कथा एका झपाटलेल्या शिक्षकाची!

0
28
  • ज. अ. रेडकर

सुगंधी फूल कुठेही फेकले तरी त्याचा परिमळ आसमंतात आपोआप पसरतो. त्याचप्रमाणे केवळ एका वर्षात या शाळेने जगाचे लक्ष वेधून घेतले. दूरवरून लोक शाळा बघायला येतात आणि आश्चर्यचकित होतात. अलीकडेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 1 मे 2024 रोजी सुपर संगणक बनवणारे भारतीय वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी या शाळेला भेट दिली आणि मुलांची विज्ञान व संगणक शिक्षणातील पारंगता पाहून ते थक्क झाले. या देशातील अनेक शाळा त्यांनी पहिल्या आहेत, पण दत्तात्रय वारे गुरुजींची ही शाळा पहिल्या क्रमांकाची कौशल्यपूर्ण शाळा आहे असे त्यांनी तिथेच जाहीर केले.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे सरकार दुर्लक्षित शाळा. पालकांची अनास्था, निरुत्साही वातावरण, असुविधांनी युक्त अशा मोडक्या व गळक्या इमारती, रंग उडालेल्या भिंती, फक्त पाट्या टाकणारे शिक्षक आणि शाळेतील गबाळग्रंथी अन्‌‍ अस्वच्छ विद्यार्थी अशा प्रकारचे एक प्रदूषित चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. परंतु या कल्पनेला छेद देणाऱ्या काही शाळांविषयी सोशल मीडियावर काही पोस्टस्‌‍ वाचनात आल्या आणि या शाळा प्रत्यक्ष पाहाव्यात, तिथल्या शिक्षकांना भेटावे अशी ऊर्मी मनात जागी झाली. गेल्या दोन वर्षांत गोव्यापासून शेकडो कि.मी. दूर असलेल्या दुर्गम भागातील चार शाळांना उत्सुकतेपोटी मी भेटी दिल्या. त्यांतील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी या शाळेला सर्वात आधी भेट दिली याचे कारण म्हणजे श्री. दत्तात्रय वारे गुरुजी यांनी अथक परिश्रमाने आणि कल्पकतेने तिथे ग्लोबल व डिजिटल शाळा निर्माण केली होती. तरीही केवळ राजकीय दबावामुळे आणि आकसाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असे वाचनात आले होते.

