गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, अमरनाथ पणजीकर, श्रीनिवास खलप, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील काही काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची काल भेट घेत त्यांच्यासमोर राज्यातील विविध प्रश्न मांडत ते त्वरित सोडवण्याची मागणी केली.
अमित पाटकर व अन्य नेत्यांनी सांडपाणी वाहून नेणाऱ्या टँकरमधून लोकांना केला जाणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या प्रश्नासह राज्यातील रस्ते, जलसिंचनाचा प्रश्न, वाहतूक कोंडी आदी प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडून ते विनाविलंब धसास लावण्याची मागणी त्यांच्याकडे केली.
आम्ही मुख्यमंत्र्यांना या समस्या व प्रश्नांसंबंधीचे कागदोपत्री पुरावे व चित्रफित दाखवल्याचे अमित पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सर्व संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याची, तसेच टँकर व्यावसायिकांवर कडक नजर ठेवण्याची मागणी केल्याचे पाटकर यांनी सांगितले. टँकर व्यावसायिकांवर नजर ठेवण्यासाठी नोडल एजन्सीची नेमणूक करण्याची मागणी केली असून, ही मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी पणजी स्मार्ट सिटी कामातील भ्रष्टाचार व गैरव्यवहार, बागा नदीत सांडपाणी सोडण्याचे प्रकार, स्वस्त धान्य दुकानदारांना बुरशीयुक्त तांदळाचा पुरवठा करण्याचा प्रकार या विषयांतही लक्ष घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पाटकर यांनी
सांगितले.