कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता

0
3

>> शिवराज्याभिषेक दिनी वादग्रस्त स्टेटसमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; इंटरनेट सेवा बंद

शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापुरात काही अल्पवयीन मुलांनी सोशल मीडियावर लावलेल्या आक्षेपार्ह व वादग्रस्त स्टेटसमुळे काल हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंद आणि आंदोलनाला हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली कोल्हापूर बंदची हाक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाने अचानक उग्र रूप धारण केले आणि पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात एकच राडा झाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तब्बल तीन-साडेतीन तास सुरू असलेल्या प्रकारानंतर कोल्हापूर पोलिसांनी अखेर लाठीचार्ज, अश्रूधुराचा मारा करत परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कोल्हापुरातील इंटरनेट सेवा काल सायंकाळी 5 वाजल्यापासून पुढील 31 तास बंद राहणार आहे. तसेच 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.

काल संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू असताना कोल्हापुरात मात्र काही अल्पवयीन युवकांनी दोन समजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे वादग्रस्त स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्यामुळे कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. मंगळवारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत संशयितांना अटक करावी, अशी मागणी केली. तर काही ठिकाणी तोडफोड देखील करण्यात आली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूर बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेल्या मुलांवर त्वरित कारवाई करावी, तसेच हिंदू समाजातील कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत आणि अटक केलेल्या कार्यकर्त्यांना सोडावे, अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक कार्यकर्ते पुढे येण्यास सुरूवात केली आणि एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त झालेल्या तरुणांनी शिवाजी चौकातून बिंदु चौकाकडे जाऊन दगडफेक करत तोडफोड करण्यास सुरूवात केली, तर कोल्हापूर पोलिसांनी ही बळाचा वापर करत गर्दी पांगवली.

याच वेळी महानगरपालिकेच्या दिशेने दुसरा एक मोठा गट आला आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनीही लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वातावरण अचानक बिघडत असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले, मात्र आक्रमक झालेल्या तरुणांनी दगडफेक करत तोडफोड करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनीही लाठीचार्ज केला, तर काही ठिकाणी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. साधारण 11.30 वाजता सुरू झालेला हा गोंधळ दुपारी 2.30 वाजेपर्यंत सुरू होता. सध्या77 परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले असले, तरी शहरात तणावपूर्ण शांतता कोल्हापुरात दिसून येत आहे. चौकाचौकात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.