कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गट नेतेपदी युरी आलेमाव

0
8

>> दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून आदेश जारी

कॉंग्रेस पक्षाने कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार युरी आलेमाव यांची काल एका आदेशाद्वारे कॉंग्रेस विधिमंडळ गट नेतेपदी निवड केली. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांतच विरोधी पक्षनेते बनणारे ते कॉंग्रेसचे दुसरे आमदार ठरले आहेत. काल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी त्यांच्या निवडीचा आदेश काढला.

विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्षाने मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती; मात्र लोबो यांनी दिगंबर कामत यांच्यासह आठ आमदारांचा एक गट तयार करून पक्षातून फुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर पक्षाने त्यांची विरोधी पक्षनेता पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच त्यांच्यावर व दिगंबर कामत यांच्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्रता याचिकाही सभापती रमेश तवडकर यांच्याकडे दाखल केली होती. त्यामुळे गेल्या जुलै महिन्यापासून गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते.

पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर १४ सप्टेंबरला मायकल लोबो, दिगंबर कामत यांच्यासह आठ कॉंग्रेस आमदारांनी कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता कॉंग्रेस पक्षात केवळ तीनच आमदार उरले असून, त्यात युरी आलेमाव, कार्लूस फेरेरा व एल्टन डिकॉस्टा यांचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर काल पक्षाने युरी आलेमाव यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली.