कहाणी काणकोणातील पहिल्या कारची…

0
4

>> कारमधून गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी देखील केला होता प्रवास

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजे 1926 साली पाळोळे येथील स्व. आवेलिना डिसा यांनी फोर्ड कंपनीची कार विकत घेतली होती. काणकोणात पहिली कार विकत घेण्याचा मान त्यांनी मिळविला होता. या कारमधून गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी देखील प्रवास केला होता. आता या कारला 97 वर्षे पूर्ण झाली असून, त्या कारचे सुट्टे भाग स्व. आवेलिना डिसा यांचे पुत्र नातिविदाद डिसा यांनी आजही सांभाळून ठेवले आहेत. तसेच कारची चाकेही सांभाळून ठेवली आहेत.

पूर्वी काणकोण तालुक्यात डांबरी रस्ते नव्हते. मडगाव-काणकोण असा पायी चालत प्रवास केला जात होता. दिवसाला एका वेळेस मडगाव ते काणकोण असा या कारचा प्रवास असायचा. त्याद्वारे अत्यंत गरजू प्रवाशांची कमी वेळेत वाहतूक व्हायची. गोवा मुक्ती लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची ने-आण करण्यासाठी देखील या फोर्ड कारचा वापर केला जात होता, असे 81 वर्षीय नातिविदाद डिसा यांनी सांगितले. आपल्या वडिलांनी घेतलेल्या या कारमध्ये बसून प्रवास केलेल्या गालजीबाग येथील तीन महिला आजही जिवंत आहेत, असे त्यांनी सांगितले.

पूर्वीपासून समाजसेवेची आवड असलेल्या स्व. आवेलिना डिसा यांनी पाळोळे येथील आपल्या जागेत एक यात्री निवास बांधला होता. रात्री उशिरापर्यंत काणकोणात पोहचलेल्या प्रवाशांना या यात्री निवासात मोफत राहण्याची व्यवस्था देखील त्यांनी केली होती, अशी माहिती देखील नातिविदाद डिसा यांनी दिली.