Home अंगण शाळा

शाळा

0
  • डॉ. सुनेत्रा कळंगुटकर

अशी ही शाळा आणि शाळेतील शिक्षक ज्यांनी आम्हाला घडवले; आमचे बालपण आनंददायी बनवले. ती शाळा आणि शिक्षक आजही आठवतात आणि त्यांच्याप्रती मनात कृतज्ञता दाटून येते.

सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेल्या आमच्या लहानशा निसर्गरम्य गावातील मराठी शाळा खूप छान होती. गावातील बाजारापासून ही शाळा बरीच दूर होती. शाळेच्या काही वर्गखोल्या आणि समोर लांबलचक व्हरांडा असलेली एक लांबलचक बैठी कौलारू इमारत होती. बाजूच्या दुसऱ्या इमारतीत इंग्रजी शाळा चालायची. शाळेच्या समोर थोडीशी मोकळी जागा आणि मागे एक मैदान होते. शाळेच्या समोरच पोलिस स्टेशन होते. त्यामुळे शाळेत मास्तरांची आणि बाहेर समोरच्या पोलिस स्टेशनची अशी दुहेरी भीती मुलांना वाटत असे. पोलिस स्टेशनमागून नितळ, स्वच्छ पाण्याची नदी अवखळपणे वाहायची.

सकाळी मुलं कुठून कुठून चालत, पाटी-पुस्तकं घेऊन शाळेत यायची. प्रार्थना झाल्यावर आपापल्या वर्गात जाऊन बसायची. मग मास्तरांचे वेगवेगळे विषय शिकवणे सुरू व्हायचे. मास्तर कविता, गणित, भूगोल, इतिहास शिकवायचे आणि मुले हळूहळू अभ्यासात गुंतायची. काही मुलांचे लक्ष मधल्या सुट्टीवर असायचे. मधल्या सुट्टीची घंटा वाजताच मुलं वर्गातून बाहेर पडायची. कुणाकुणाला तहान लागलेली असायची, तर कुणाच्या पोटात चिमण्या चिवचिवत असायच्या. काही मुलं तहान भागवण्यासाठी समोरून वाहणाऱ्या नदीवर पळायची. अगदी जवळ घर असलेली मुलंसुद्धा! इथं नदीच्या प्रवाहात कमी पाणी असायचं. त्यामुळे त्या आरसपानी, स्वच्छ पाण्यात नदीपात्रातील दगडगोटे दिसायचे. मुलं थंडगार पाणी पोटभर पिऊन घ्यायची. पाण्यात नाचायची; एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायची. मन भरलं की मग शाळेत परतायची. तेवढ्यानं ती चांगलीच टवटवीत झालेली असायची.

शाळेला लागूनच कुणाची तरी एक मोठी काजूची बाग होती. तिच्या सभोवती दगडी कंपाऊंड बांधलेले होते. काजूच्या दिवसांत त्या बागेतील काजूच्या झाडांना लाल, पिवळ्या रंगाची बोंडे लागलेली असायची. शाळेतून ती दिसायची; मुलांना खुणवायची. मग मधल्या सुट्टीत काही धीट मुलं कंपाऊंडवरून उडी मारून काजूच्या बागेत जायची; लाल, पिवळी काजूची बोंडे घेऊन यायची. अगदी पोलिस स्टेशन समोरच असतानाही. मग त्या मुलांचा ती बोंडे खायचा कार्यक्रम चालायचा. बोंडांना काजू असले तर ते खिशात टाकले जायचे.

मधल्या सुट्टीत शाळेच्या समोर, सायकलची घंटी वाजवत सायकलवरून आईसफ्रुटवाला यायचा. त्याच्या सायकलला तीन-चार लांबट डबे लटकावलेले असत. आईसफ्रुटवाल्याच्या सायकलची घंटी ऐकून, त्याची वाट पाहत असलेली मुलं त्याच्याकडं पळत सुटत. त्याच्याभोवती मुलांचा गराडा पडत असे. कॅन्डी, मँगो, ऑरेंज अशी वेगवेगळ्या प्रकारची आईसफ्रुट त्याच्या त्या लांबट डब्यांत असायची. ती पाहूनच मुलांच्या तोंडाला पाणी सुटत असे. मग पाच पैसे, दहा पैसे देऊन हवे त्या प्रकारचे आईसफ्रुट विकत घेतले जात आणि चवीनं खाल्ले जात. मस्तपैकी आईसफ्रुट खाऊन गारेगार आणि ताजीतवानी झालेली मुलं मधली सुट्टी संपताच पुन्हा वर्गात येऊन बसत.
दुपारी शाळा सुटली की मुलांची वानरसेना खोड्या करीत घरी चालत जायची. जाताना रस्त्याच्या बाजूला जांभळीचं मोठं झाड होतं. जांभळांच्या दिवसांत त्याला रसाळ, रसरशीत जांभळांचे घोस लगडलेले असायचे. झाडाच्या खाली जांभळांचा खच पडलेला असायचा. ते पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटत असे. मग खाली पडलेली चांगली जांभळं वेचली जायची. काहीवेळा मोठी मुलं झाडावर चढून जांभळांचे घोस तोडून खाली टाकायची. खाली उभी असलेली मुलं ते झेलायची. रसरशीत जांभळं मिळाल्यावर मुलं खूश व्हायची. एकमेकांना जांभळं द्यायची. जांभळं खाऊन जांभळी झालेली जीभ एकमेकांना दाखवत पोरं आनंदानं घरी परतायची.

आंब्याच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना कैऱ्या लागलेल्या असायच्या. मुलं कैऱ्यांवर नेम धरून दगड मारायची. कैऱ्या खाली पडल्यावर त्यांचे छोटे छोटे टुकडे एकमेकांना देत, ते मिटक्या मारत खायची. झाडावर बसलेले वानर जमिनीवरील या वानरसेनेकडे पाहून अचंबित व्हायचे आणि झाडावरच इकडून तिकडे उड्या मारायचे. त्यांना पाहून मुलं त्यांच्यावरही दगड फेकायची; पण ते दगड वानरांपर्यंत पोहोचत नसत. उलट ते वानर चेकाळून मुलांनाच चिडवायचे.
शाळेच्या मैदानावर लंगडी, खो-खो, कब्बडी असे अनेक प्रकारचे खेळ खेळले जात. या सगळ्या खेळांत सहभागी होऊन मुलं अटीतटीनं खेळायची. खेळाचा आनंद लुटायची. शाळेतील वनभोजन, स्नेहसंमेलन यातही मुलं रमायची. शाळेचे वनभोजन गावाच्या जवळच एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी असायचे. निसर्गाच्या सान्निध्यात विविध खेळ, जेवण व्हायचे. निसर्गातील नवीन नवीन गोष्टी कळायच्या. व्यंकटेश माडगुळकरांच्या ‘शाळा’ या कथेतील तीन मुलं एक दिवस शाळा बुडवून काटेवनात फिरायला जातात. निसर्गाच्या शाळेत ते ओढ्यातील मासे, पक्षी, त्यांची घरटी अशा निसर्गातील अनेक नवीन गोष्टी शिकतात. तशीच शाळेतील मुलंही निसर्गाच्या सहवासात काही गोष्टी शिकत. वनभोजनाचा आनंद मनसोक्त लुटून घरी परतत.

शाळेतील सरस्वतीपूजनाला देवी सरस्वतीची सुंदर मूर्ती आणली जायची. सगळी मुलं आपल्या पाटीवर सरस्वतीचं चित्र काढून आणायची. सरस्वतीपूजनाला पाटीवर सरस्वतीचं चित्र हवंच. ज्यांना स्वत: चित्र काढायला येत नसे ती मुलं मग कुणाकडून तरी चित्र काढून घ्यायची. सरस्वती ज्या टेबलवर आसनस्थ झालेली असायची, त्या टेबलखाली या सगळ्या पाट्या ओळीनं मांडून ठेवल्या जात. विद्यार्थ्यांपैकी कोणत्याही एका मुलाला सरस्वतीची पूजा करायला लावली जायची. सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या असायच्या. छान सजावट केलेली असायची. मुली फुगड्या घालत. आरत्या, भजने होत असत. सरस्वतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत सगळी मुलं उत्स्फूर्त आनंदानं सहभागी होत. एकूणच सरस्वतीपूजनाचे दोन दिवस मुलांना खूप मजा यायची.

आम्हाला शाळेत राणे गुरुजी शिकवायचे. ते आणि त्यांचे कुटुंब गावातच राहत असे. राणे गुरुजी हे मूळ मालवणमधील होते. त्यांची उंची मध्यम असून, चेहरा गोलसर होता. त्यांचा पेहराव धोतर, शर्ट, टोपी असा असायचा. राणे गुरुजी चांगले शिकवायचे, त्याचबरोबर ते कडक शिस्तीचे होते. मस्ती करणाऱ्या मुलांना गुरुजींकडून शिक्षा मिळायची. गुरुजी त्यांच्या हातावर छडी मारून म्हणायचे- ‘छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम.’ शिक्षा म्हणून कधीकधी मुलांना उठाबश्या काढायला लावल्या जायच्या, तर कधी बाकावर उभे केले जायचे. गुरुजी आमच्या घराच्या समोरच राहत असल्याने त्यांची भीती घरीही वाटायचीच. मी दरवर्षी पास झाल्यावर, दादा देवापुढे पेढे ठेवून मग मला राणे गुरुजींच्या घरी पेढे घेऊन पाठवायचे. मी त्यांना आणि काकूंना नमस्कार करून पेढे द्यायची. काही वर्षांनी राणे गुरुजी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर गुरुजी मालवणला परत गेले. गुरुजी आमच्या गावातीलच झाले होते, त्यामुळे ते आपल्या गावी गेल्यामुळे आम्हा सर्व मुलांना, पालकांना आणि गावकऱ्यांनाही खूप वाईट वाटले.
अशी ही शाळा आणि शाळेतील शिक्षक ज्यांनी आम्हाला घडवले; आमचे बालपण आनंददायी बनवले. ती शाळा आणि शिक्षक आजही आठवतात आणि त्यांच्याप्रती मनात कृतज्ञता दाटून येते.