- डॉ. मनाली महेश पवार
कॅन्सरच्या उपचारादरम्यान मानसिक स्थिती सकारात्मक असावी. ‘मी लढेन, मी हार मानणार नाही. माझ्या शरीरावर माझं प्रेम आहे आणि मी बरा होऊ शकतो!’ अशी मनःस्थिती ठेवावी. सकारात्मक विचार, ध्यान आणि आधार देणारे कुटुंब, मित्र यामुळे तणाव कमी होतो. रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत होते आणि उपचारांचा परिणाम चांगला होतो. मुळात कॅन्सर हा आजार न म्हणता ती एक शरीरातील स्थिती आहे असे म्हणता येईल.
एक गृहिणी, साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वी सारखं पोटात दुखतं ही तक्रार घेऊन दवाखान्यात यायची. ॲसिडिटी, अपचन, मलावरोध, इन्फेक्शन इत्यादी निदान करत औषधोपचार झाले. मग काही तपासण्या झाल्या. रक्ताच्या तपासण्या, सोनोग्राफी, कोलोनोस्कोपी इत्यादी तपासण्यांदरम्यान आतड्यामध्ये गाठ सापडली. पुढच्या तपासणीत ही गाठ कॅन्सरची आहे हे सिद्ध झाले. गृहिणी गावात राहणारी. शाकाहारी. फास्टफूडचा संबंध नव्हता. घरात-शेतात काम करणारी व निर्व्यसनी. मग तिला कॅन्सर का व कसा झाला? हा विचार बरेच दिवस मला अस्वस्थ करीत राहिला. कालांतराने या गोष्टीचा विसरही पडला.
आता या साताठ वर्षांत कॅन्सरचे प्रमाण वाढत असलेले दिसते. लहान मुले, युवापिढी, प्रौढ, वृद्ध सारेच या कॅन्सरचे शिकार होत आहेत. शहराप्रमाणे गावातही कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. ‘या पाच गोष्टी दररोज खा- कधीच कन्सर होणार नाही’ किंवा ‘या दहा गोष्टी अजिबात खाऊ नका- याने हमखास कॅन्सर होतो’ अशा प्रकारचे मिथक सांगणारे बरेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत, आणि यातून सर्वसामान्यांमध्ये कॅन्सरबाबत जागृती होण्यापेक्षा समज-गैरसमज वाढत आहेत. पूर्वी तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा व फार फार तर फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे ऐकिवात यायचे व सगळीकडे तोंडाच्या कॅन्सरची चित्रे पाहायला मिळायची. खरे तर कॅन्सर हा शरीरातील प्रत्येक अवयवाला होऊ शकतो. फक्त नखे व केस सोडल्यास, संपूर्ण शरीर- त्वचा, रक्त, मस्तिष्काचाही यात समावेश असतो. कॅन्सर हा साधारण पाच हजार वर्षांपासूनचा जुना आजार आहे. फक्त त्याची प्रमाणाबाहेर वाढ हल्लीच्या काळात निदर्शनास येत आहे.
कॅन्सर म्हणजे काय?
शरीराचा अगदी प्राथमिक घटक म्हणजे पेशी. पेशींचे विभाजन होऊन त्यांची संख्या वाढत असते. या संख्यावाढीमुळे अवयवाची वाढ होते. मात्र या सर्व पेशींची वाढ ठरलेल्या ठिकाणापुरती मर्यादित असते. उदा. जठराच्या पेशी फुफ्फुसात वाढणार नाहीत. मात्र कर्करोगात या नियमाचे उल्लंघन होते. एक म्हणजे पेशींची संख्या गरजेपेक्षा जास्त वाढते व तिथून सुटलेल्या कर्कपेशी शरीरात कोठेही रुजून वाढू शकतात. ही कॅन्सरची मूळ घटना आहे.
पेशींच्या वाढीच्या मर्यादा, संख्यावाढीच्या मर्यादा, स्थानाच्या मर्यादा इत्यादी या पेशीकेंद्रात गुणसूत्रांच्या स्वरूपात उरलेल्या असतात. यात बदल झाले की गुणधर्मातही बदल होतात. पेशींची संख्या, आकारमान, स्थान इत्यादी बंधने सैल करणारे बदल घडले की कॅन्सरची शक्यता निर्माण तयार होते. समजा एखाद्या पेशीत (उदा. जिभेवरच्या एका पेशीत) असा बदल झाला तर त्या पेशीचे पुढे विभाजन होताना संख्या, आकारमान वाढत जाईल. त्यातून तयार होणाऱ्या सर्व पेशी अशाच स्वैर असतील. हळूहळू त्या ठिकाणी एखादी गाठ तयार होईल. गाठीच्या काही भागास रक्तपुरवठा न झाल्याने किंवा घर्षणाने त्याचा काही भाग मरून त्या ठिकाणी व्रण किंवा खड्डा तयार होईल. पण उरलेल्या पेशी मात्र वाढत राहतील. अतिरिक्त पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा आजार म्हणजे कॅन्सर.
मुळात कॅन्सर हा आजार न म्हणता ती एक शरीरातील स्थिती आहे असे म्हणता येईल. आज कॅन्सरचे 200 हून अधिक प्रकार माहीत आहेत. तोंडाचा, फुफ्फुसाचा, स्तन व प्रोस्टेटचा कॅन्सर जास्त प्रमाणात पसरत आहे. पुरुषांप्रमाणे स्त्रिया व तरुणपिढीही तेवढीच कॅन्सरला बळी पडत आहे.
कॅन्सर होण्याची कारणे काय?
नैसर्गिकपणे आपल्या शरीरात नेहमीच थोड्या-थोड्या प्रमाणात कॅन्सरच्या पेशी सतत तयार होत असतात. त्यातील बऱ्याच पेशी या आपोआपच नष्ट होऊन जातात. परंतु काही शिल्लक राहतात.
- बदललेली पाश्चिमात्त्य जीवनशैली (आहारपद्धती), व्यायामाचा अभाव व सतत ताणतणावात राहणे ही कॅन्सर बळावण्याची मुख्य कारणे आहेत.
- पाश्चिमात्त्य खाद्यसंस्कृती म्हणजे फास्ट फूड, जंक फूड, पॅकेटबंद खाणं, रेडी टू यूज खाणं, कच्च्या अन्नाचं सेवन (अग्निसंस्कार न देता), सारखे एकाच प्रकारचं चटपटीत खाणं, अमर्याद खाणं, अवेळी-अयोग्य वेळी खाणं इत्यादी.
- भारतापेक्षा अन्य पाश्चिमात्त्य देशांत कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. उदा. जपानचा विचार केला तर तिथे अन्ननलिका किंवा जठराचा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो. कारण त्यांची ‘स्मोक्ड फूड’ खाण्याची पद्धत आहे. म्हणजे मांस किंवा मासे यांना फक्त मीठ चोळतात व त्यांना स्मोक देतात व त्यावर शिजवतात आणि खातात. याचाच अर्थ जास्त प्रमाणात मिठाचे सेवन व पूर्ण मांस न शिजवता खाणे. या अशा प्रकारचे खाणे हे कॅन्सर बळावण्यास कारणीभूत ठरते.
- अग्निसंस्कार न देता म्हणजेच व्यवस्थित न शिजवता खाणे. ओव्हन- मायक्रोव्हेव, तसेच प्लास्टिकचा अतिवापर.
- त्याचप्रमाणे तुम्ही खाद्यपदार्थ कुठे साठवता व कसे साठवता यालाही महत्त्व आहे. काही वर्षांपूर्वी लिव्हर कॅन्सरचे प्रमाण वाढले होते. त्याला कारण- अन्नधान्य ज्यात साठवले जाते ते योग्य प्रकारे न ठेवल्याने त्याला बुरशी येते व या अन्नाचे सेवन झाल्याने लिव्हरच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते.
- ठरावीक रासायनिक पदार्थांशी संपर्क येणे. उदा. रंगात वापरली जाणारी काही रसायने, डांबरापासून बनवलेली काही रसायने, काजळी (उदा. कारखान्यांच्या धुराड्यांमधून बाहेर पडणारी काजळी), ऍसबेस्टॉस, पेट्रोलियमच्या ज्वलनानंतर तयार झालेले वायू, सिगारेट किंवा विडीमधील निकोटिन इत्यादी.
- किरणोत्सर्गी पदार्थ म्हणजे अणुविभाजन झाल्यानंतर तयार होणारे ऊर्जाभारित किरण. यामुळे पेशीकेंद्रात निश्चितच बदल झालेला दिसून येतो. अणुभट्ट्या आणि अणुविभाजन या प्रक्रियांमध्ये समाविष्ट असणाऱ्या व अशा प्रकारच्या कारखान्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना व कामगारांना विशिष्ट प्रकारचे कॅन्सर जास्त प्रमाणात होतात. ज्यावेळी जपानमध्ये अणुबॉम्ब टाकण्यात आला, त्यानंतर तेथील लक्षावधी लोकांना व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनादेखील अनेक प्रकारचे कॅन्सर झाले. हे आजपर्यंतचे कॅन्सरचे सर्वात मोठे व भयानक उदाहरण आहे.
- एखाद्या जागी सतत घर्षण होते. जर त्वचेवर एखाद्या ठिकाणी सतत घर्षण होत असेल किंवा अन्य कोणताही त्रास (उदा. उष्णता) होत असल्यास काही जणांना त्या ठिकाणचा कॅन्सर होतो.
- आपल्या भारतात तंबाखू-चुन्याची गोळी तोंडात धरण्याची खूप जुनी पद्धत आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे विशिष्ट जागी कॅन्सर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
- दारू व तंबाखू यांचा कॅन्सरशी डायरेक्ट संबंध आहे. दारूच्या सेवनामुळे लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता असते, तर धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. गुटखा खाण्यामुळे तोंडाचा कॅन्सर होतो.
- अधिक प्रमाणात बाळंतपणं झालेल्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर होतो. वारंवार बाळंतपणं झाल्यामुळं जखमा होतात. परंतु त्याबरोबरच अस्वच्छता हेही एक खूप मोठे कारण आहे. पॅपिलोमा नावाच्या विषाणूशी याचा संबंध आहे.
- एच पायलोरी नावाचा जो जंतू असतो तो जठरव्रणास कारणीभूत असतो. या जंतूमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.
- वातावरणातील प्रदूषण म्हणजे दूषित हवा व अशुद्ध पाणी याही गोष्टी कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकतात.
- 3 ते 4 टक्के प्रमाण हे अनुवांशिक असू शकते. जेनेटिक म्युटेशनमध्ये बदल होऊन तेच पुढे पुढच्या पिढीत जाऊ शकते.
- भीती हेदेखील कॅन्सरचे मुख्य कारण आहे. माझ्या आईला कॅन्सर होता, मलाही कॅन्सर होणारच, ही भावनादेखील विचार दृढ बनवतात व हे प्रकट करणेदेखील कॅन्सरचे कारण ठरू शकते.
कोणत्याही आजाराची कारणे माहीत असणे गरजेचे आहे. कारण निदानपरिवर्तन म्हणजे कारणांचा त्याग करणे, ही अर्धी चिकित्सा होय.
कॅन्सरची लक्षणे
कॅन्सर या आजाराचे निदान जर प्राथमिक अवस्थेतच झाले तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. पण ही प्राथमिक अवस्था समजण्यास रुग्ण जागरूक हवा. कारण कॅन्सरची लक्षणे एवढी सामान्य असतात की त्या लक्षणांना गांभीर्याने कधीच पाहिले जात नाही. त्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. ही लक्षणे वारंवार दिसत असतील व पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास धोक्याची लक्षणे म्हणून तज्ज्ञाचा सल्ला घेण्यास जरूर घ्यावा. छातीमध्ये असणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. पण त्याकडे कानाडोळा करणे किंवा अति विचार करणेही तितकेच घातक. यासाठी खाली लक्षणे दिली आहेत ते कॅन्सरचे संकेत असू शकतात. ही लक्षणे जाणून घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व चाळीशी उलटल्यानंतर काही तपासण्या सांगितल्या आहेत त्या नक्की कराव्यात.
- अचानक वजन कमी होणे. (विशेषतः उतारवयात)
- भूक मरणे, अन्नावरची वासना उठणे.
- तोंडात वारंवार जखमा होणे, तोंड येणे (मुखाचा कॅन्सर).
- गिळायला त्रास, घसा दुखणे (घश्याचा कॅन्सर).
- आवाजात बदल होणे किंवा आवाज बसणे (स्वरयंत्राचा कर्करोग).
