कचरा समस्या सोडवण्यासाठी ‘क्यूआर कोड’ची मदत

0
24

>> सुमारे 850 घरांवर बसवले क्यूआर कोड; आमोणा पंचायतीचा अभिनव उपक्रम

कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी आमोणा पंचायतीने अभिनव उपक्रम सुरू केला असून, त्यामुळे कचऱ्याची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होणार आहे. आमोणा पंचायतीने सरपंच कृष्णा गावस यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. घरोघरी कचरा उचल करण्यासाठी पंचायतीने ‘क्यूआर कोड’चा आधार घेतला असून, आमोणा पंचायत क्षेत्रातील सर्वच्या सर्व जवळपास 850 घरांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. कचरा उचलल्यानंतर सदर क्यूआर कोड पंचायतीच्या कामगारांकडून स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे त्या त्या घरातील कचरा उचलल्याची माहिती ऑनलाईन पध्दतीने पंचायतीत जमा होणार आहे, अशी ही योजना आहे. परिणामी कोणत्या घरातील कचरा उचलला आणि कोणत्या घरातील कचरा उचलला नाही हे स्पष्ट होणार आहे. या उपक्रमामुळे कचरा उचलला जात नाही, ही ग्रामस्थांची तक्रार नाहीशी होणार आहे.

आमोणा पंचायतीने मिनरल फाऊंडेशनच्या सहकार्याने आमोणा गाव पूर्णपणे कचरामुक्त करण्याचा संकल्प सोडला असून, नवीन हायटेक कचरा उचल योजना हाती घेतली आहे. सर्व घरांवर क्यूआर कोड लावला आहे. प्रभागनिहाय कचरा उचलण्याचे दिवस ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार पंचायतीची एक गाडी आणि सफाई कर्मचारी प्रत्येक घरामध्ये जाऊन कचरा गोळा करेल आणि त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करेल. त्यामुळे कोणत्या घरातून कचरा उचलला आहे किंवा नाही याची माहिती पंचायतीत जमा होईल.

आमोणा पंचायत क्षेत्रातील आंबेशीवाडा येथून या योजनेला प्रत्यक्षात प्रारंभ झाला. यावेळी सरपंच कृष्णा गावस, उपसरपंच दिया सावंत, पंचसदस्य गौरवी गावस, वसंत सिनरी, सागर फडते, अनिश आमोणकर, वासुदेव घाडी, मिनरल फाऊंडेशनचे प्रकल्प कार्यकारी सुरज गावकर आदींची उपस्थिती होती.

लोकांचे सहकार्य हवे : सरपंच कृष्णा गावस

आमोणा गाव कचरामुक्त करण्यासाठी पंचायतीने पुढाकार घेतला आहे. लोकांनाही या मोहिमेला सहकार्य करताना आपला कचरा उघड्यावर टाकू नये. पंचायतीची गाडी व सफाई कर्मचारी प्रत्येक घराच्या दारात येऊन कचरा गोळा करणार आहे. त्यांनाही लोकांनी सहकार्य करावे. आपला कचरा ठरलेल्या दिवसांप्रमाणे घराच्या बाहेर आणून ठेवावा, असे आवाहन सरपंच कृष्णा गावस यांनी केले आहे.