- डॉ. मनाली महेश पवार
पारंपरिक वैद्यकशास्त्रात वावडिंगचे महत्त्व आजही टिकून आहे. वावडिंग ही केवळ कृमिनाशक औषधी नसून पचनसंवर्धक, रक्तशुद्धीकारक, त्वचारोगनाशक आणि कफशामक अशी बहुगुणी वनस्पती आहे. आयुर्वेदाच्या शास्त्राधारित परंपरेत तिचे स्थान महत्त्वाचे आहे.
भारतात दरवर्षी 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट हे राष्ट्रीय ‘जंतनाशक दिवस’ (नॅशनल डीवॉर्मिंग डे) म्हणून साजरे करण्यात येतात, ज्याचा उद्देश 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना ‘ऐलबेंडाजोल’ गोळी देऊन पोटातील जंतांपासून मुक्त करणे.
जंतांमुळे मुलांच्या शरीरातील पोषणद्रव्ये शोषली जातात, ज्यामुळे मूल अशक्त, कुपोषित आणि निरुत्साही बनते.
आयुर्वेदशास्त्रातदेखील कृमिघ्न द्रव्ये सांगितली आहेत, म्हणूनच पूर्वीच्या काळी अगदी तान्ह्या बाळाला बाहेरचं दूध द्यायचं झालं तर दुधामध्ये वावडिंग शिजवून ते दूध पाजायचे किंवा स्तन्यपान करत असतानादेखील चाटण औषधामध्ये वावडिंगाची बी उगाळून देतात. कारण वावडिंग हे कृमिघ्न द्रव्य आहे. वावडिंग, पलाश, मिरे, निंब, शेवगा, ओवा, कंपीलक, दंती, जयपाल, निर्गुण्डी, गोखरू अशी काही कृमिघ्न द्रव्ये आयुर्वेद शास्त्रात वर्णिली आहेत.
वावडिंग
वावडिंग कृमिनाशक व पाचनसंवर्धक आयुर्वेदीय अमृत आहे. भारतीय आयुर्वेद परंपरेत अनेक वनौषधींना विशेष स्थान आहे, त्यांपैकी वावडिंग ही एक अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात तिला कृमिघ्न (कृमी नाश करणारी) म्हणून विशेष ओळख मिळाली आहे. प्राचीनकाळापासून आतड्यांतील जंत, त्वचारोग, अपचन, कफविकार आणि विविध पचनासंबंधी तक्रारींमध्ये वावडिंगचा वापर केला जातो.
परिचय व नावे
संस्कृत नाव : विडंग, कृमिघ्न, चित्रतुण्डुल
मराठी नाव : वावडिंग
हिंदी नाव : बावडिंग
लॅटिन नाव : ॲम्बेलिया राईब्स
कूळ : मिर्सिनेसी
वावडिंग ही मध्यम आकाराची वेलवर्गीय झुडूप वनस्पती आहे. तिची फळे औषधी उपयोगासाठी घेतली जातात.
वनस्पतीचे स्वरूप
वावडिंगची झाडे डोंगराळ भागात व जंगलामध्ये आढळतात. पाने लहान, टोकदार व गर्द हिरवी असतात. फुले लहान व पांढरीसर असतात. फळे मिरीसारखी लहान, गोल व काळसर तपकिरी रंगाची असतात. फळांच्या आतील बी औषधी गुणांनी युक्त असते. भारताच्या हिमालयीन प्रदेशात, महाराष्ट्रातील डोंगराळ पट्ट्यात, तसेच दक्षिण भारतात वावडिंग आढळते.
आयुर्वेदीय गुणधर्म
आयुर्वेदानुसार वावडिंगचे गुण पुढीलप्रमाणे-
रस (चव) ः कडू, तिखट
वीर्य ः उष्ण
विपाक ः कटू
गुण ः लघु, रुक्ष
दोषप्रभाव ः कफ व वातशामक
उष्ण व तिखट गुणांमुळे शरीरातील कफ व वातदोष कमी करण्यास मदत होते.