- अन्न गिळताना सतत आत अडकल्यासारखे वाटत राहणे (अन्ननलिकेचा कॅन्सर).
- अन्न खाऊन झाल्यानंतर बराच काळ पोट जड झाल्यासारखे वाटणे, करपट ढेकर येणे, अपचन झालेले अन्न उलटणे (जठराचा कॅन्सर).
- शौचविसर्जनाच्या सवयीमध्ये अचानकपणे बदल होणे. वारंवार बद्धकोष्ठतेची तक्रार (मोठ्या आतड्याचा कॅन्सर).
- शरीराच्या कोणत्याही अवयवांमधून (नाक, हिरड्या, लघवी, शौच, गर्भाशय) अचानक कारणाशिवाय रक्तस्राव होणे (रक्तपेशींचा कॅन्सर).
- लघवीतून किंवा शौचातून कारणाशिवाय अचानक रक्तस्राव होणे. याला मूत्राशय किंवा गुदाशयाचा कॅन्सर म्हटले जाते.
- खोकल्यातून रक्त पडणे, वारंवार खोकला (फुफ्फुसाचा किंवा श्वसननलिकेचा कॅन्सर).
- मासिक पाळी बंद झाल्यानंतर अचानक रक्तस्राव होणे (गर्भाशयाचा कॅन्सर).
- हाडांमध्ये जास्त दुखत आहे, सुज जाणवते (हाडांचा कॅन्सर).
- वारंवार रक्त कमी होणे, वारंवार काविळ होणे, सतत थकवा (रक्ताचा कॅन्सर).
- शरीरात अचानक गाठ दिसणे किंवा बऱ्याच दिवसांपासून बरा न होणारा व्रण तयार होणे (सावधानतेचा इशारा).
- ब्रेस्टमध्ये गाठ किंवा व्रण होणे (स्तनाचा कॅन्सर).
- काखेमध्ये, जांघेमध्ये, गळ्यात दगडासारखे अगदी कडक गाठीचे अवधाण येणे (अर्थात या अवस्थेत रोग निदानाला उशीर झालेला असतो).
ही सगळी सर्वसाधारण लक्षणे आहेत, त्यामुळे दुर्लक्ष होतो. पण वारंवार दिसत असतील व जास्त दिवस टिकत असतील (औषधोपचार करूनदेखील) तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. बाऊ करू नये पण दुर्लक्षही करू नये, म्हणजे प्राथमिक अवस्थेत कॅन्सरचे निदान होते. कॅन्सर म्हणजे मृत्यू नव्हे. सगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर आज औषधोपचार आहेत.
कॅन्सरच्या गाठीचे प्रकार
‘गाठ’ हे कॅन्सरचे मुख्य लक्षण आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारची गाठ आहे हे समजणे गरजेचे असते.
1) बिनाईन ट्युमर ः ही एक कॅन्सरची गाठ आहे. या प्रकारची गाठ ही सहज काढून टाकता येते. ही गाठ इतर अवयवांमध्ये पसरत नाही, त्यामुळे या प्रकारच्या कॅन्सरचा शरीरातील इतर अवयवांमध्ये प्रसार होत नाही. या प्रकारच्या गाठी जीवघेण्या नसतात.
2) मॅलिग्नंट ः या प्रकारच्या गाठीना मारक गाठीदेखील म्हटले जाते. या गाठी ज्या अवयवांमध्ये झालेल्या आहेत, त्याव्यतिरिक्त इतर अवयवांमध्येही पसरतात. कॅन्सरच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी म्हणे मॅलिग्नंट गाठी बनतात. या प्रकाराला कॅन्सर प्रोजेक्शन असं म्हणतात.
ज्यावेळी कॅन्सर हा आजार मूळ अवयवापासून दुसऱ्या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो, त्यावेळी दुसऱ्या अवयवामधील कॅन्सरच्या पेशी या मूळ अवयवामधील कॅन्सरच्या पेशीप्रमाणेच असतात. उदाहणार्थ, फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असेल तर तो मेंदूमध्ये स्थलांतरित झाल्यास मेंदूमधील कॅन्सर पेशी या फुफ्फुसाच्या कॅन्सर पेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फुस-कॅन्सर असे म्हणतात.
कॅन्सरमध्ये कोणत्या तपासण्या कराव्यात?
