कर्म करा, यश ‘तो’ देईल!

0
57
  • – डॉ. सीताराम घाणेकर

योगसाधना- ५४९, अंतरंगयोग- १३४

आता प्रत्येकाच्या लक्षात येईल की आपण सूक्ष्म कर्मे आपल्या हातानी करतो. म्हणून हात महत्त्वाचे आहेत. त्या हातांवर जेव्हा भगवंताचाच वास आहे- लक्ष्मी, सरस्वती, गोविंद… तेव्हा सत्कर्म तर घडेलच, पण पुरुषार्थदेखील सहज घडेल. म्हणून पहाटे उठता-उठता करदर्शन घेणे आवश्यक आहे

भारतीय संस्कृतीतील विचार अत्युच्च आहेत. पण त्यांचा व्यवस्थित शास्त्रशुद्ध अभ्यास- मनन- चिंतन- मंथन व्हायला हवे, तरच प्रत्येकाला आपल्या जीवनात योग्य उपयोग होईल. त्याला विशिष्ट ध्येय व दिशा सापडेल.
समस्या-संकटे प्रत्येकाला येतात. संत-महात्मे, महापुरुष, राजे-महाराजे या सर्वांना ती आली. अवतारांचा सखोल, सूक्ष्म अभ्यास केला की लगेच कळते की, राम-कृष्ण-बुद्ध या अवतारांनादेखील विविध परिस्थितीतून जावे लागले. आमच्यासारख्या सामान्यावर येतात त्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट, भयानक प्रसंग त्यांच्यावर आले.

यांतील कुणीही म्हटले नाही- ‘ठेविलें अनंते तैसेचि राहावें|’ हे नकारात्मक तत्त्वज्ञान आहे. प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि परिस्थितीवर मात केली. आपल्यातील प्रत्येकाने यापासून धडा घ्यायला हवा. त्यांच्याकडून जीवनाची कटू सत्ये समजावून घ्यायला हवीत, तरच प्रत्येकाचे जीवन सुखी-समाधानी होईल. जीवनात शांतता लाभेल.
भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंतांनी हेच तत्त्वज्ञान जगासमोर ठेवले आहे. प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले ‘गीता-संदेश’ या नावाने त्याचे संक्षिप्त सार सोपे करून सांगतात.
() केल्याशिवाय काही मिळत नाही.
() केलेले फुकट जात नाही.
() करण्याची शक्ती तुझ्यात आहे.
() काम करीत जा, हाक मारीत जा- मदत तयार आहे.
खरेच, ज्यांनी गीतेचा लक्षपूर्वक अभ्यास केलेला आहे, त्या व्यक्तीला या तत्त्वज्ञानाचे लगेच आकलन होईल.
शास्त्रीजी पुढे सांगतात की, ‘भारतीय संस्कृती अतिशय बुद्धिप्रामाण्यवादी आहे. स्वतः तपश्‍चर्या करून जगाला मुक्तीचा मार्ग मोकळा करून देणार्‍या मनुष्याला विश्‍वातील कोणतीही संस्कृती संत म्हणून पूजते; पण अशा परोपकारी गयागदाधराला भारतीय संस्कृतीने असुर ठरविले. कारण त्याने साधनेशिवाय मुक्ती दिली.
हा विचार, हे तत्त्वज्ञान किती श्रेष्ठ आहे यासंदर्भात शास्त्रीजी पुढे सांगतात ः
‘‘जगाच्या सुव्यवस्थित चक्रात याप्रमाणे हात घालण्याचा कोणाला अधिकार नाही. गयागदाधराचे कृतज्ञतापूर्वक स्मरण स्वीकारले-
गयागदाधराय नमः| काशी विश्‍वेश्‍वराय नमः|
असे म्हणून भगवंताने अगोदर पहिला नमस्कार त्याला केला, पण त्याला संत ठरविले नाही.
असे अजोड बुद्धिप्रामाण्य भारताशिवाय अन्यत्र कोठे पाहायला मिळते?’’
शास्त्रीजी म्हणतात ते अगदी खरेच आहे. आपली संस्कृती वेगळ्याच दृष्टीने विचार करते म्हणून तर तिचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे.