वाबळेवाडीची शाळा म्हणजे देशातील प्राथमिक शाळेचे अप्रतिम मॉडेल म्हणावे लागेल. एकेकाळची उजाड माळरानावरची दोन खोल्यांची पहिली ते चौथीपर्यंतची साठ-सत्तर पटसंख्या असलेली ही शाळा दहा वर्षांत पहिली ते आठवीच्या वर्गांपर्यंत पोहोचली होती आणि आज तिचा पट सातशे पन्नासपर्यंत गेला होता. शिवाय आणखी शे-सव्वाशे मुले प्रवेश मिळवण्यासाठी वाट पाहत होती. उजाड माळरानावर सुबक, सुंदर आणि निसर्गरम्य असे शिल्प साकार झाले होते आणि याचे प्रेरणास्थान होते श्री. दत्तात्रय वारे गुरुजी. या मॉडेलचा उल्लेख महाराष्ट्राचे ठाकरे सरकारातील अर्थमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी विधानसभेत गौरवाने केला होता आणि अशा प्रकारच्या पन्नास शाळा येत्या वर्षभरात तयार करण्याचा संकल्प सोडला होता. तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री श्री. बच्चूभाऊ कडू यांनी शाळेला भेट देऊन शिक्षकांचा गौरवाने उल्लेख केला होता. अशा पार्श्वभूमीवर या शाळेचे शिल्पकार श्री. दत्तात्रय वारे यांच्यावर खोट्या आरोपांचे बालंट आणून निलंबित केले गेले. पण वारे गुरुजी लेचेपेचे मुळीच नव्हेत! सधन शेतकरी कुटुंबातील हा उच्चशिक्षित पन्नाशीतील ध्येयवादी तरुण! त्यांनी निकराने झुंज दिली आणि आपले निर्दोषत्व सिद्ध केले. ‘जोपर्यंत आपणास न्याय मिळत नाही तोपर्यंत पायांत चप्पल घालणार नाही’ असा निर्धार त्यांनी केला. आजही ते अनवाणीच चालतात. विविध ठिकाणी ते रिसोर्स पर्सन म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी अनवाणी जातात. दिल्लीसारख्या ठिकाणी होणाऱ्या शैक्षणिक सेमिनारमध्येही ते अनवाणीच सहभागी होतात. आपल्यावर अन्याय झाला याची जखम त्यांच्या मनात भळभळत राहिली. सुमारे दोन वर्षांच्या लढाईनंतर त्यांना न्याय मिळाला खरा, परंतु शिक्षण अधिकाऱ्याची खुन्नस काही कमी झाली नाही. आपण लावलेल्या चौकशीचे षडयंत्र असफल झाले या रागाने असेल कदाचित, पण या अधिकाऱ्याने वारे यांची नियुक्ती पुन्हा वाबळेवाडीत न करता अशा शाळेत केली, ज्या शाळेची पटसंख्या फक्त आठ होती आणि रोजची उपस्थिती तीन असायची. यामागचा दुष्ट हेतू हा होता की, कोणत्याही क्षणी ही शाळा बंद पडेल आणि वारे गुरुजींना आणखी अडचणीच्या शाळेत पाठवता येईल. एका कर्तबगार, प्रयोगशील आणि राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या तथा अन्य अनेक गौरवशाली सन्मान मिळवलेल्या शिक्षकाला अशा प्रकारे पराकोटीचा त्रास देणारे, छळणारे आणि खुन्नस ठेवणारे शिक्षणाधिकारी असतात यावर विश्वास बसणे केवळ अशक्य. पण असे घडले खरे!
वारे गुरुजींची निर्दोष मुक्तता होणार ही बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. ती समजताच आसपासच्या तालुक्यांतील आठ ग्रामपंचायतींनी वारे गुरुजींची नियुक्ती आपल्या गावी व्हावी असा ठराव पारित करून शासनाला पाठवला. वाबळेवाडीच्या शाळेसारखी आपलीही शाळा ग्लोबल व्हावी अशी या ग्रामस्थांची इच्छा होती.

दोन वर्षांच्या लढाईनंतर फेब्रुवारी 2022 रोजी वारे गुरुजी खेड तालुक्यातील जालिंदरनगर (कनेरसर) या प्राथमिक शाळेत रुजू झाले. खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या कडेकपारीत विसावलेले जालिंदरनगर म्हणजे पंचवीस तीस घरांची आणि शे-दीडशे लोकवस्ती असलेली चिमुकली वस्ती! शाळा म्हणजे गळक्या छपरांच्या दोन खोल्या आणि रंग उडालेल्या मातीच्या भिंती. या वास्तूला शाळा म्हणणे धाडसाचे ठरले असते. ना पटांगण, ना स्वच्छतागृह, ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना आणखी काही! ओसाडवाडीची ओसाड शाळा पाहून ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे विचार वारे गुरुजींच्या मनात आल्याशिवाय राहिले नसतील. परंतु वारे गुरुजी हार मानणारे थोडेच होते! शिक्षणाधिकाऱ्यांनी आपणाला ही अडगळीतील आणि अडचणींनी घेरलेली शाळा मुद्दाम दिलेली आहे हे ते ओळखून होते. पण हे आव्हान समजून अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून त्यांनी वर्षभरात शाळेचे रंगरूपच पालटून टाकले. ज्या शाळेची पटसंख्या सुरुवातीला आठ एवढी होती ती एका वर्षात एकशे पंचवीस झाली आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षातील नवीन नोंदणीनुसार ही संख्या दोनशेहून अधिक होणार आहे. वीस-बावीस कि.मी. अंतरावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुले वारे गुरुजींच्या या शाळेत येऊ लागली आहेत. विविध गावांतील पालकांनी त्यासाठी खास स्कूल बसेस उपलब्ध केल्या आहेत. स्वतः वारे गुरुजी शाळेपासून वीस कि.मी. अंतरावरील जातेगाव येथून आपल्या छोट्या गाडीने येत असत. येताना वाटेतील मुलांना आपल्या गाडीत घेत असत. परंतु पुढे ही संख्या वाढली तेव्हा एका पालकाने आपली सुमो गाडी त्यांच्या दिमतीला दिली. इतका विश्वास, इतका सन्मान आणि आदर क्वचितच कुणाला लाभला असेल. गावातील श्री. चांगदेव झोंडगे आणि रामभाऊ झोंडगे या बंधूंनी शाळेसाठी आपली एक एकर जमीन दान केली, जिचा तिथे आजचा बाजारभाव चार कोटी रुपये आहे. (इमारत वाढीसाठी लागणारी आणखीही जमीन द्यायला गावकरी तयार आहेत असे वारे गुरुजी बोलताना म्हणाले.) जन सहभाग आणि श्रमदान यातून नवीन इमारत उभी राहिली. अनेकांचे हात या कामाला लागले.

