरकार अल्पसंख्यकांचे लांगूलचालन करीत असल्यामुळे यावेळी हिंदू मतदार भाजपाच्या साथीला जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. शेजारच्या उडिशाने गेल्या वेळी मोदी लाट पूर्वेकडे सरकण्यापासून थोपवून धरली होती. परंतु यावेळी उडिशामध्येही भाजपा शिरकाव करणार असल्याचे ह्या पाहण्या सांगत आहेत. दक्षिणेकडील राज्यांच्या संदर्भात या पाहण्यांची अनुमाने खरी मानली तर तामीळनाडूमध्ये अभाअद्रमुकची व कर्नाटकात कॉंग्रेस – जेडीएसची पीछेहाट संभवते. हे सारे मतदानोत्तर पाहण्यांचे अंदाज आहेत. ते किती खरे, किती खोटे हे आज दिसणारच आहे. बहुतेक पाहण्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २७७ ते ३५२ जागांचा अंदाज वर्तवला आहे. त्यातही भाजपाला २२७ ते २९१ जागा मिळतील असे त्या सांगतात. कॉंग्रेसच्या जागांबाबत ३८ ते ८७ असे अंदाज वर्तवले गेले आहेत. कॉंग्रेसचे संख्याबळ घटते की वाढते हे महत्त्वाचे ठरणार आहे. किमान उत्पन्नाची हमी देणार्‍या ‘न्याय’चा बोजवारा उडणार का हे पाहण्याजोगे आहे. भाजपाचे पुनरागमन २०१४ प्रमाणेच घणाघाती राहणार का आणि तसे झाले तर दुबळे विरोधक आणि प्रबळ सत्ताधारी याचा देशाच्या भवितव्यावर कोणता बरा वाईट परिणाम होईल याबाबत कुतूहल आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या झोकदार पुनरागमनाच्या वार्तांनी शेअर बाजाराने नुकतीच उसळी घेतली. देशाला या घडीला स्थिर सरकार हवे आहे. खंबीर, कणखर नेतृत्व हवे आहे. आघाड्यांची बिघाडी देशाच्या अर्थव्यवस्थेला आज परवडणारी नाही. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या राजवटीविषयी जनता पूर्ण समाधानी आहे असे नव्हे, परंतु या सरकारला आणखी पाच वर्षे द्यायला काय हरकत आहे, अशा भावनेनेच जनतेने यावेळी कौल दिलेला आहे. बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची पीछेहाट, विविध घोषित योजनांच्या प्रत्यक्ष फलश्रुतीबाबत साशंकता अशा विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांपेक्षाही राष्ट्रीय सुरक्षा, पाकिस्तानसंदर्भातील आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धची आक्रमक नीती, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, जागतिक स्तरावर भारताची उंचावलेली मान व प्रतिष्ठा अशा गोष्टींनी यावेळी जनमताला भुरळ घातलेली दिसून आली. मतदानयंत्रांमध्ये त्याचेच प्रतिबिंब पडलेले आहे का हे आता काही तासांत कळणारच आहे. देश अपेक्षा करतो आहे एका चांगल्या, कार्यक्षम, प्रामाणिक सरकारची. देशाला खरोखरच आज त्याची गरज आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

स्वातंत्र्याचा हुंकार!

बरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संध्याकाळी ठीक चार वाजता ह्या गोमंतकामध्ये एक चमत्कार घडला. एक अशी गोष्ट घडली जी कोणी कधी पाहिली...

कॉंग्रेसी सुंदोपसुंदी

कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आज गोवा दौर्‍यावर येत आहेत. राज्य विधानसभेची निवडणूक आता आठ महिन्यांवर आली असल्याने कॉंग्रेस पक्षाला त्यासाठी...

विझलेला चिराग

राजकारण हे कोणत्या थराला जाऊ शकते आणि रक्ताच्या नात्यावरही कसे मात करू शकते त्याचा दाहक प्रत्यय सध्या स्व. रामविलास पास्वान यांचे चिरंजीव...