ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

0
6

राज्यात संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच गेल्याने आता राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता सप्टेंबर महिन्यातही जर पाऊस कोसळला नाही तर राज्यातील भात-शेतीवर तसेच मोसमी भाज्यांच्या पिकांवर विपरित परिणाम होण्याची भीती असल्याचे कृषी संचालक नेव्हिल आफोन्सो यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

यासंबंधी अधिक माहिती देताना आफोन्सो यांनी, राज्यात 20 हजार हेक्टर एवढ्या जमिनीत भातशेतीचे पीक घेतले जात आहे. एका हेक्टरमागे 4 टन एवढे भातशेतीचे पीक मिळते. मात्र, यंदा संपूर्ण ऑगस्ट महिना जवळ जवळ कोरडाच गेलेला असल्याने राज्यातील शेतकऱ्यांबरोबरच कृषी खातेही चिंतेत आहे. आता शेतीला कणसे फुटू लागलेली असून आता जर पाऊस पडला नाही तर भातशेतीच्या पिकावर त्याचा माठा परिणाम होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

भाजीवरही परिणाम
या भातशेतीबरोबरच राज्यातील मोसमी भाज्यांच्या पिकांवरही पाऊस न पडल्यास परिणाम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात गोव्यात मोठ्या प्रमाणात भाज्यांचे पीक येत असते. त्याबरोबरच चिबुड व काकड्यांचे मोठ्या प्रमाणात पीक घेण्यात येते. भाज्यांमध्ये दोडकी व अन्य कित्येक प्रकारच्या भाज्यांचे डोगराळ भागात व अन्य ठिकाणी पीक घेतले जाते. मिरची लागवडही केली जाते. सप्टेंबर महिन्यात जर पावसाने दडी मारली तर या पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे असे आफोन्सो यांनी स्पष्ट केले. पाऊस कोसळणे बंद झाल्यास डोंगराळ भागात जमिनीतून झरे फुटणे बंद होणार असून तेथे घेतल्या जाणाऱ्या पिकांवर परिणाम होईल. जमिनीचा ओलावा नष्ट होऊन जमीन सुकून त्यांना भेगा पडतील.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले असल्याचे सांगून तसे झाले तर मात्र चिंता करण्याचे कारण नसेल, असे आफोन्सो यांनी स्पष्ट केले.