वारे गुरुजींनी गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. लोकांना त्यांनी कामे वाटून दिली आणि त्यांनी ती बिनबोभाट पार पाडली. शाळेभोवती कंपाऊंड वॉल बांधून त्यावर शिव छत्रपतींची संपूर्ण जीवनकहाणी चित्रित करून घेतली. म्हणजे पुस्तकी इतिहास वेगळा शिकवण्याची गरजच भासू नये! शाळेसाठी आवश्यक असे स्वच्छतागृह बांधून घेतले. पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली. पुस्तकांचे भांडार उपलब्ध केले. प्रयोगशाळा कक्ष निर्माण केला. शाळेसमोर छोटे पटांगण तयार करून घेतले. सोलर पॅनल बसवून विजेची गरज पूर्ण केली. कंपाऊंडच्या सभोवताली फॉगचे फवारे सोडणारी यंत्रणा उभी केली ज्यामुळे उन्हाळ्यात शाळेचे वातावरण अतिशय शीतल राहील. मुलांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून डोंगरावरील भाग सपाट करून घेतला. मुलांना ट्रॅकिंगची आवड निर्माण केली.
राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमाबरोबरच येथे सीबीएससी आणि आयबीचा काही भाग शिकवला जातो. तिसरी-चौथीतील मुलं 12 वीच्या वर्गाचे पदार्थविज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास शिकतात. या मुलांनी प्लास्टिक पाईप्स वापरून रोबोट बनवला आहे आणि तो भारतीय भाषांसह इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषेतून कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर देतो. इतक्या लहान वयात ग्रामीण भागातील मुले हे अवघड काम कसे काय करू शकतात? याचे नवल वाटल्याशिवाय राहत नाही. दुसरे नवल म्हणजे, इथली मुले आपल्या कामात इतकी गर्क असतात की शाळेला भेट देण्यासाठी कोण आला, कोण गेला याकडे त्यांचे लक्ष नसते. ती आपल्या कामात मश्गुल असतात. या शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा निरंतर चालते. कोणतीही सुट्टी या शाळेला नाही. उन्हाळी सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी या काळात ही मुले स्वयंस्फूर्तीने शाळेत येतात आणि आपल्याला जे आवडते ते करतात. कुणी चित्रे काढतो, कुणी कलाकुसरीची कारागिरी करतो, कुणी पुस्तके वाचतो, कुणी वैज्ञानिक प्रयोग करतो, कुणी संगणकावर कोडिंग-डीकोडिंग करतो. ज्याला जे आवडेल ते त्याने करावे. वारे गुरुजी त्यांच्या सोबतीला असतातच!
इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषांतून ही मुले इंटरनेटच्या माध्यमातून परदेशातील मुलांशी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधतात. एवढेच काय पण जवळच्या औद्योगिक कंपन्यांत परदेशी शिष्टमंडळ भेटीसाठी येते तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सहाय्य म्हणून दुभाषकाचे काम ही छोटी मुलं करू शकतात. या उपकारातून उतराई होण्यासाठी या कंपन्या शाळेसाठी जे जे लागेल ते ते द्यायला तत्पर असतात. सर्व सुविधांनिशी काचेच्या भिंतीची शाळा उभी राहण्यात या कंपन्यांची मोलाची मदत झाली आहे.

