पावसाळ्यातील अतिसार

0
78
  • डॉ. मनाली महेश पवार

गेल्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सर्वत्र पाणीच पाणी, चिखल, दमट हवा, दलदल, कोंदटपणा, निरुत्साह व त्याचबरोबर उलटी-संडास म्हणजे अतिसारचे रुग्ण. सर्वात जास्त प्रमाणात मुलांना या अतिसाराचा त्रास झाला. त्यामुळे मुलांबरोबर सगळ्यांनीच काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊ…

आला पावसाळा, तब्येत सांभाळा. गेल्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सर्वत्र पाणीच पाणी, चिखल, दमट हवा, दलदल, कोंदटपणा, निरुत्साह व त्याचबरोबर उलटी-संडास म्हणजे अतिसारचे रुग्ण. सर्वात जास्त प्रमाणात मुलांना या अतिसाराचा त्रास झाला. या काळात मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मुलं पावसाच्या साचलेल्या पाण्यात खेळतात आणि त्यांना रिमझिम पावसात भिजायलाही खूप आवडते. पण ही खेळकर वृत्ती त्यांना सध्या आजारी पाडत आहे. त्यामुळे मुलांबरोबर सगळ्यांनीच काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊ.
‘डायरिया’ म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती (संडास) होणे. यालाच ‘अतिसार’ म्हणतात. यामध्ये वारंवार संडासला होते. मलाचे प्रमाणही वाढते. हा आजार मुख्यतः दूषित, अस्वच्छ आहार सेवनामुळे व अशुद्ध पाण्यामुळे होतो. पावसाळा म्हटला की सर्वांना भजी-सामोशांसारखे तळलेले पदार्थ आवडतात व हे पदार्थ वारंवार खाल्ले जातात; जे पचायला जड असतात. त्याचबरोबर जर ते बाहेर रस्त्याच्या कडेच्या टपरींवरचे असतील तर त्यांना अस्वच्छतेची जोड असते म्हणजे जंतुसंसर्ग आलाच. अशा परिस्थितीत अतिसार होणारच. पाणीही या काळात गढूळ असते. त्यातही जंतुसंसर्ग असतो. पण गरम पाणी, उकळलेले पाणी आवडत नाही म्हणून बहुधा तसेच नळाचे पाणी पिले जाते. परिणामी अतिसार!
वैद्यकीय व्याख्येनुसार तीनशे ग्रॅमहून अधिक शौच होते. यात ६०-६५ टक्के पाणी असते. या व्याख्येनुसार अतिसार म्हणजे शौचास अधिक वेळा जावे लागणे किंवा शौच स्वतःच्या नियंत्रणाशिवाय अधिक वेळा होणे. तीव्र अतिसार एक आठवड्याचा वा दीर्घ म्हणजे २-३ आठवड्यांचा असतो. विषाणुजन्य आणि जिवाणुजन्य संसर्ग हे अतिसाराचे प्रमुख कारण आहे.

अतिसाराची लक्षणे

  • वारंवार म्हणजे २० पेक्षा जास्त वेळा संडासला होणे.
  • जलशुष्कता.
  • अस्वस्थपणा.
  • ताप येणे.
  • चिडचिडेपणा.
  • डोळे खोल जाणे, निस्तेज दिसणे.
  • घटा घटा पाणी पिणे.
  • त्वचेला चिमटा घेतल्यास हळूहळू पूर्ववत होणे.
  • पोटात दुखणे.
  • अंग गळल्यासारखे होणे.
  • भोवळ येणे किंवा बेशुद्ध अवस्थेत पडणे.
  • स्तन्यपान करणारे बाळ असल्यास स्तन्यपान टाळणे.

लहान बालकांमध्ये अतिसार असल्यास कोणती काळजी घ्यावी?
बाळाला अतिसार झाल्यास पालकांनी, विशेषतः मातांनी काही गोष्टींची विशेष खबरदारी घ्यावी. उदा.

  • बाळाला जेवण भरवण्यापूर्वी नीट स्वच्छतेची काळजी घ्यावी.
  • एका दिवसात तीनपेक्षा जास्त वेळा जुलाब झाल्यास लगेच ओ.आर.एस.चे द्रावण द्यावे.
  • अतिसार थांबेपर्यंत द्रावण देत राहावे.
  • बाळाला स्वच्छ हातांनी स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पाजावे.
  • बाळाच्या विष्ठेची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी.
  • स्तन्यपान करणार्‍या बालकांचे स्तन्यपान चालू ठेवावे.
  • शौचातून रक्त पडत असेल, पाणी कमी पीत असेल किंवा ताप येत असेल तर लगेच वैद्याचा सल्ला घ्यावा.
  • बाळाची तब्येत चांगली असेल तर ओ.आर.एस. (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) म्हणजेच मीठ, साखर आणि लिंबू पाण्याचे मिश्रण सतत देत राहावे. बाळाची तब्येत चांगली असल्यास इतर औषधांची गरज भासत नाही.
    अतिसारामध्ये बाळाला शौचाला किती वेळा होते यापेक्षा लघवीला किती वेळा होते याकडे लक्ष ठेवायला हवे. शरीरातील पाणी कमी होण्याची ती खूण असते.
  • मुलाची तब्येत चांगली नसल्यास आणि त्याला जुलाब पाण्यासारखे न होता त्यातून चिकट द्रव, आव आणि रक्त पडत असेल तर त्यास ‘आमांश’ असे म्हणतात. अशावेळी घरगुती उपाय न करत बसता बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाणे योग्य ठरेल. ताप असल्यास अधिक धोकादायक ठरू शकते.

