कृतघ्नता (शिदोरी)

0
114
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

आपल्या मनासारखे होईपर्यंत संधिसाधू गप्प राहतात आणि संधी मिळताच अचानक तोंड उघडून तुला लाथेनेच उडवून देतात. म्हणूनच मन आपले दगडासारखे कठोर बनवा आणि हे सगळे विष पचवा. कारण दिवस कृतघ्नतेचे आहेत.

कृतज्ञता आणि कृतघ्नता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ‘कृतम् जानाति इति कृतज्ञः’ म्हणजे केलेले जाणतो तो कृतज्ञ आणि ‘कृतम् हनोति इति कृतघ्नः’ म्हणजे केलेले मारतो तो कृतघ्न.
आज कलियुग आहे. कृतज्ञ माणसे शोधावी लागतात. गल्लोगल्लीत शोधूनदेखील ते मिळणे अगदीच मुश्कील. कृतघ्न माणूस मात्र आज शोधावा लागत नाही. पावलोपावली अशी माणसे भेटत असतात. आपणच हताश होऊन जातो. मूल्यांच्या बाबतीत आपणाला विचार करावा लागेल. असेच जर घडत राहिले तर माणूस प्रामाणिकपणावर विश्‍वास कसा ठेवील? या वेदनेने आपण व्यथित होतो आणि एका कोपर्‍यात चिंता करत बसतो.

समोरचा आपला मित्र आपल्याला म्हणतो, ‘‘फार मनावर घ्यायचे नसते यार! हे असेच चालायचे. सोडून दे. विचारच करायचा नाही त्याच्यावर. चल आपण मस्तपैकी कॉफी घेऊ.’’ हॉटेलमध्ये कॉफीचे घुटके घेतानादेखील तोच विचार आपली पाठ सोडत नाही. आपला चेहरा कसाच बदलत नाही; काळवंडलेलाच राहतो. तेव्हा मित्र वैतागाने म्हणतो, ‘‘तू मरणारच. तू नाही जगणार अशाने. मी खूप माणसे पाहिलीत तुझ्यासारखी. अरे तू फिट नाहीस या जगात जगायला. सगळ्यांकडे जरा डोळे नीट उघडून बघ. प्रत्येकजण आपल्याच जगात असतो. कोणाचे कोणाला पडलेय रे? आणि तू जगाची चिंता करतोस. स्वतःपुरतं जगायला शिक.’’
एवढा सगळा हितोपदेश ऐकूनदेखील भावनाशील माणूस आपली वृत्ती जरासुद्धा बदलत नाही. कारण त्याचा पिंडच वेगळा असतो.
अप्पलपोटे होण्यामध्ये त्याला रस नसतो. दुसर्‍याचे दुःख पाहून त्याचा जीव तळमळतो. रंजलेल्या-गांजलेल्यांना पाहून त्यांची त्याला कीव येते. समोर उपाशी माणसांना पाहून त्याच्या पोटात अन्नाचा घास जात नाही. जेवढे त्याला शक्य झाले तेवढे तो करत आला. आपले पैसे आपल्या बँकेच्या खात्यात ठेवले नाहीत. कुटुंबामध्ये ज्याला-ज्याला गरज आहे त्याला-त्याला देत राहिला. कर्जाऊ पैसेदेखील दुसर्‍यासाठीच खर्च केले.

