गोव्यातील कॉंग्रेसमधून झालेल्या दहा जणांच्या घाऊक पक्षांतरामुळे भारतीय जनता पक्षाची आम जनतेमध्ये सध्या केवळ छीःथू चाललेली दिसते. भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही पक्षाचा हा निर्णय रुचलेला नाही. जी मंडळी भाजपाच्या आसर्याला आलेली आहेत, ती पक्षाच्या विचारधारेकडे, मोदींकडे वा मुख्यमंत्र्यांकडे आकृष्ट होऊन आलेली नाहीत. त्यांना केवळ सत्ता हवी आहे म्हणून स्वतःच्या फायद्यासाठीच ते आलेले आहेत. कॉंग्रेस विधिमंडळ गटाचे नेते बाबू कवळेकर हे त्यांच्यामध्ये जरी असले तरी बाबूश मोन्सेर्रात हे या गटाचे खरे नेते आहेत. अत्यंत धोरणीपणाने त्यांची पावले पडत आहेत. गोवा फॉरवर्डचा त्याग करून ते कॉंग्रेसच्या तिकिटावर पणजीत उभे राहिले, तेव्हाच त्यांचे पुढील इरादे स्पष्ट झालेले होते. विनय तेंडुलकर वारंवार कॉंग्रेसचे अमूक आमदार आमच्यात येणार असे ज्यांच्याविषयी सांगत होते, त्यांचा पक्षप्रवेश दोन तृतीयांशची संख्या होईपर्यंत खोळंबला होता. बाबुश यांनी आपल्या गटाच्या पाचजणांचा टेकू लावताच दोन तृतीयांशचे बलाबल गाठले गेले आणि पक्षांतरबंदी कायद्यातून पळवाट मिळाल्याने हे घाऊक पक्षांतर घडून आले. पोटनिवडणुकांना सामोरे जावे लागले तर खैर नाही याचे भान या बंडवाल्यांना होते. भाजपाच्या वतीने मंत्रिपदाचे इच्छुक मायकल लोबो यांनी या गटाच्या पक्षप्रवेशासाठी रदबदली केल्याचे दिसते आहे. आपण या सगळ्यांना घेऊन आलो तर आपल्याला मंत्रिपद अपरिहार्यपणे द्यावे लागेल या विचारानेच त्यांनीही ही मध्यस्थी केलेली आहेे. म्हणजेच केवळ स्वार्थ हाच या पक्षांतराचा पाया आहे. आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे भाजपाला या लोकांना सामावून घ्यायची गरज काय होती? सरकारचे स्थैर्य म्हणावे तर ते कधीच धोक्यात नव्हते. मगोवर सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर तर तो प्रश्नच मिटला होता आणि लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या केंद्रातील यशानंतर तर विजय सरदेसाईंची वळवळही थांबली होती. त्यामुळे स्थैर्यासाठी या दहाजणांना प्रवेश दिला आहे हे पटणारे नाही. त्यांच्या येण्याने सरकार भक्कम झाले असे म्हणणे तर फसवेच आहे. कॉंग्रेसची नाचक्की हा त्यामागील एक उद्देश असू शकतो, कारण या घाऊक पक्षांतराचे पडसाद राष्ट्रीय पातळीवरही उमटले आहेत, परंतु त्यातून खुद्द भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याचे काय? भाजपाला आज धर्मशाळेची अवकळा आलेली आहे. पक्षजनांना हा निर्णय मुळीच रुचलेला नाही, फक्त सद्यस्थितीत त्याविरुद्ध ब्र काढण्याची त्यांची प्राज्ञा नाही. या दहाजणांच्या आगमनामुळे आजवर दूर राहिलेल्या सालसेतमध्ये पक्ष भक्कम झाला आहे असे म्हणावे आणि तीन मतदारसंघ वगळता सर्व सालसेत भाजपमय झाल्याचे दिसत असले, तरी तेथे पक्ष रुजण्यास त्याचा काहीही फायदा संभवत नाही. अन्य मतदारसंघांमध्ये तर भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा पराभव करून जे निवडून आले तेच आता पक्षात आलेले असल्याने मूळच्या पक्ष कार्यकर्त्यांचे काय हा प्रश्न आहेच. पणजी, ताळगावचेच उदाहरण बोलके आहे. सिद्धार्थ, दत्तप्रसाद यांनी आता काय करायचे? ज्या प्रवृत्तींनी या निमित्ताने सत्ताधारी पक्षात शिरकाव केलेला आहे, त्यांची विस्तारवादी वृत्ती पाहिली, तर हे भस्मासुर एक ना एक दिवस पक्षाला डोईजड झाल्याविना राहणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ समजावी. सध्या भाजपच्या २७ आमदारांपैकी १५ ख्रिस्ती आमदार आहेत. काल म्हटल्याप्रमाणे एक बलवान ख्रिस्ती लॉबी त्यातून तयार झालेली आहे. उद्या सगळे ख्रिस्ती आमदार एकत्र येऊन त्यांनी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध बंड पुकारून आम्हाला ख्रिस्ती मुख्यमंत्रीच हवा अशी नेतृत्वबदलाची मागणी केली तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एक ना एक दिवस हे घडणारच आहे. या दहाजणांपैकी काहींविरुद्ध गंभीर प्रकरणे आहेत. जमीन व्यवहारापासून बलात्कारापर्यंतच्या त्यांच्या फायली आता भाजपा सरकार ते डोके वर काढीपर्यंत बासनात गुंडाळून ठेवणार आहेत काय? या दहाजणांच्या घाऊक पक्षांतराने आज भाजपाच पूर्ण कॉंग्रेसमय झाल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. हे पक्षाची आजवरची प्रतिमा डागाळणारे आहे. कुठे आहे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे ते समर्पित कार्यकर्ते? कुठे गेली विचारधारा? देश कॉंग्रेसमुक्त करण्याच्या नादात भाजपाच कॉंग्रेसयुक्त करण्याकडे पक्षाची ही वाटचाल चालली आहे. गोवा भाजपच्या बाबतीत तर पाहुण्यांनी आत येऊन घरच बळकावावे तसा प्रकार झाला आहे! भाजपा नेतृत्वाने एक गोष्ट विसरू नये. कोणत्याही गोष्टीला अंत हा असतोच असतो. सत्ता कधीच शाश्वत नसते. चिरंतन काळासाठी ती मिळालेली नसते. उद्या पुन्हा एकदा मतदारांना सामोरे जायचे आहे! सध्या भाजपा विधिमंडळ गट म्हणजे नुसता मासळी बाजार झालेला आहे! सत्तेच्या गुळाला मुंगळे चिकटावेत तसे लोक पक्षाला येऊन चिकटत आहेत. भाजपामध्ये सध्या जे चालले आहे, त्याविषयी जनतेच्या मनात केवळ नाराजी आणि नाराजीच आहे. त्याची जाणीव नेत्यांना ठेवावी लागेल आणि पुढील निवडणुकीत परिणाम भोगण्यासही तयार राहावे लागेल!