सुगंधी फूल कुठेही फेकले तरी त्याचा परिमळ आसमंतात वाऱ्यावर आपोआप पसरत जातो. त्याचप्रमाणे केवळ एका वर्षाच्या काळात या शाळेने जगाचे लक्ष वेधून घेतले. दूरवरून लोक शाळा बघायला येतात आणि आश्चर्यचकित होतात. अलीकडेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 1 मे 2024 रोजी सुपर संगणक बनवणारे भारतीय वैज्ञानिक आदरणीय पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी या शाळेला भेट दिली आणि मुलांची विज्ञान व संगणक शिक्षणातील पारंगता पाहून ते थक्क झाले. या देशातील अनेक शाळा त्यांनी पहिल्या आहेत, पण ही शाळा पहिल्या क्रमांकाची कौशल्यपूर्ण शाळा आहे हे त्यांनी तिथेच जाहीर केले.

केवळ एका वर्षाच्या काळात या शाळेने पुणे जिल्हा परिषद अध्यक्षीय चषक, सुंदर शाळेसाठी मिळणारा मुख्यमंत्री चषक आणि विज्ञान प्रयोगासाठी असणारा डॉ. विजय भटकर पुरस्कार मिळवला. असे मानाचे पुरस्कार सहजासहजी मिळत नसतात, त्यासाठी शिक्षकांनी अविरत कष्ट घेतलेले असतात हे विसरता येणार नाही. अशा व्रतस्थ शिक्षकांना पालक आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले नसते तरच नवल. (वारे गुरुजी यांचे निलंबन झाले तेव्हा वाबळेवाडीचे समस्त ग्रामस्थ वारे गुरुजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. इतकेच काय पण वारे गुरुजींवर अन्याय करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांनी गावबंदी केली होती. त्यांना काळी निशाणे दाखवून आपला संताप व्यक्त केला होता) बंद पडणाऱ्या एका शाळेला वारे गुरुजींनी मोठ्या कुशलतेने नवसंजीवनी दिली आणि आपल्या कर्तृत्वाने त्या अकारण आकस धरलेल्या अधिकाऱ्याचे दात त्याच्याच घशात घातले. शाळा सुधार कार्याला शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप मसुडगे यांचे उत्तम सहकार्य लाभते असे वारे गुरुजी मुद्दाम नमूद करतात.

या शाळेपर्यंत पोहोचणे शक्य झाले ते माझे पुणे येथील मावसबंधू नयन केरकर याच्यामुळे! तो पुण्यातील रहिवासी असल्याने पुण्यापासून सुमारे पन्नास कि.मी. अंतरावर असलेले दुर्गम व डोंगराळ भागातील जालिंदरनगर (कनेरसर) शोधून काढणे शक्य झाले. शाळेजवळ जाणारी वाट इतकी बिकट की मनात यायचे उगाच मी माझ्या या बंधूला संकटात टाकले. कोणत्याही क्षणी गाडी पंक्चर झाली तर काय करणार ही भीती मनात असायची. पण प्रत्यक्ष शाळेत पोहोचल्यावर आपण इथे आलो नसतो तर एका वेगळ्या आणि अद्भुत अनुभवाला मुकलो असतो याची जाणीव आम्हा दोघांनाही झाली. प्रत्येक शिक्षणप्रेमी व्यक्तीने आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वाबळेवाडी (शिरूर), विठ्ठलवाडी (दौंड) आणि जालिंदरनगर (खेड) या शाळांना अवश्य भेटी द्याव्यात म्हणजे आपण कुठे आहोत याची जाणीव होऊ शकते आणि त्याचबरोबर नवीन संकल्पना आणि नवीन ऊर्जा घेऊन आपण आपल्या कार्यात याचा उपयोग करू शकतो.

