किराणा मालाची सर्व दुकाने खुली करा

0
186

>> नागरी पुरवठा संचालनालयाचा आदेश

 

नागरी पुरवठा खात्याने राज्यातील किराणा सामानाची विक्री करणारी दुकाने, तसेच घाऊक किराणा सामान विक्रीची दुकाने खुली ठेवण्यासाठी खास आदेश जारी केला आहे. संबंधित दुकान मालकांनी दुकाने उघडी न ठेवल्यास कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा नागरी पुरवठा संचालनालयाने दिला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी किराणा सामानाची दुकाने चोवीस तास उघडी ठेवण्याची सूचना केल्यानंतरसुद्धा बहुतांश दुकाने बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे.  या पार्श्‍वभूमीवर नागरी पुरवठा खात्याला दुकाने उघडी ठेवण्याची सूचना करण्यासाठी खास आदेश जारी करावा लागला आहे.

खास पथकाची नियुक्ती

सरकारने जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी, काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतली आहेत. किराणा दुकान, घाऊक किराणा विक्रेत्यांची गोदामे उघडून तपासणीसाठी नागरी पुरवठा, व्यावसायिक कर आणि वजन माप खात्याच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या खास पथकांची नियुक्ती  केली आहे. नागरी पुरवठा खात्याचे संचालक सिद्धिविनायक नाईक यांनी यासंबंधीचा आदेश जारी करून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुका पातळीवर निरीक्षकांची नियुक्ती करून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी या खास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. धान्याचा काळाबाजार, जादा दराच्या सामान विक्रीबाबत येणार्‍या तक्रारीची चौकशी करण्याची सूचना या पथकाला करण्यात आली आहे.

दुकानांत धान्यांचा तुटवडा

राजधानी पणजी शहरातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी बहुतांश दुकाने मागील आठ दिवस बंद आहेत. पणजी महानगरपालिकेचे मुख्य मार्केटसुध्दा बंद आहे. शहरातील काही मोजकीच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू आहेत. परंतु, त्या दुकानांमध्ये धान्यांचा तुटवडा दिसून येत आहे.

राज्यात १३ ठिकाणी गरजूंची अन्न, निवार्‍याची व्यवस्था

सरकारकडून सुमारे ३६०० गरजूंना निवारा व अन्नाची राज्यभरात १३ ठिकाणी व्यवस्था केली जात आहे. कोविड-१९ च्या लॉकआऊटमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने राज्यात निवार्‍याची सोय नसलेल्या व्यक्तींची गैरसोय होत आहे. त्यामुळे निवार्‍याची सोय नसलेल्या व्यक्तींची तात्पुरती व्यवस्था केली जात आहे.

या व्यक्तींना अन्न देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील तिसवाडी – युथ हॉस्टेल मिरामार- पणजी,  बार्देश – पेडे क्रीडा संकुल – म्हापसा, कळंगुट – सामाजिक सभागृह – कळंगुट, पेडणे – जी.पी.एस. सुब्रानवाडा पेडणे, डिचोली – सरकारी प्राथमिक विद्यालय, नार्वे, सत्तरी – जी.पी.एस. खोडये, सत्तरी. दक्षिण गोवा – सालसेत – इनडोअर स्टेडियम नावेली, मुरगाव – राम मंदिर सामाजिक सभागृह, मांगूर, केपे – क्रीडा संकुल बोरीमळ, सांगे – उगे पंचायत सभागृह, फोंडा – गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, फर्मागुडी – हॉस्टेल क्रमांक – ३, धारबांदोडा – वेदांता सेझा गोवा सभागृह कोडली खाण, काणकोण – नगरपालिका सभागृह येथे व्यवस्था करण्यात आली आहे.