कुळे – वास्को रेल्वेमार्गप्रकरणी हरकती फेटाळल्या

0
5

>> 0.9985 हेक्टर जमीन संपादन प्रक्रिया सुरू

कुळे ते वास्को या दरम्यानच्या रेल्वेमार्ग दुपदरीकरप्रकरणी नेमलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने आंदोलकांचे पर्यावऱ्णासंबंधीचे सर्व आक्षेप, हरकती फेटाळून लावल्या आहेत. तसेच या जमीन संपादनासाठीची सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी एकूण 0.9985 हेक्टर एवढी जमीन संपादित करण्यात येणार असून संपादित करण्यात येणार असलेली जमीन ही कुडचडे, काकोडा, सावर्डे, शेळवण, सांत-जुझे-द-आरियल, चांदर, गिरदोली, वेळसाव व इसोरसी ह्या गावांतील आहे.

यासंबंधी वास्को येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय अधिकारी यांनी जमीन संपादनासाठीची ही सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. होस्पेट-हुबळी-तितईघाट-वास्को-द-गामा या दरम्यानच्या विशेष रेल्वे प्रकल्पाच्या दुहेरी रेल्वे मार्गासाठी हे जमीन संपादन असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोयचो एकवोटतर्फे निषेध
या दुहेरीकरणाला विरोध करणाऱ्या ‘गोंयचो एकवट’ ह्या बिगर सरकारी संघटनेने आक्षेप फेटाळण्याच्या कृतीचाही आम्ही निषेध करीत आहोत असे म्हटले आहे. रेल्वे आता लोकांच्या खासगी मालमत्तांमध्ये अतिक्रमण करीत असल्याचा आरोप गोंयचो एकवट संघटनेने केला असून ही लोकशाही नसून हुकूमशाही असल्याचा आरोप केला आहे.