>> सिद्धरामय्यांना पसंती; शिवकुमार मुख्यमंत्रिपदावर ठाम
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटले तरी अद्याप काँग्रेसला मुख्यमंत्र्यांची निवड करता आलेली नाही. नवा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत काँग्रेसमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोघेही मुख्यमंत्रिपदावर दावा करत असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर अडचण निर्माण झाली
आहे.
पक्षाकडून शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्ष पदासह उपमुख्यमंत्रीपद आणि दोन महत्त्वाची खाती देऊनही ते मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर दुसऱ्या बाजूला येत्या 48 ते 72 तासांत कर्नाटकात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार असल्याचे कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी
म्हटले आहे.
राहुल गांधींनी घेतली दोन्ही नेत्यांची भेट
बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांशी राहुल गांधींनी स्वतंत्रपणे अर्धा तास चर्चा केली. मात्र या बैठकीनंतरही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकली नाही. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले.