कुंकळ्ळीचा उठाव आता राष्ट्रीय युद्ध स्मृती दिन

0
28

>> घटक राज्य दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; हुतात्म्यांना राष्ट्रीय युद्ध स्मारकावर दरवर्षी वाहिली जाणार आदरांजली

१५ जुलै अर्थात कुंकळ्ळीचा पहिला उठाव हा दिवस गोव्याचा राष्ट्रीय युद्ध स्मृती दिन म्हणून राष्ट्रीय पातळीवर पाळला जाणार आहे. १५ जुलै हा कुंकळ्ळीतील स्वातंत्र्यसैनिकांच्या उठावाचा दिवस. याच दिवशी कुंकळ्ळीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध प्रथम आवाज उठविला. या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राज्याचे प्रतिनिधी नवी दिल्लीत जाऊन राष्ट्रीय युद्ध स्मारकावर हुतात्म्यांना आदरांजली वाहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३५ व्या घटक राज्य दिन कार्यक्रमात बोलताना काल केली.

दोनापावल येथील राजभवनातील दरबार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यटनमंत्री रोहन खवंटे, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व इतरांची उपस्थिती होती.
गोव्याला खर्‍या अर्थाने स्वावलंबी बनवता यावे, यासाठी सरकार मानव संसाधनांना अधिक बळकट करणार असून, कौशल्य विकासात सुधारणा करणार आहे. कोकणी भाषेचा प्रशासकीय कामकाजासाठी वापर करण्याची गरज आहे. कोकणी भाषेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी नव्या राजभवन इमारतीवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. राज्यातील नवीन राजभवन इमारतीच्या विषयाचे विरोधकांनी राजकारण करू नये. नवीन राजभवनाचा विषय समजून घेतला पाहिजे. कोणीही नाहक दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला. गोवा हे अतिशय शांतताप्रिय आणि सामंजस्यपूर्ण राज्य आहे. देशाच्या इतर भागांनी गोव्याच्या विविध पैलूंकडे लक्ष दिले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.

राज्य सरकारने शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योग, आरोग्य इत्यादी क्षेत्रात आत्तापर्यंत केलेल्या विकास आणि प्रगतीबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. गोव्यात ग्रामीण पर्यटन आणि आरोग्य पर्यटनामध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्‍वासही राज्यपालांनी व्यक्त केला.

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्याच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्वागत केले. यावेळी राज्यांच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा गोव्याच्या विकासात भरीव योगदान दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत आणि लक्ष्मीकांत पार्सेकर आदींचा समावेश होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा सन्मान त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी सन्मान स्वीकारला. तसेच सरकारच्या योजना आणि प्रकल्प ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांसाठी सहा स्वयंपूर्ण मित्रांचा सत्कार करण्यात आला.
रूपा चारी आणि अनंत अग्नी यांनी सूत्रसंचालन केले. माहिती सचिव रमेश वर्मा यांनी आभार मानले.

आता दरवर्षी हुतात्म्यांना आदरांजली
दिल्लीत उभारलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये प्रत्येक राज्याच्या निर्मितीत, राज्याच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिल्याबद्दल त्या त्या दिवशी आदरांजली वाहण्यात येणार आहे. पोर्तुगीजांविरुद्ध पहिला उठाव करणार्‍या कुंकळ्ळी येथील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्य सरकारने १५ जुलै हा दिवस निवडला आहे. या दिवशी आता दरवर्षी संपूर्ण देशवासियांकडून या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाईल.

धेंपो उद्योग समूहाचा सन्मान
राज्याच्या आर्थिक, सामाजिक विकासात योगदान दिल्याबद्दल धेंपो उद्योग समूहाचा विशेष सन्मान करण्यात आला. धेंपो उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनी हा सन्मान स्वीकारला. तसेच साळगावकर अँड ब्रदर्स, चौगुले अँड कंपनी, एनआरबी ग्रुप, फोमेंतो, डी. बी. बांदोडकर अँड सन्स, वेदांता, एमआरएफ, सिप्ला लिमिटेड अशा उद्योग समूह आणि इतर स्थानिक शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्थांचा सन्मान करण्यात आला.