कळंगुटमध्ये डेंग्यूमुळे हाहाकार

0
7

आतापर्यंत 94 रुग्णांची नोंद, राज्यभरात डेंग्यूचे रुग्ण

दक्षिण गोव्यापासून उत्तर गोव्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी यंदा डेंग्यूचे रुग्ण आढळू लागलेले असून आरोग्य खात्यासाठी आता तो एक चिंतेचा विषय ठरला आहे. उत्तर गोव्यातील कळंगुट किनारपट्टीवर डेंग्यूने हाहाकार माजवलेला असून तेथे डेंग्यू रुग्णांची संख्या शंभरावर पोचली आहे. आतापर्यंत तेथे डेंग्यूची लागण झालेले 94 रुग्ण आढळले आहेत. त्यात आणखी सहा रुग्णांची भर पडल्यास डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या शंभरवर पोचणार आहे. कळंगुट येथे डेंग्यूसाठी 397 जणांची तपासणी करण्यात आली असता त्यापैकी तब्बल 94 जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे आढळून आले.

महिनाभरापूर्वी सांताक्रुझ मतदारसंघात डेंग्यूची लागण झालेले 80 रुग्ण आढळले होते. त्यामुळे सांताक्रुझ मतदारसंघात चिंतेचे वातावरण पसरले होते.
सध्या मडगाव, वास्को येथेही रुग्णांची संख्या वाढली आहे. तर अन्य शहरांत तसेच ग्रामीण भागांतही डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मलेरिया नियंत्रणात असतानाच राज्यात डेंग्यूचा फैलाव मात्र वाढू लागलेला आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली.

मोफत चाचणी मोहीम
डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर कळंगुट पंचायतीने मोफत डेंग्यू चाचणी मोहीम हाती घेतली आहे. तसेच रुग्णांना औषधेही पंचायतीच्यावतीने देण्यात येत आहेत.