>> प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेताच शॅक सुरू
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता सुरू असलेले कळंगुट, कांदोळी या किनारी भागातील 161 शॅक बंद करण्याचा आदेश काल दिला. कळंगुट-कांदोळी भागातील केवळ 6 शॅकमालकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता घेतलेली आहे. राज्य प्रदूषण मंडळाला विनापरवाना सुरू असलेले शॅक बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने साहाय्य करावे. तसेच या कारवाईबाबत अहवाल येत्या 5 एप्रिल रोजी सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कळंगुट-कांदोळी भागातील काही शॅकचालकांकडे शॅक चालविण्याचा परवाना नाही, असा दावा करणारी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेला अनुसरून न्यायालयाने गोवा राज्य प्रदूषण मंडळाला बाजू मांडण्याची सूचना केली होती.
कळंगुट-कांदोळी या किनारी भागात पर्यटन खात्याने एकूण 167 शॅक उभारण्यासाठी मान्यता दिली आहे, त्यातील केवळ 6 शॅकमालकांनी गोवा प्रदूषण मंडळ व इतर संबंधितांकडून शॅक चालविण्यासाठी परवानगी घेतली आहे, तर 161 शॅक विनापरवाना कार्यरत असल्याची माहिती गोवा प्रदूषण मंडळाने न्यायालयात
सादर केली.