एक अतिशय उजाड, उदास व भकास अशी दिसणारी जिल्हा परिषदेची ही सरकारी शाळा आता आपल्या अलौकिक सौंदर्याने आणि आधुनिक शिक्षणप्रणालीने सर्वांना भुरळ घालत आहे. खाजगी शाळांही लाजवेल अशी काचेची इमारत डौलाने उभी राहिली आहे. एक तृतीयांश वेळेतच अभ्यासक्रम पूर्ण करणे, मित्रांच्या मदतीने शिक्षकाला समकक्ष यंत्रणा उभी करणे, एकात्मिक अभ्यासक्रम प्रणाली राबवून वयापेक्षा व इयत्तेपेक्षा पुढे जाण्याची संधी प्रत्येकाला उपलब्ध करून देणे, हसत-खेळत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण, लोकसहभागातून गाव व शाळा यांचे अतिशय घनिष्ठ असे मिश्रण तयार करून त्याद्वारे सरकारी शिक्षण प्रक्रियेमधील सर्वोत्कृष्ट मॉडेल उभे करणे या सर्व गोष्टी श्री. वारे सर यांच्या कल्पकतेतून आणि नियोजनातून घडत गेल्या.

ही प्रयोगशील शाळा पाहाण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून भेटी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमधून शिक्षकांनी भेटी दिलेल्या आहेत. अतिशय दुर्गम भागातही शून्यातून झेप घेत आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अल्पावधीत उभी राहू शकते ही प्रेरणा या ठिकाणावरून मिळत असल्याचे भेटी देणाऱ्यांनी बोलून दाखवले आहे.
‘चांगले काम करू नका, नाहीतर तुमचा वारे गुरुजी होईल’ अशी धमकी इतर शिक्षकांना देणारे अधिकारी आता मनातल्या मनात चरफडत असतील. या नकारात्मक पार्श्वभूमीवर चांगले काम करूनही श्री. वारे सरांवर निलंबनाची कारवाई झाली. दोन वर्षे त्यांना मनस्ताप दिला गेला. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही सर्वसामान्य शिक्षकाने अगदी सहजपणे असा विचार केला असता की इतके उत्तुंग शिखराचे काम करूनही आणि राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या शिक्षकावर जर आकसाने कारवाई होत असेल तर कशाला मरमरून चांगले काम करायचे? इतर शिक्षकांप्रमाणे पाट्या टाकून गप्प राहिलेले बरे! मात्र श्री. दत्तात्रय वारे यांनी असा नकारात्मक विचार न करता जालिंदरनगर शाळेसारखी केवळ आठ मुले असलेली मरणासन्न शाळादेखील अखंड प्रयत्न केल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाची होऊ शकते हे स्वप्न उराशी बाळगले व अल्पावधीत ते स्वप्न साकार करून दाखवले.

श्री. वारे सर यांनी तन-मन-धन खर्च करून कल्पकतेने एका बंद पडू पाहणाऱ्या शाळेला नवसंजीवनी तर दिलीच पण तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले. श्री. दत्तात्रय वारे सर, तुमच्या जिद्दीला सलाम! तुम्ही मोठेच किमयागार आहात! तुम्ही ज्याला स्पर्श करता त्याचे सोने होते! तुमच्या मेहनतीला आणि कर्तृत्वाला लक्ष तोफांची सलामीदेखील अपुरी आहे.