- – डॉ. सीताकांत घाणेकर
योगसाधना- ५६०, अंतरंगयोग-१४५
पूजेला फुले काढताना एक गोष्ट साधकाने लक्षात ठेवायला हवी की त्या फुलाला आपण रोपट्यापासून तोडून नेतो तेव्हा त्यांना हळुवार, प्रेमाने बोलत झाडापासून वेगळं केलं तर स्वतःलादेखील आनंद, संतोष मिळतो.
तत्त्ववेत्ते म्हणतात की विश्वात कारणाशिवाय काही घडत नाही. मग ती वैश्विक घटना, घडामोड असू दे अथवा व्यक्तीच्या जीवनातील गोष्ट असू दे. मानवाच्या तर कर्माप्रमाणेच सर्व काही शुभ-अशुभ, चांगले-वाईट घडते. कर्माप्रमाणे संचित आणि संचिताप्रमाणे प्रारब्ध!
शास्त्रकारदेखील तसेच सांगतात. कोणत्याही शास्त्रशुद्ध कर्मकांडामागे विशिष्ट हेतू, ध्येय, तत्त्वज्ञान असते. तसाच त्यामागे एक उच्च भावदेखील असतो. कुठलीही व्यक्ती या सर्व पैलूंचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय जेव्हा कर्मकांड करते तेव्हा त्यामध्ये उमेद नसते. तीच गोष्ट जेव्हा भावपूर्ण बनून केली जाते तेव्हा साधकाच्या मुखकमलावर एक सुंदर भाव दिसतो. तसेच त्याच्या हृदयातदेखील प्रेम असते. तो आनंदी, समाधानी असतो.
खरे म्हणजे प्रत्येक कर्मकांडामागे हाच भाव आहे. त्यामुळे कर्मकांड केल्यानंतर अपेक्षित फळदेखील मिळते.
वैदिक सनातन धर्मामध्ये पूजेच्यावेळी असेच एक वैशिष्ट्यपूर्ण, गोंडस कर्मकांड आहे. पंचामृत अभिषेक, स्नान. मग तो कुठलाही देव अथवा देवी असू दे. पाच वस्तू ज्या आपण वापरतो त्या म्हणजे दूध, दही, तूप, मध, शर्करा. मध्ये-मध्ये जलस्नान घालून पूर्वीची वस्तू मूर्तीवरून काढून टाकतात. पूजेचा हा सोहळा जर भाव-भक्तीपूर्ण डोळ्यांनी, हृदयाने बघितला तर हृदयगम्य वाटतो. बालपणात तर छोट्या-छोट्या मुलांना मजा वाटते. खरे म्हणजे अभिषेक करताना मुलांना याबद्दल सांगायला हवे, म्हणजे ते सगळे लक्षपूर्वक आत्मसात करतील.
प्रत्येक वस्तूचा अभिषेक घालताना पुजारी एक विशिष्ट श्लोक म्हणतो व यजमान स्नान घालीत असतो. पुजार्याने जर त्या श्लोकाचा अर्थ व त्यामागील भाव व्यवस्थित सांगितला तर प्रत्येक व्यक्तीचे लक्ष पूजेत राहील. पण बहुतेकांना त्यात रस नसतो. अनेकवेळा तर बहुतेकजण आपापसात कुजबुजत असतात अथवा आपल्याच विचारांत मग्न असतात. आता तर ‘वॉट्सऍप’ आहेच! पूजा संपल्यानंतर ज्यावेळी पंचामृत प्रत्येकाला दिले जाते, तेव्हा मात्र सर्वजण भानावर येतात. त्या प्रसादाचे प्राशन करतात. ती अमृततुल्य चव अनुभवतात. खरेच, तो अनुभवच वेगळा असतो.
आपण दूध व दही याबद्दल पुष्कळ सुंदर मुद्दे बघितले. आता तिसरी वस्तू म्हणजे घृत ः तूप स्नान.
नवनीतसमुत्पन्नं सर्वसंतोषकारकम्|
घृतं तुभ्यं प्रदास्यामि स्नानार्थं प्रतिगृह्यताम्॥
- नवनीतातून निर्माण होणारे आणि सर्वांना संतोष देणारे तूप मी तुला स्नानार्थ अर्पण करीत आहे. त्याचा कृपा करून स्वीकार कर.
तुपाचे वैशिष्ट्य त्याच्या स्निग्धतेत आहे. यासंदर्भात प. पू. पांडुरंगशास्त्री छान सांगतात-
‘भगवंताला घृतस्नान घालताना सतत लक्षात राहिले पाहिजे की आपले जीवनदेखील तुपासारखे स्निग्ध व स्नेहयुक्त बनवायचे आहे. आपले सर्व संबंध स्नेहमय राखायचे आहेत. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. जगण्यासाठी त्याला उबेची गरज आहे. मग ती ऊब मातेची असो, पित्याची असो, बंधूची अथवा भगिनीची असो, पतीची अथवा पत्नीची असो, मित्र अथवा स्नेह्याची असो. ऊब मिळाली तरच जीवन विकसित होते.