वर-वर विचार न करता पाहिले तर असा परोपकार करणारा माणूस सज्जन वाटतो. पण तो इतरांचा आळस पोसतो. त्याला कार्यरत करण्याच्या दृष्टीने काहीदेखील प्रयत्न करीत नाही.
आज समाजात अशा अनेक व्यक्ती आम्हाला दिसतात. त्यांचे कर्म सत्कर्म वाटते, पण सखोल विचार केला तर पटेल की ते करतात ते बरोबर नाही. प्रत्येकाने कष्ट करायलाच हवेत. घाम गाळायलाच हवा. त्यादृष्टीने त्यांनी इतरांना काम करण्यासाठी, कष्ट उपसण्यासाठी प्रेरित करायला हवे. त्यासंदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन उच्च ध्येयापर्यंत जाण्यासाठी मार्ग दाखवला पाहिजे.
ऋग्वेदामधील श्‍लोक असा आहे ः
न ऋते श्रान्तस्य सख्याय देवाः|

  • श्रम करून थकत नाही तोपर्यंत देवही मदत करीत नाहीत. हे वचन अभ्यासले तरी कळेल की प्रत्येकाने काहीतरी पुरुषार्थ करायलाच हवा. स्वतः काम करायचे नाही आणि फक्त ईश्‍वरकृपेवर अवलंबून राहायचे हे तत्त्वज्ञान, हा भाव योग्य नाही. त्यामुळे ती व्यक्ती अकर्माय बनते.
    यासंदर्भात प. पू. शास्त्रीजी म्हणतात ः
    ‘काहीच काम न करता केवळ बसून राहून स्वतःला भक्तामध्ये गणणारे कितीतरी आळशी लोक जगाचे पोरुषत्व नष्ट करण्यामध्ये जाणता-नेणता स्वतःचा भाग देतात.’
    शास्त्रीजींच्या या मतामध्ये तथ्य आहे, जीवनाचे सत्त्व आहे. म्हणूनच तथाकथित सत्कर्माबद्दल सारासार विचार व चिंतन करूनच त्याप्रमाणे वागायला हवे, नाहीतर आपणदेखील गयागदासारखे असुर ठरू.

आपल्याकडे प्रारब्ध व पुरुषार्थ हे दोन महान शब्द आहेत. प्रारब्ध पूर्वसंचिताप्रमाणे ठरते. पूर्वसंचित क्रियाकल्पाप्रमाणे एकत्र होते. पण तत्त्ववेत्ते म्हणतात की, प्रत्येकाने पुरुषार्थ हा करायलाच हवा. केव्हा केव्हा अपेक्षित फळ मिळत नसेल पण कर्मसंचित सिद्धांताप्रमाणे वाढेल व पुढील जन्माचे प्रारब्ध घडेल.
श्रीकृष्णाचा गीतेमध्ये संदेश स्पष्ट आहे-
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. त्यामुळे फायदा हा की कर्मकुशलता वाढते. कारण मन कर्मावर एकाग्र होते.
याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अर्जुनाने केलेला जयंद्रथ वध.
कुरुक्षेत्राच्या लढाईत कौरवांनी कपटाने व अनार्थाने तरुण अभिमन्यूचा वध केला. त्यावेळी जयंद्रथाने त्याच्या मृत शरीराच्या डोक्यावर लाथ मारली. अर्जुनाला आधीच पुत्रवधाचे दुःख होते. त्याला जयंद्रथाचा राग आला आणि त्याने प्रतिज्ञा केली की सूर्यास्तापूर्वी मी जयंद्रथाचा वध करून त्याच्या अपकृत्याचा सूड उगवीन.