पण दुःख कसले वाटते…? ज्यांना सहानुभूतीने मदत केली तीच माणसे उलटी भाषा बोलतात याचे दुःख होते. पैसे देताना ते परत मिळतील ही अपेक्षा केली नाही. व्याज मागितलं नाही आणि मुद्दलाचीदेखील आशा केली नाही. पण कृतघ्न भाषा बोलण्याचे कारणच काय?
ज्यांच्या नोकरीसाठी कित्येकांचे पाय धरले. भलत्यांचीच मनधरणी केली. नाक मुठीत धरून त्यांचे उंबरठे झिजवले. लायकी नसलेल्यांना साष्टांग नमस्कार घातला. निर्लज्जपणे हांजी-हांजी केली. सांगेल ती कामे केली. एवढे सगळे करून ज्याने नोकरी उपभोगली तोच जर आपली निंदा करायला लागला तर याला कसला बरे कृतघ्नपणा म्हणावा? आपलेच नशीब खोटे म्हणून गप्प बसावे का?
ज्यांच्या शिक्षणाच्या फीसाठी तू कष्ट उपसलेस, ज्यांचा खर्च चालवण्यासाठी तू जिवाचे रान केलेस, प्रसंगी दुसर्‍याकडून उसने पैसे घेतलेस, कष्ट अतोनात होऊन तू आजारीदेखील पडलास, मरणातून वाचलास, हाय रे दुर्भाग्य!
‘‘तू काहीच नाहीस केले आमच्यासाठी. तू फक्त तुझाच स्वार्थ पाहिलास,’’ असे कृतघ्नतेचे शब्द नंतर ऐकताना जीव तीळ-तीळ तुटायला लागतो. व्हायला हवे पण लग्न होत नाही म्हणून तूच धडपडलास. सोयरीक जुळवण्यापासून बोहल्यावर चढवून शुभमंगल करेपर्यंत रक्ताचे पाणी केलेस. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभारलास. सगळे बरे-बरे झाले ते पाहून एका बाजूने मनाला समाधान वाटले, पण दुसर्‍या बाजूने जेव्हा शब्द कानावर पडले ः
‘‘तू काहीच केले नाहीस माझ्यासाठी. काही केलेच असेल तर तुझे कर्तव्य केलेस. मला त्याची नाही पर्वा. मीच तुझ्यासाठी खूप केले. तेच उपकार तू मानायला हवेस!’’
किती अस्वस्थ होते मन अशी कृतघ्नता पाहून?
पैसे मिळवायला खूपच कष्ट पडतात. कोणालाच पैसे उधळपट्टीने खर्च करावे असे वाटत नाही. पण प्रसंगच असे येतात की तेथे तुम्हाला खर्च करावाच लागतो. सगळ्यांच्या गरजांचा तू विचार करतोस आणि खर्चाची सूची लांबत जाते. ठेवीतला सगळा पैसा संपून जातो तेव्हा सगळ्यांचेच राग-रंग खर्‍या स्वरूपात दिसायला लागतात.
‘‘तू मूर्ख आहेस. तुला खर्च करायला कळत नाही. दहाच्या जागी तू शंभर देतोस. तुला पैशांचा व्यवहार बिलकूल समजत नाही. मरेपर्यंत तू तसाच भिकारी राहशील. मरेपर्यंत तू असाच असशील…’’
कोणत्या सज्जन मनाची अशा दुःखद शब्दांनी घालमेल होणार नाही?
सगळ्यांची सोय व्हावी म्हणून तू घर बांधायला पुढे सरसावलास. जबाबदारी तुझी म्हणूनच चारी बाजूंच्या सीमा-मालकांकडे तुला एकट्यानेच भांडावे लागले. काम पुढे न्यायला तू उन्हात होरपळत राहिलास. पण घरातल्या इतर सगळ्यांनी तुझ्याविरुद्ध कंपू केला. एका बाजूने त्यांनी घर बळकावलेच आणि दुसर्‍या बाजूने तुला रस्त्यावर फेकून शिव्यांची लाखोली वाहिली. असा शंभर नंबरी कृतघ्नपणा कलियुगातच शोभून दिसतो.

जो दुसर्‍याचा विचार करत राहिला तो स्वतः संपला. जग कसे कपटी आहे ते नंतर लक्षात येते. आपल्या मनासारखे होईपर्यंत संधिसाधू गप्प राहतात आणि संधी मिळताच अचानक तोंड उघडून तुला लाथेनेच उडवून देतात. म्हणूनच मन आपले दगडासारखे कठोर बनवा आणि हे सगळे विष पचवा. कारण दिवस कृतघ्नतेचे आहेत.