तसेच शास्त्रीजींनी हा उबेचा मुद्दा उत्कृष्टपणे मांडला आहे. ही ऊब देण्यासाठी काही विशिष्ट कष्ट घ्यावे लागत नाहीत. प्रत्येकाचे बोल, कर्म भावपूर्ण असले तरी फार झाले. मुख्य म्हणजे, प्रत्येकजण ही ऊब दुसर्याला देऊ शकतो. गरज आहे ती आध्यात्मिकतेची, आत्मीयतेची.
ही एक गोष्ट जर प्रत्येक व्यक्तीने आत्मसात केली व त्याप्रमाणे आचरण केले तर विश्वात आनंदवन फुलेल. स्वर्ग येईल. कुठल्याही लहानमोठ्या समस्या असल्या तरी प्रत्येकजण सुखा-समाधानाने, आनंदाने जगेल!
आपण भावपूर्ण अंतःकरणाने चौफेर नजर फिरवली तर सर्व निसर्गामध्ये हा सहयोग परिपूर्ण दिसतो. मग त्या वृक्षवनस्पती असू देत, अथवा पशुपक्षी असू देत. त्यामुळेच निसर्गामध्ये एक श्रेष्ठ, विशिष्ट चैतन्य दिसते. त्याच्या सान्निध्यात उच्च आनंद मिळतो.
पूर्वी ऋषींचे आश्रम तर घोर जंगलातच असायचे. तिथे सर्व आश्रमवासी, जनावरे, पशुपक्षी, गुण्यागोविंदाने एकमेकांना स्नेह, प्रेम, ऊब देत राहत असत. याचे एक कारण म्हणजे, निसर्गामध्ये स्वार्थ नसतो. त्यामुळे षड्रिपु- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार नसतो. जीवघेणी स्पर्धा नसते. त्याशिवाय आश्रम परिसरात तपस्वी, ऋषिमहर्षिंची उच्चकोटीची आत्मिक शक्ती असते. म्हणूनच आश्रम परिसरात वाघ-सिंह, कोल्हा, लांडगा… यांसारखे मांसाहारी हिंस्र पशूदेखील अगदी गाईसारखे नम्र असायचे. गुरे, घोडे, हत्ती, कुत्रा, मांजर, ससे, हरीण… ही शाकाहारी जनावरे एकत्र राहत असत. साप-अजगरदेखील जंगलात असत.
आपण अशा या गोष्टींवर, कथांवर विश्वास ठेवत नाही. पण बाबा आमटेंच्या आश्रमातदेखील असेच दृष्य पाहायला मिळते.
वैज्ञानिकांनी यासंदर्भात अनेक प्रयोग केले. वृक्ष-वनस्पतींना मशीनने पाणी घातले व हातांनी पाणी घातले. तेव्हा दुसर्या गटातील वनस्पती चांगल्या वाढल्या. काही कुंड्यांत रोपटी लावली. सर्वांना माती, खत, पाणी, वातावरण एकाच तर्हेचे. काहींकडे प्रेमाने बोलले, त्यांना कुरवाळले ती रोपटी व्यवस्थित वाढली. त्यांनी फुले-फळे दिली. काहींकडे तटस्थ भूमिका ठेवली. ती वाढली, पण तेवढी चांगली नाहीत. काहींना अक्षरशः शिव्याच दिल्या, ती लगेच कोमेजून गेली.
पूजेला फुले काढताना एक गोष्ट साधकाने लक्षात ठेवायला हवी की त्या फुलाला आपण रोपट्यापासून तोडून नेतो तेव्हा त्यांना हळुवार, प्रेमाने बोलत झाडापासून वेगळं केलं तर स्वतःलादेखील आनंद, संतोष मिळतो. त्यांना सांगायचे की मी तुला देवाच्या पूजेसाठी नेत आहे. तू देवाच्या डोक्यावर, हृदयाकडे अथवा पायाकडे असशील. त्या फुलाला काय कळेल, त्याच्या भावना काय असतील- मला माहीत नाही. पण तोडणार्याला नक्कीच समाधान मिळेल.
तसेच दुसर्या दिवशी निर्माल्याची फुले काढताना तसाच भाव ठेवायला हवा. फुलापासून आपण शिकायचे की हे जीवन क्षणभंगूर आहे. इतरांना आनंद देऊन जगणे यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे.
आपल्या जीवनात विविध संघर्ष येतात. त्यावेळी जर स्नेह असला तर कलह होत नाही. तिथे कर्कशता नसते.
यासंदर्भात शास्त्रीजी सांगतात-
‘अशा स्नेहयुक्त जीवनात संघर्ष जरी आला तरी तो आईचे स्तन व बालक यांच्यामधल्या संघर्षासारखा सहयोगात्मक संघर्ष असतो. ज्यात एका पक्षाला आनंद व दुसर्या पक्षाला पुष्टी मिळते.’
आपण योगसाधकदेखील सर्वांना ऊब, पुष्टी देत जीवनातील सर्व तर्हेच्या समस्यांना व संघर्षांना सामोरे जाऊया. मानवी जन्माचे सार्थक करूया.
(संदर्भ ः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृतिपूजन- पंचामृत)