‘ओकारी’वर रामबाण होमिओपॅथी

0
63
  • डॉ.आरती दिनकर
    (होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक पणजी)

उलटी होत असताना पोटात गॅस साठून राहत असल्यास अन्नातील साखर अथवा कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ कमी करावेत. थोडे दिवस तेलकट-तुपकट, तिखट, चमचमीत पदार्थ खाणे टाळावे. वाजवीपेक्षा जास्त खाणे टाळावे, पचेल तेच खावे. पाणी भरपूर प्यावे.

ओकारी किंवा उलटी हे लक्षण बहुदा दुसर्‍या इतर रोगात झालेले दिसून येते परंतु कधी कधी हे स्वतंत्रपणेही उद्भवते. हे लक्षण गंभीर स्वरूपाचे झाल्यास रुग्णास सतत त्रास होऊ शकतो. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. काही काही रुग्णांना हा त्रास वारंवार होत असतो. बरेचदा काही जण म्हणतात फक्त उलटीच होते ना एवढं काय त्याच्यामध्ये? पण हे सामान्य वाटणारे लक्षण कधीकधी घातक ठरू शकते, रुग्णास अस्वस्थ करते. यावर होमिओपॅथीची औषधे म्हणजे रामबाण उपाय आहेत.

उलटी होणे हे अपचनाचे प्रमुख लक्षण होय. अन्नघटकदोष हे याचे मुख्य कारण होऊ शकते. न पचणारे अन्न, जास्त खाणे किंवा भूक लागली असताना न खाणे किंवा खाण्यामध्ये अनियमितता तसेच सांसर्गिक रोगामध्ये रक्तामधून वाहणारे विषारी पदार्थ किंवा लहान मुलांना दुधामधून जठरामध्ये जाणारे जंतु यामुळे जठराचे रोग (उलटी सारखे) उत्पन्न होऊ शकतात.

आपण मागील पोटदुखीच्या लेखामध्येही पाहिले आहे की पोट दुखणे व फुगणे, जुलाब होणे ही अपचनाची मुख्य लक्षणे आहेत. ज्या रुग्णांना हा त्रास लहानपणापासून सुरू होतो तो मोठेपणीही चालूच असतो. याचे कारण अपचन आहेच. घशापासून जठरापर्यंत अन्ननलिका मार्ग जन्मतःच दोषपूर्ण असणे, काही रुग्णांना तर थोडे जरी अन्न खाल्ले तर लगेच उलटी होते. उलटीतून न पचलेले अन्न जसेच्या तसे बाहेर पडते. नाकातोंडातूनही अन्न बाहेर पडते तर बर्‍याचदा १-२ तासानंतरही काही जणांना उलटी होते व त्यातून आंबट, कडवट, पिवळे किंवा हिरवट असे द्रव बाहेर पडते. जठराचे आतड्याकडील तोंड अरुंद असणे आणि आतड्यांमध्ये काही अडथळा उपस्थित होणे यामुळेही उलटी होऊ शकते. याचबरोबर काहींना शौचास अतिशय दुर्गंधी येते, काहींना उचकी लागते आणि त्यानंतर न पचलेल्या अन्नाची उलटी होते.

लहान मुलांमध्ये जास्त प्यालेले दुध ओकून टाकण्याची मुलांना सवय असते. जडान्न आणि पक्वान्न खाणे, मुलांमध्ये मनाविरुद्ध एखादी गोष्ट जर झाली, भीतीने ओकारी होण्याची शक्यता असते किंवा काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ले की लगेच त्यांना उलटी होते. याशिवाय लहान मुलांना दात येत असताना उलटीचे लक्षण उद्भवते. यात दुधाच्या वड्या उलटीतून पडतात. यामध्ये बरेचसे अन्न उलटीतून बाहेर जात असल्यामुळे मूल अशक्त होते. मूल त्रासिक, चिडखोर होते, एवढेच नाही तर मोठ्या वयातील व्यक्तीही चिडतात, वैतागतात.
यासाठी काय करायला हवे?

  • उलटी होत असताना पोटात गॅस साठून राहत असल्यास अन्नातील साखर अथवा कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ कमी करावेत. थोडे दिवस तेलकट-तुपकट, तिखट, चमचमीत पदार्थ खाणे टाळावे. नाहीतर हे लक्षण जास्त वाढते. वाजवीपेक्षा जास्त खाणे टाळावे, पचेल तेच खावे. पाणी भरपूर प्यावे.

यासाठी मी काही होमिओपॅथिक औषधे देत आहे पण ती होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत. अर्सेनिक, एथुजा, अंटीमक्रुड, चामोमीला, इपिकॅक, ब्रायोनिया ही काही औषधे आहेत पण ती त्या त्या वयानुसार व लक्षणानुसार देता येतात, कुठल्या रोगाचे लक्षण आहे का… हे पाहिल्यानंतरच ही औषधे घ्यावीत.