ऑक्टोबरमध्ये उच्चांकी जीएसटी संकलन

0
15

>> १,५१,७१८ कोटी रुपये कर रुपात गोळा; एप्रिलनंतर गत महिन्यात सर्वाधिक कर प्राप्त

देशात ऑक्टोबर महिन्यातील कर संकलनाबाबत चांगली बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कर संकलनात वाढ झाली आहे. मागील महिन्यात १,५१,७१८ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले. याआधी एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी जमा झाला होता. त्यावेळी १.६८ लाख कोटी जीएसटी जमा झाला होता. सध्याच्या घडीला देशातील राज्यांमधून महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा झाला आहे.

सलग आठव्या महिन्यात देशात जीएसटी १.४ लाख कोटींहून अधिक जमा झाला आहे. यंदाच्या वर्षात दुसर्‍यांदा कर संकलनाचा उच्चांक गाठला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कर संकलन १,५१,७१८ कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी हा २६,०३९ कोटी रुपये इतका होता. तर, राज्यांच्या वाटा हा ३३,३९६ कोटी रुपयांचा आहे. आयजीएसटी ८१,७७८ कोटी रुपये आहे. त्यातील ३७,२९७ कोटी रुपये हे आयात करण्यात आलेल्या वस्तूंचे आहे, तर १०,५०५ कोटी रुपये हे उपकरातून जमा झाले आहेत. त्यातील ८२५ कोटी रुपये वस्तूंच्या आयातीतून जमा झाले आहेत.

सप्टेंबर २०२२ मध्ये ८.३ कोटी ई-वे बिल जनरेट झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ई-वे बिल ७.७ कोटी रुपये होते. जीएसटी करात वाढ होणे ही बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक बाब समजली जाते.
सप्टेंबरमध्ये एकूण जीएसटी संकलन १.४ लाख कोटींहून अधिक झाले होते. त्यापैकी २५,२७१ कोटी रुपये सीजीएसटी आणि ३१,८१३ कोटी रुपये एसजीएसटी कर संकलनातील होते. तसेच ८०,४६४ कोटी रुपये आयजीएसटीमध्ये जमा झाले होते. यामध्ये आयात वस्तूंवरील करातून ४१,२१५ कोटी रुपये जमा झाले होते.

महाराष्ट्रातून सर्वाधिक २३ हजार कोटी कर संकलन
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जीएसटी संकलन हे महाराष्ट्रातून झाले. महाराष्ट्रातून २३ हजार ३७ कोटींचा जीएसटी जमा झाला, तर कर्नाटकमधून १० हजार ९९६ कोटींचा कर जमा झाला. गुजरात राज्यातून ९४६९ कोटींचा जीएसटी जमा झाला, तर उत्तर प्रदेशातून ७८३९ कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला.