>> कोरोना आढावा बैठकीनंतर पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन; देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 7 हजारांच्या वर
मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 1134 नवीन रुग्ण आढळले, तर 5 जणांचा मृत्यू झाला. 1 हजारांच्या वर नवे रुग्ण आढळल्यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 7026 च्या वर पोहोचली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना आणि एच3एन2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पंतप्रधानांनी जनतेला सार्वजनिक ठिकाणी कोविडविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल उपस्थित होते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजीव गौबा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जगभरातील कोविड-19 ची परिस्थिती आणि भारतातील वाढती प्रकरणे समाविष्ट करून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सचिवांनी एक व्यापक सादरीकरण केले. या सादरीकरणात पंतप्रधानांना माहिती देण्यात आली की, 22 मार्च 2023 रोजीपर्यंत भारतात नवीन प्रकरणांमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. दररोज सरासरी 888 प्रकरणे आणि साप्ताहिक संसर्ग दर 0.98 टक्के नोंदवला गेला आहे. या आठवड्यात जागतिक स्तरावर दररोज सरासरी 1.08 लाख कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेषत: गेल्या काही महिन्यांत एच1एन1 आणि एच3एन2 च्या मोठ्या संख्येने आढळलेल्या रुग्णांच्या संदर्भात पंतप्रधानांना अवगत करण्यात आले.
24 तासांत 662 रुग्ण कोरोनामुक्त
देशात मागील 24 तासांत 662 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील 3 राज्यांमध्ये गेल्या 24 तासांत 100 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात 280 रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर 1489 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुजरातमध्ये 176 रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला. 916 जणांवर उपचार सुरू आहेत. केरळमध्ये 113 रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला, तर 1025 जणांवर उपचार सुरू आहेत.
4.46 कोटींहून अधिक रुग्ण
कोविड रुग्णांमध्ये अचानक वाढ होण्याबरोबरच एच3एन2 विषाणूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे देशात आतापर्यंत 10 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे, देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारी 2020 रोजी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता, तेव्हापासून आतापर्यंत देशात 4.46 कोटींहून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. 5 लाखांहून जणांंचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधानांकडून महत्त्वाचे निर्देश
जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांसह सकारात्मक नमुन्यांचे संपूर्ण जीनोम अनुक्रम वाढवण्याचे निर्देश.
रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी या दोघांनीही रुग्णालयाच्या आवारात मास्क घालण्यासह कोविड नियम पाळावेत.
ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा.
कोविड-19 साठी आवश्यक औषधे आणि सुविधांची उपलब्धता निश्चित करा.
रुग्णालये सर्व अत्यावश्यक परिस्थितींसाठी तयार आहेत, याच्या खात्रीसाठी नियमित मॉक ड्रील आयोजित करा.
राज्यात 24 तासांत नवे 23 रुग्ण
पणजी (न. प्र.) : राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण मिळण्याचे प्रमाण कायम असून, गेल्या 24 तासांत 377 जणांची चाचणी करण्यात आली असता, त्यापैकी 23 जणांना कोविडची लागणी झाली असल्याचे आढळून आले. हे 23 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 98.40 टक्के एवढे आहे. गेल्या 24 तासात रोगमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 11 एवढी आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या ही 137 एवढी आहे. गेल्या 24 तासांत एकाही रुग्णाला इस्पितळात दाखल करण्यात आलेले नाही.