राज्यातील कोविड बाधितांची संख्या बघता बघताशंभरवर जाऊन पोहोचली आहे. आठ – दहा दिवसांपूर्वी आपल्याकडे कोविडचे एक – दोन रुग्णच आढळत असत, परंतु आता त्यात झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. एकूणच देशभरात कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशात सध्या सहा हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत आणि त्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांत आपल्या शेजारचे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचा समावेश होतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. कोरोनाने सध्या देशात दरदिवशी एक हजारांच्या वर नवे रुग्ण आढळू लागले आहेत. परवा रविवार असल्याने ही संख्या काल नऊशेवर स्थिरावली होती, परंतु ती वाढण्याची चिन्हे आहेत. दिवसाला सरासरी एक हजार रुग्ण सापडण्याचा प्रकार यापूर्वी नोव्हेंबरच्या सुरवातीच्या आठवड्यातच दिसून आला होता. म्हणजेच जवळजवळ चार साडेचार महिन्यांनी देशात कोरोना वाढू लागला आहे असा याचा अर्थ होतो. ही वाढती रुग्णसंख्या एखाद्या नव्या लाटेत परिवर्तित होणार का आणि पुन्हा लॉकडाऊन करण्याजोगी स्थिती निर्माण होणार का हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु धाकधूक निश्चितच वाढली आहे. गेले काही महिने कोरोना जणूकाही अस्तित्वातच नाही अशा बेफिकिरीने जनजीवन स्थिरावले होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या लाटांत जशी प्राणहानी झाली, तशी पुढे न झाल्याने आणि सार्वत्रिक लसीकरणामुळे त्याविषयीची भीतीही कमी झाली आणि त्याच बरोबरीने बेफिकिरीही वाढली. आपण आजवर एवढी काळजी घेतली, पण तरीही कोरोना झालाच ना, असा सवाल अनेकजण करताना दिसतात आणि मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन आदी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करतात. देशात सर्वांचे लसीकरण झाले आहे हे जरी खरे असले, तरी त्याला आता दोन वर्षांचा काळ उलटला आहे. लसीकरणाचा बूस्टर डोस मात्र मोजक्याच लोकांनी घेतला आहे. त्यामुळे लसीकरणातून निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती आज नागरिकांमध्ये कितपत उरली आहे हे स्पष्ट नाही. कोरोनाचा विषाणू नवनवे रूप घेऊन संसर्ग करीत असतो. सध्या देशात झपाट्याने वाढणारा संसर्ग हा त्याच्या एक्सबीबी.1.16 या प्रकाराचा असल्याचे सांगितले जात आहे. याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो, मात्र, इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाण सध्या तरी कमी दिसते आहे. तरीदेखील छोटी मुले, ज्येष्ठ नागरिक, मधुमेही, ह्रदयविकार किंवा मूत्रपिंड विकार असलेले रुग्ण, अवयव हस्तांतरण झाल्याने प्रतिकारशक्ती खालावलेले रुग्ण आदींना कोरोनामुळे मोठा धोका संभवतो. त्यामुळे या गटाने अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारने केलेले आहे. केंद्र सरकारने दिशानिर्देश जारी केले आहेत. त्याला अनुसरून राज्य सरकारही निर्देश जारी करील. परंतु केवळ कागदोपत्री इशारे दिल्याने सरकारची जबाबदारी संपत नाही. कोरोना आणि एच3एन2 पुन्हा फैलावू नये यासाठी तातडीच्या उपाययोजना आवश्यक आहेत. रेल्वेस्थानके, बसस्थानके, विमानतळ अशा ठिकाणी चाचण्या पुन्हा सुरू कराव्या लागतील. शाळा, महाविद्यालये, कार्यालये, आस्थापने, दुकाने आदी ठिकाणी पुन्हा कोविड नियम पाळले जातील हे पाहावे लागेल. सगळे काही परमेश्वरावर सोडून देता येणार नाही.
कोरोनाच्या जोडीने देशात सध्या एच3एन2 तापाची साथही जोरात आहे. कोरोना आणि एच3एन2 ची बाह्य शारीरिक लक्षणे अगदी सारखीच असतात. नाक वाहणे, खोकला येणे, श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे आणि ताप येणे ही सामान्य सर्दीसारखीच लक्षणे असल्याने हा साधा सर्दी ताप आहे की एच3एन2 आहे की कोरोना हे कळणे दुरापास्त झाले आहे. यातून न्युमोनिया किंवा एआरडीएससारखी स्थिती उद्भवू शकत असल्याने अजिबात हयगय न करता वेळीच उपचार होणे गरजेचे ठरते. सध्याची देशातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने सार्वजनिक ठिकाणी कोविड नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जारी करून त्यांची अंमलबजावणी होईल हे तातडीने पाहिले पाहिजे. नागरिकांनीही स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्यावी लागेल. कोरोनाने एवढा कहर आजवर करूनही किमान शिंकता – खोकताना आपल्या तोंडावर रूमाल धरण्याची साधी मूलभूत बाबही आपल्याकडे लोक पाळत नाहीत. प्रत्येकाने ही किमान खबरदारी घेतली, तरीही कोरोना किंवा एच3एन2 फैलावू शकणार नाही, कारण या दोन्हींचे विषाणू अशा प्रकारे हवेतून फैलावतात. तरीही जर बेफिकिरी सुरू राहणार असेल, तर आपला बचाव अशक्य ठरेल. घरात आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य काळजी घेतली गेली तर कोरोनाची ही लाटही येता येता ओसरून जाईल. ती भयावह स्थितीला पोहोचण्यापासून रोखता येईल.