कठोर कारवाई करा

0
25

बाणस्तारीतील भीषण अपघात थरकाप उडवणारा आहे. तीन निरपराध माणसे त्यात हकनाक बळी गेली. चार जायबंदी झाली. एका मद्यधुंद मर्सिडीज चालकाची बेपर्वाई हकनाक निष्पापांचा जीव घेऊन गेली आहे. कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, मुले पोरकी झाली आहेत. एका अपघातग्रस्त दुचाकीवरील महिला तर पुलावरून उसळून थेट नदीत पडली, यावरून अपघात घडवणाऱ्या वाहनाचा वेग किती प्रचंड असावा हे लक्षात येते. या अपघातासंदर्भात जी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून समोर आली आहे, ती पोलिसांच्या आणि वाहतूक विभागाच्या एकूण कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. अपघात झाला तेव्हा ते वाहन महिला चालवत होती असा दावा प्रत्यक्षदर्शी करीत आहेत. विशेष म्हणजे सदर आलिशान वाहनही त्या महिलेच्या नावावर नोंदणीकृत आहे. पोलिसांनी अटक मात्र तिच्या नवऱ्याला केली आहे. तोही मद्यधुंद अवस्थेत होता असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याच्यावर मद्याच्या नशेत वाहन चालवल्याचा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 304 चा म्हणजे निष्काळजीपणामुळे दुसऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा अखेरीस जनतेच्या रेट्यामुळे नोंदवला आहे खरा, परंतु प्रत्यक्षात अपघात झाला ती वेळ आणि ही कलमे लावून गुन्हा नोंदवला जाण्याची वेळ यातली तफावत पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित करणारी आहे. अपघातग्रस्त कार महिला चालवत नव्हती कशावरून? अपघात झाला रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी आणि अटक झाली पहाटे चार वाजता. म्हणजे पुढील कायदेशीर सोपस्कार होईपर्यंत गुन्हेगाराच्या जामीनाची तजवीज व्हावी, त्याला पोलीस कोठडीत रात्र घालवावी लागू नये याची जय्यत तयारी झाली होती का? अपघातग्रस्त वाहन आपण चालवत असल्याचा दावा करण्यासाठी कारमालकाचा वाहनचालक पोलीस स्थानकात दाखल झाला होता अशीही नवी माहिती आता समोर आली आहे. हे सगळे संशयास्पद आहे व याची शहानिशा झाली पाहिजे. पोलिसांवर या अपघातासंदर्भात काही दबाव होता हे तपासले जाण्याची आवश्यकता आहे, कारण सामान्य परिस्थितीत, एखादा किरकोळ अपघात जरी झाला तरी पोलीस चालकाला दे माय धरणी ठाय करून सोडत असतात. त्यामुळे येथे कारवाईत पोलिसांनी सुरुवातीला हात आखडता का घेतला हे पाहण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे हा अपघात चुकीने झालेला नाही. सरळसरळ बेपर्वाईमुळे झालेला आहे. त्यामुळे तो तितक्याच गांभीर्याने घेतला गेला पाहिजे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा भीषण अपघात होण्यापूर्वी गेल्या दोन महिन्यांत याच वाहनाला आर्टिफिशिलय इंटेलिजन्सयुक्त वाहतूक कॅमेऱ्यांतून तब्बल सातवेळा भरधाव वाहन चालवल्याबद्दल ऑनलाइन चलन पाठवले गेले आहे. त्यातील एकाही चलनाचे पैसे भरले गेले नव्हते. दंडाचे ऑनलाइन चलन पाठवूनही दंड न भरणारा हा वाहनचालक सातत्याने एवढ्या बेफिकिरीने वाहन चालवत असल्याचे दिसत असूनही वाहतूक खाते संबंधित वाहनावर पुढील कारवाई करण्यास का धजावले नाही, याचे उत्तर सरकारने जरूर द्यावे. मद्याच्या नशेत झालेला अपघात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हे असे मुख्यमंत्री महोदय काल विधानसभेत म्हणाले, पण सातवेळा कायदेभंग करणारा मोकळा कसा काय राहिला? ही तर कायद्याची थट्टा आहे! त्याच्यावर वेळीच कारवाई झाली असती, तर हे जे हकनाक बळी गेले, ते गेले नसते, कुटुंबे उद्ध्वस्त झाली नसती. गोव्यात कोणीही सोम्या-गोम्या मंत्र्यासंत्र्याचा नातलग निघतेो. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कारवाईत हात आखडता घेतात. त्यात अपघात घडवणारी व्यक्ती हायप्रोफाईल असेल तर बघायलाच नको. सामान्य दुचाकीस्वारांना हेल्मेट घातले नाही तरी तालांव देणारे वाहतूक पोलीस मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू दिसली तर मात्र पाठ फिरवतात, डोळेझाक करतात आणि त्यांचे वरिष्ठ त्यांना ती करायला भाग पाडतात ही शरमेची बाब आहे. दिल्लीमध्ये निर्मलसिंग नावाच्या एका वाहतूक पोलीस उपनिरीक्षकाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वाहनाला टाळे ठोकले होते आणि त्याच्या वरिष्ठ किरण बेदींनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. आज असे वरिष्ठ अधिकारी सापडणे तर अवघड आहेच, उलट एका वशिल्याच्या फोनपुढे सरपटू लागणाऱ्यांचीच चलती आहे. बाणस्तारी अपघातात पोलिसांनी जनतेच्या दबावामुळे गुन्हे जरूर नोंदवले आहेत, परंतु प्रकरण कोर्टात उभे राहीपर्यंत हे प्रकरण कमकुवत केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांकडून गुन्हेगाराची पाठराखण होणार नाही आणि तीन बळी घेणाऱ्या यमदूताला त्याच्या कृत्याची कठोर सजा मिळेल अशी आशा करूया.