कॅन्सरचे रोगनिदान लवकरात लवकर होणे आवश्यक असते. परंतु मुद्दाम आणि विशेष प्रयत्न केले तरच हे शक्य असते. आपल्या देशात तोंडाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर यांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आपल्या शरीरातील या दोन्ही जागा सहज तपासता येतात. या अवयवांचे निदान कॅन्सरच्या पूर्व प्राथमिक स्थितीतही पेशी तपासणीत करता येणे शक्य असते. ब्रेस्ट कॅन्सरदेखील लवकर शोधता येतो.
साधारण चाळीशीनंतर प्रत्येकाने दरवर्षी स्क्रिनिंग करावे. यात काही बेसिक टेस्ट म्हणजे- सीबीसी, ब्लड शुगर, एक्स-रे, युरिन, सोनोग्राफी, स्त्रियांमध्ये पॅप स्मीअर आणि पुरुषांमध्ये पीएसए टेस्ट तसेच स्त्रियांमध्ये ब्रेस्ट सोनोमॅमोग्राफी या चांचण्या करून घ्याव्यात.
- गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर पॅप स्मीअरने समजतो.
- सोनोग्राफी ही खूप महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे. यामुळे पोटातील कॅन्सर लवकरात लवकर कळून येतो.
- स्वयंतपासणीनेदेखील बेस्ट कॅन्सर लवकरात लवकर कळू शकतो. इतर अवयवांच्या कॅन्सरसाठी मात्र लक्षणांवरून अनुमान करून त्वरित तज्ज्ञाकडे जावे.
कॅन्सरवर उपचार
- शस्त्रक्रिया करून अवयव काढून टाकणे.
- किरणोत्सर्गी उपाययोजना म्हणजे रेडिएशन.
- कर्करोगविरोधी औषधे, ज्याला आपण अँटी कॅन्सर मेडिसीन- केमोथेरपी म्हणतो.
यांपैकी एक किंवा जास्त उपाययोजना आवश्यतेनुसार केली जाते. आजच्या काळात इम्युनोथेरपी ही चिकित्सादेखील केली जाते. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून पेशीवर हल्ला केला जातो. - टार्गेट थेरपी ः पेशींच्या विशिष्ट भागावर अचूक औषधांचा परिणाम करणे.
योग्यवेळी निदान झाल्यास आणि योग्य उपचार मिळाल्यास अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. आणि हो… हे सगळे उपचार भारतात शक्य आहेत. सेलेब्रिटिज परदेशात उपचार घेतात, कारण त्यांच्या सोशल स्टिग्मामुळे. इथे उपचार घेऊन ते लगेच सोशल होऊ शकत नाहीत.
कॅन्सरच्या उपचारादरम्यान मानसिक स्थिती सकारात्मक असावी. ‘मी लढेन, मी हार मानणार नाही. माझ्या शरीरावर माझं प्रेम आहे आणि मी बरा होऊ शकतो’ अशी मनःस्थिती ठेवावी. सकारात्मक विचार, ध्यान आणि आधार देणारे कुटुंब, मित्र यामुळे तणाव कमी होतो. रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत होते आणि उपचारांचा परिणाम चांगला होतो.
आहाराचं महत्त्व
- भारतीय संस्कृतीप्रमाणे आहार सेवन करावा. दिनचर्येचे, ऋतुचर्येचे पालन-आचरण करावे.
- ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्याचे सेवन करावे.
- साखर, प्रक्रिया केलेले अन्न टाळावे.
- पुरेसे पाणी प्यावे.
- चांगले शिजवलेले- सहा रसात्मक व स्वच्छ वातावरणात अन्न सेवन करावे.
- हलका व्यायाम- चालणे, योगा, स्ट्रेचिंग आदी क्रिया कराव्यात. जास्त तीव्र व्यायाम करू नका.
- पुरेशी झोप शरीराला पुनरुज्जीवन देण्यासाठी आवश्यक असते. झोप लागत नसेल तर ध्यान, हलकं संगीत ऐकणे नियमित वेळेवर झोपण्यासाठी उपयोगी पडते.
कॅन्सर हा सर्वसामान्य आजारांपैकीच एक आहे. त्याचा बाऊ न करता, समजून घेऊन उपचार करावेत. त्याचा स्वीकार करावा.