रासायनिक घटक
वावडिंगमध्ये एम्बेलीन हा प्रमुख सक्रिय घटक आढळतो. याशिवाय टॅनिन, क्रिस्टॅलिन व काही उडनशील तेलांचे घटक असतात. एम्बेलीनमध्ये जंतुनाशक, दाहशामक व प्रतिजैविक गुणधर्म आढळतात.
प्रमुख औषधी उपयोग
1) कृमिनाशक (जंतनाशक)
वावडिंगचा सर्वात प्रसिद्ध उपयोग म्हणजे आतड्यांतील जंत नष्ट करणे. लहान मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये होणारे गोलकृमी, सुतकृमी इत्यादींवर वावडिंग चूर्ण उपयुक्त ठरते.
वापर पद्धत : रिकाम्या पोटी 1 ते 3 ग्रॅम वावडिंग चूर्ण कोमट पाण्यासोबत द्यावे. काही वेळानंतर सौम्य जुलाब होऊन मृत जंत बाहेर पडतात.
2) पचन सुधारक
अपचन, अजीर्ण, पोटफुगी, वायू, आम्लपित्त या तक्रारींमध्ये वावडिंग उपयुक्त आहे. जठराग्नी प्रदीप्त करते. भूक वाढवते. अन्न पचण्यास मदत करते.
3) त्वचारोग
त्वचेवर कफदोषामुळे येणारे फोड, खाज, कोंडा, कृमिजन्य त्वचारोग यांमध्ये वावडिंग चूर्ण किंवा लेप उपयुक्त ठरतो.
4) श्वसनविकार
कफ साचल्यामुळे होणारा खोकला, दमा, कफयुक्त सर्दी यामध्ये वावडिंग मदत करते. उष्ण व कडू गुणांमुळे कफ कमी होतो.
5) रक्तशुद्धी
रक्तदोषामुळे होणाऱ्या विकारांमध्ये वावडिंग रक्तशुद्धी करते व सूज कमी करण्यास मदत करते.
6) मूत्रविकार
मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग व सूज कमी करण्यासाठी काही पारंपरिक उपचारांमध्ये वावडिंगचा वापर केला जातो.
पारंपरिक योग
विडंग चूर्ण ः कृमिनाशासाठी.
विडंगारिष्ठा ः पचनविकार व कृमिनाशासाठी.
त्रिफळा + वावडिंग चूर्ण ः पोटशुद्धीसाठी.
मात्रा व सेवनपद्धती
चूर्ण : 1 ते 3 ग्रॅम
काढा : 20 ते 40 मिली
बालकांमध्ये : वैद्यकीय सल्ल्याने कमी मात्रा. रिकाम्या पोटी सेवन अधिक परिणामकारक ठरते.
खबरदारी
गर्भवती स्त्रियांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापर करू नये. अतिसार किंवा जुलाब जास्त असल्यास वापर टाळावा. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी कमी मात्रेत वापर करावा.
आधुनिक संशोधन व महत्त्व
अलीकडील संशोधनात वावडिंगमध्ये आढळणारा ‘एम्बेलीन’ हा घटक प्रतिजैविक, कृमिनाशक व दाहशामक असल्याचे आढळले आहे. काही संशोधनांमध्ये अँटीऑक्सिडंट व कर्करोगप्रतिबंधक गुणधर्मांचाही अभ्यास सुरू आहे.
ग्रामीण आरोग्यातील स्थान
ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये जंतसंसर्ग सामान्य असतो. अशावेळी वावडिंग हा सहज उपलब्ध आणि कमी खर्चिक उपाय आहे. पारंपरिक वैद्यकशास्त्रात वावडिंगचे महत्त्व आजही टिकून आहे. वावडिंग ही केवळ कृमिनाशक औषधी नसून पचनसंवर्धक, रक्तशुद्धीकारक, त्वचारोगनाशक आणि कफशामक अशी बहुगुणी वनस्पती आहे. आयुर्वेदाच्या शास्त्राधारित परंपरेत तिचे स्थान महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेल्या पचनविकारांमध्ये व आतड्यांतील जंतसंसर्गात वावडिंग उपयुक्त ठरते.
निसर्गाने दिलेली ही अमूल्य देणगी योग्य मार्गदर्शनाखाली वापरल्यास आरोग्य संवर्धनासाठी प्रभावी ठरू शकते.