कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान

0
13

>> 13 मे रोजी मतमोजणी; 20 एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकृती

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. त्यासाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. राज्यात 10 मे रोजी मतदान होईल आणि 13 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना 13 एप्रिलला जारी करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांना 20 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल. 21 एप्रिलला उमेदवारांच्या अर्जांची छाननी होईल. 24 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.
कर्नाटकात एकूण 5 कोटी 21 लाख 73 हजार 579 मतदार आहेत. त्यातील नवमतदारांची संख्या 9 लाख 17 हजारांच्या घरात आहे. 80 पेक्षा अधिक वय असलेल्यांना या निवडणुकीत घरातून मतदान करण्याची मुभा असेल. 1 एप्रिलला वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्यांना देखील निवडणुकीत मतदान करता येईल. या निवडणुकीत 224 मतदान केंद्रांवर तरुण कर्मचारी असतील आणि 100 केंद्रांवर दिव्यांग कर्मचारी तैनात असतील.
कर्नाटकात विधानसभेचे एकूण 224 मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत भाजपने 104, काँग्रेसने 80, तर जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने निवडणूकोत्तर आघाडी केली आणि काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रिपद दिले; मात्र हे सरकार फार काळ टिकू शकले नाही. काँग्रेस, जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामे दिले. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले. सध्या विधानसभेत भाजपचे 117, काँग्रेसचे 69, तर जेडीएसचे 32 आमदार आहेत.