कौरवांनी जयंद्रथासाठी चक्रव्यूह रचले. अर्जुन त्याच्यावर बाण सोडत होता, पण तो बाण त्याला लागत नव्हता. कारण सूर्यास्त होत आला होता व अर्जुनाचे लक्ष त्या मावळत्या सूर्यावर होते. शेवटी श्रीकृष्णाच्या ध्यानी ही गोष्ट आली. त्याने आपले सुदर्शन सोडून सूर्याला झाकले. क्षणभर काळोख झाल्याचा आभास झाला. सर्वांना आश्‍चर्य वाटले. कौरव बेसावध झाले हे लक्षात येताच श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले- ‘हा सूर्य आणि हा जयंद्रथ!’ कारण तोपर्यंत सुदर्शन बाजूला झाले होते.
यामध्ये चित्त, एकाग्रता व कर्मफल यांचे महान तत्त्वज्ञान आहेच, पण कर्म करणार्‍या व्यक्तीला ईशकृपेमुळे कधी मदत मिळते हाचेदेखील दर्शन होते.
एका संस्कृत सुभाषितामध्ये याबद्दल चांगले मार्गदर्शन आहे-
उद्योगिनः पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः
दैवेन देयमिति कापुरुषाः वदन्ति|
दैवेन विहाय कुरु पौरुषमात्म शक्त्या
यत्ने कृते यदि न सिद्धयति कोऽत्र दोषः॥

  • लक्ष्मी उद्योगी पुरुषांजवळ जाते. दैवाने लक्ष्मी मिळते असे दुर्बल बोलतात. दैवाचा विचार सोडून माणसाने स्वशक्तीने पुरुषार्थ केला पाहिजे. प्रयत्न करूनही कार्य सिद्ध झाले नाही तरीही त्यात नुकसान कसले?
    भारतात अनेक शास्त्रे पुराणकालापासून फार प्रगत आहेत. त्यातील एक म्हणजे ज्योतिषशास्त्र. यात विविध प्रकार आहेत. जन्मवेळेप्रमाणे नक्षत्र, तळहातावरील रेषा… ही प्रचलित आहेत. अनेक व्यक्ती त्याप्रमाणेच आपल्या सर्व कृती ठरवतात. सगळे आपल्या ग्रहावर व हातावरील रेषांवर अवलंबून राहतात.
    या रेषांबद्दल पूजनीय शास्त्रीजी छान सांगतात-
    ‘‘काही लोक प्रारब्धाच्या पांगळ्या आशेवर लटकत असतात. ते विसरून जातात की हातावरील रेषा आपल्याशिवाय कोणीच काढत नाहीत. अवश्य, या रेषांमधून संवाद निर्माण करण्याचे कार्य ईश्‍वरच करतो. पुरुषार्थाचा खरा पुजारी तर मस्त बसून गात असतो- मी भाग्याची पर्वा करीत नाही. मी भाग्य स्वतः घडवीन. एखादा ग्रह वाकडा पडला तर त्याला सरळ करीन. ईशकृपेने सिद्धी मिळते. परंतु ईशकृपा प्राप्त करण्यासाठी पुुरुषार्थाची आवश्यकता आहे.
    आता प्रत्येकाच्या लक्षात येईल की आपण सूक्ष्म कर्मे आपल्या हातानी करतो. म्हणून हात महत्त्वाचे आहेत. त्या हातांवर जेव्हा भगवंताचाच वास आहे- लक्ष्मी, सरस्वती, गोविंद… तेव्हा सत्कर्म तर घडेलच, पण पुरुषार्थदेखील सहज घडेल. म्हणून पहाटे उठता-उठता करदर्शन घेणे आवश्यक आहे- निर्विवाद त्यातील तत्त्वज्ञान, भावार्थ, मथितार्थ समजून.
    आपले योगसाधक तसे करतीलच म्हणा!
    (संदर्भ ः प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृतीपूजन- ‘करदर्शन’)