अतिसारामध्ये घ्यायची काळजी
१. दूषित पाणी पिणे टाळा ः पावसाच्या दिवसांत जमिनीवरील कचरा, धूळ, माती थेट पाण्यात मिसळण्याचा धोका असतो. दूषित पाणी पोटात गेल्यामुळे पोटाचे विकार, अतिसार असे गंभीर आजार होऊ शकतात. हा धोका टाळण्यासाठी पावसाळ्यात उकळून थंड केल्यानंतर गाळून घेतलेले शुद्ध पाणी वापरावे. हे पाणी पिण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठी वापरावे. दिवसाला ७-८ ग्लास पाणी प्यावे. पाणी नेहमी काढ्यासारखे उकळावे व काढ्याप्रमाणेच गरम-गरम प्यावे. पाणी उकळल्यानंतर पाण्यातील अनेक घातक बॅक्टेरिया नष्ट होतात.
२. उघड्यावरील दूषित अन्न खाणे टाळा ः पावसाळ्याच्या दिवसांत माणसाची पचनशक्ती मंदावते. या दिवसांत उघड्यावरचे पदार्थ, तेलकट-तुपकट पदार्थ, शिळे पदार्थ खाणे टाळा. उघड्यावरचे पदार्थ दूषित असण्याची शक्यता असते. घरचे ताजे अन्न सेवन करावे. पचायला जड असणारे फास्ट फूड, मांसाहार, मासे टाळावे. साधं वरण-भात, सूपसारख्या पदार्थांचे सेवन करावे.
३. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खावे ः पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खावेत. हळद, आले, सुंठ, लसूण अशा पदार्थांचे सेवन करावे. डाळिंबासारखे फळ खावे. पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात. भाज्या कच्च्या खाऊ नयेत. त्या नेहमी चांगल्या शिजवून खाव्यात.
४. डासांपासून स्वतःचे रक्षण करावे ः पावसाळ्यात घर, कामाचे ठिकाण आणि भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच फुलदाण्या, झाडे स्वच्छ ठेवावी. परिसरात कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. घरात फिशटँक असल्यास खबरदारी घ्यावी. नियमित त्याचे पाणी बदलावे.
५. पदार्थ झाकून ठेवावे ः दमट, कोंदट हवेमुळे माश्या सारख्या पदार्थांवर फिरतात, बसतात. नंतर तेच पदार्थ आपण खातो व जंतुसंसर्ग होतो. म्हणून अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावेत.
६. पावसात भिजू नका ः पावसाळ्यात हवेतील गारव्यामुळे वातावरणात बॅक्टेरिया आणि जंतू यांचा प्रादूर्भाव जास्त असतो. या वातावरणात लवकर आजार होण्याचा धोका जास्त असतो. पावसातून आल्यावर कोमट पाण्याने हात-पाय धुवा. शक्य असल्यास कोमट पाण्याने आंघोळ करा.
७. नियमित व्यायाम करा ः घरातल्या घरात थोडा व्यायाम करावा. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

ओआरएस- जलसंजीवनी
‘ओआरएस’चे मिश्रण म्हणजे पाणी (उकळलेले), साखर व मीठ. याला ‘जलसंजीवनी’ असेही म्हटले जाते. ही जलसंजीवनी डायरिया या रोगात शरीराच्या बाहेर पडलेले पाणी भरून काढण्यासाठी उपयोगी पडते.

जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि क्षार बाहेर पडतात. त्यामुळे बाळाच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. ‘ओआरएस’ हे सर्वात प्रभावी रिहायड्रेशन द्रावण आहे. कारण त्यात ग्लुकोज आणि सोडियमचे उत्तम संतुलन असते. ‘ओआरएस’ अतिसार थांबवीत नाही; परंतु यामुळे हरवलेल्या द्रव आणि आवश्यक क्षारांची जागा घेते, ज्यामुळे डिहायड्रेशन रोखले जाते. हे फार्मसीत डब्ल्यूएचओ ओआरएस पावडर म्हणून मिळते. त्याचा छोटा पॅकेट एक ग्लास स्वच्छ पाण्यात टाकून ते तयार करतात. तसेच मोठे पॅकेट एक लिटर म्हणजेच पाच ग्लास स्वच्छ पिण्याच्या पाण्यात टाकून बनवतात. घरीच जर ‘ओआरएस’ बनवायचे झाले तर एक लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यात सहा चमचे साखर व अर्धा चमचा मीठ टाकून बनवावे. त्याची चव अश्रू एवढी खारट असावी. साखर जास्त झाल्यास डायरिया वाढू शकते. मीठ जास्त झाल्यास प्यायला जमत नाही. ‘ओआरएस’ पावडर फक्त स्वच्छ पाण्यातच मिसळावी. दूध, सूप, फळांच्या रसात मिसळू नये. तीन ते चार वेळा पातळ संडासला झाल्यास ‘ओआरएस’ सुरू करावे.