कॉंग्रेस जोडो!

0
36

तब्बल १५० दिवस म्हणजे पाच महिने चालणार असलेली आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणारी साडे तीन हजार किलोमीटरची राहुल गांधींची महत्त्वाकांक्षी ‘भारत जोडो’ यात्रा कालपासून सुरू झाली. पक्षाच्या ध्वजाऐवजी ‘तिरंगा’ घेऊन निघालेली ही यात्रा जरी बिगरराजकीय आणि केवळ ‘धर्मनिरपेक्ष भारताला जोडण्यासाठी’ असल्याचे सांगितले जात असले, तरी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ती पद्धतशीरपणे आखली गेली आहे हे उघड आहे. बारा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून जाणार असलेल्या या यात्रेचा मार्ग आणि एकूण कार्यक्रम जरी पाहिला तरी भारत जोडण्यापेक्षा कॉंग्रेसच्या पुनरूज्जीवनाचे स्वप्नाळू उद्दिष्ट स्पष्टपणे जाणवते.
सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे या यात्रेतून दक्षिण भारतामध्ये कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचा जोरदार प्रयत्न केला जाणार आहे असे दिसते. काल या यात्रेच्या शुभारंभासाठी कॉंग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान आणि छत्तीसगढ या दोन राज्यांचे मुख्यमंत्री जसे होते, तसेच कॉंग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुकचे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टालीनही होते. ‘तिरंग्या’ खाली सर्व समविचारी पक्ष व संघटनांना सामावून घेण्याचा मनोदय राहुल यांनी व्यक्त केलेलाच आहे. त्यामुळे या यात्रेत कोणकोण राहुल यांना सामील होतात हे पाहावे लागेल.
दक्षिण भारतात या यात्रेचा मुक्काम सर्वाधिक काळ राहणार आहे असेही दिसते. अशा प्रकारच्या पदयात्रांना दक्षिणेत प्रतिसादही मोठा लाभत असतो, हे एन. टी. रामारावांच्या चैतन्यरथ यात्रेपासून जगन्मोहन रेड्डींच्या कडाप्पा – श्रीकाकुलम प्रजासंकल्प यात्रेपर्यंतचा इतिहास सांगतो. भाजपचा प्रभाव मुख्यत्वे उत्तर भारत आणि पश्‍चिमी राज्यांत आणि अलीकडे ईशान्येत आसाममध्ये दिसून येतो. दाक्षिणात्य राज्यांमध्ये जंग जंग पछाडूनही कर्नाटक वगळता भाजपाला फारसा वाव मिळू शकलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेस आपली दक्षिण भारतीय मतपेढी बळकट करण्याचा प्रयत्न या यात्रेतून करणार आहे हेही यामुळे कळून चुकते. यात्रेचा मार्ग पाहिला तर भारताच्या मधोमध उभा मार्ग आखला गेलेला आहे. त्यामुळे गोव्याकडे ही यात्रा फिरकणार नाही. बळ्ळारीपर्यंत आल्यावर रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव, जामोदमार्गे मध्य प्रदेशाकडे जाईल. आपल्या पक्षाची किंवा आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आणि दाक्षिणात्य राज्यांतील पक्षकार्य बळकट करण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे होईल. केरळमध्ये १८ दिवस, कर्नाटकात २१ दिवस असे यात्रेचे नियोजन बोलके आहे. अर्थात, कॉंग्रेस पक्षातील टोकाला पोहोचलेली अंतर्गत बेदिली, गुलाम नबी आझादांनी ‘आधी कॉंग्रेस जोडा’ असा दिलेला घरचा अहेर, पक्षाच्या तोंडावर असलेल्या संघटनात्मक निवडणुका या सार्‍या पार्श्‍वभूमीवर राहुल यांची ही यात्रा निघाली आहे. देश जोडायला निघालेले राहुल किंवा अन्य पदयात्री जवळजवळ पाच महिने चालणार्‍या या यात्रेत कुठेही हॉटेलमध्ये राहणार नाहीत, तर यात्रेसोबतच्या वातानुकूलित कंटेनरांमध्येच राहतील असे नियोजन आहे. या कंटेनरांना ‘रथा’चे स्वरूप येऊ नये आणि भाजपच्या रथयात्रांशी तुलना होऊ नये याची विशेष काळजी पक्षाने घेतलेली दिसते. पण देश जोडण्यासाठी निघणार्‍यांनी त्यासाठी मुळात देशाच्या जनतेमध्ये मिसळावे लागते, त्या त्या भागाची संस्कृती समजावून घ्यावी लागते, गाव, घर, वाड्या वस्त्या प्रत्यक्ष अनुभवाव्या लागतात, स्थानिक पाहुणचार घ्यावा लागतो, स्थानिक अन्नपदार्थ चाखावे लागतात. स्थानिक नेत्यांशी आणि तळागाळातील आपल्या कार्यकर्त्यांशी जिवाभावाचे नाते जोडावे लागते. ह्या सगळ्याला फाटा देऊन प्रसिद्धीच्या सार्‍या लवाजम्यानिशी वातानुकूलित कंटेनरांमध्ये वास्तव्य करून पदयात्रेचा हा कार्यक्रम आखला गेला आहे. राहुल गांधी यात किती सातत्य राखतात, पाच महिने खरोखरच ते यात्रेसोबत राहू शकतात का हे पाहणे खरोखर त्यांचे आजवरचे ‘हिट अँड रन’ राजकारण पाहता औत्सुक्याचे आहे. यात्रेतून ते मध्येच गायब झाले तरी आश्‍चर्य वाटू नये. कॉंग्रेस पक्ष आज अस्तित्वाची लढाई लढतो आहे. राज्याराज्यांतून जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजवर गांधी घराण्यापुढे चवर्‍या ढाळणारी पक्षातील जुनी जाणती मंडळी राहुल यांनाच लक्ष्य करून बाहेरचा रस्ता धरून चालती झाली आहेत. अशावेळी ही यात्रा निघाली आहे. पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवडणूक जाहीर झाली आहे. पक्षाला नवसंजीवनी द्यायला निघालेले राहुल पक्षाध्यक्षपद स्वीकारायला मात्र अजूनही कां कू करीत आहेत. ही यात्रा पक्षाला कितपत नवसंजीवनी देऊ शकते, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर किती शिक्कामोर्तब करते हे दिसेलच, परंतु स्वतः राहुल पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी कितपत गंभीर आहेत हे देखील प्रामुख्याने ही यात्रा सांगणार आहे!