एक सोहळा आगळावेगळा

0
17
  • मीना समुद्र

सर्वांनाच चेतना, उत्तेजना, मनःशांती आणि समाधान देणारे हे रामरक्षा स्तोत्र 1300 वेळा म्हणण्याचे व्रताचरण या कुटुंबात गेली 27 वर्षे अखंडितपणे चालू आहे. सर्वांशी सुखसंवाद साधून मने जोडण्याचे पवित्र काम अतिशय शांतपणे, सहजपणे याद्वारे घडते. लहानांच्याही मनात एक सुरक्षाकवच आपोआप निर्माण होण्याइतके धैर्य आणि सामर्थ्य किंवा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होतो हे नक्की.

चैत्र हा सणा-उत्सवांचाच महिना. प्रतिपदेला गुढीपाडव्यानंतर चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामजन्मसोहळा साजरा झाला आणि त्यानंतर चैत्री पौर्णिमेला हनुमानजयंतीही पार पडली. अयोध्येच्या रामजन्मभूमीत यंदा ‘रामलला’ मूर्तीची स्थापना झाल्याने तर या उत्सवांना आणि उत्साहाला अतिशय उधाण आले. मंदिरांतून आणि घराघरांतूनही रामाचा पाळणा हलला आणि संगीत, नृत्य, नाटक, भजन-कीर्तन-पुराण, कुठे रामकथा आणि अनेक ठिकाणी गीतरामायणाचे कार्यक्रम झाले. चैत्रातल्या चैतन्याने आणि सृष्टीने दिलेल्या ऊर्जेने हे सारे घडते, आणि ते आताही घडले.

‘दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीला यायचं आहे बरं का!’ असा आमच्या परिचितांचा फोन आला. चैत्र सुरू झाला की रामजन्मासारखेच या घरच्या सोहळ्याचेही आम्हाला वेध लागतात. अशी काही घरं असतात की जिथे बोलवायचीही जरूरी नसते. पण आठवण करून देण्यासाठी चार दिवस आधी हे रीतसर आमंत्रण आलेच, तेव्हा लगेच उलट-टपाली म्हणतात तसे ‘हो नक्की’ असे फोनला उत्तरही दिले.
दरवर्षी रामनवमीनिमित्त हे सच्छील रामभक्त कुटुंब त्यांच्या परिचित व्यक्तींना आमंत्रण देऊन रामजन्मसोहळा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने घरातच साजरा करते. ‘साजरा’ शब्दात जो साज आहे, जो राजस भाव आहे, जी कलात्मकता आहे, जे सौंदर्य आहे ते सारे अंगीभूत सौजन्याने येथे व्यक्त होते आणि त्या अगत्याने, प्रेमाने आणि पवित्र शुद्ध वातावरणाने मन भारावून जाते.

एरव्ही इन-मीन-तीन माणसांचे हे कुटुंब. कुणाच्या अध्यात ना मध्यात. पूर्णपणे रामरंगी रंगलेले. पण स्वतःची कर्तव्ये मोठ्या इमानदारीने आणि जबाबदारीने पार पाडीत आलेले. त्यात यंदा मुलाचे शुभमंगल झाल्याने एका नव्या माणसाची भर पडली आहे. त्यामुळे हा विशेष कौतुकसोहळाही होता. पुणे, मुंबई, नागपूर, सांगली अशा ठिकाणची नातेवाईक आणि मित्रमंडळीही यात सामील होतात. कधी कधी प्रत्यक्ष हजर राहून, तर कधी अप्रत्यक्षपणे. सध्याच्या सोयिस्कर अशा ऑनलाईन पद्धतीने, व्हिडिओद्वाराही या कुटुंबाशी ओळख आणि मैत्री झाल्यापासून गेली 8-10 वर्षे नियमितपणे आम्हीही या सोहळ्याला हजर असतो. साधारणपणे एप्रिल महिन्याचेच हे दिवस असतात. सुट्टीला कुणी नातेवाईक आल्यास त्यांनाही घेऊन या म्हणून सांगितले जाते. खरोखरीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर सुसंस्कारांचा ठसा उमटवणारा, अंतरीच्या जिव्हाळ्याने साजरा होणारा हा कार्यक्रम.

आता यातले आगळेवेगळेपण कोणते? तर रामनवमीच्या पहाटेपासून तो दुपार, संध्याकाळ किंवा रात्र होईपर्यंत ‘रामरक्षास्तोत्र’ 1300 वेळा म्हणणे. यात लहानमोठे, जातीपाती यांचा काहीही संबंध नसतो. ज्याला रामरक्षा म्हणता येते त्या साऱ्यासाऱ्यांचा सहभाग या अनोख्या सोहळ्यात असतो. सगळ्यांनाच संस्कृतमध्ये असलेले, अनुष्ठुप छंदात लिहिलेले हे स्तोत्र वेगवेगळ्या लयीत म्हणता येतेच असे नाही. पण अनेकजण ऐकून-ऐकूनही ते शिकल्याचे सांगतात तेव्हा त्यांना वाटत असलेली धन्यता त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होते. सामूहिकतेचा तो एक चांगला परिणाम असतो. रामरक्षेची सार्थ छोटी-छोटी पुस्तके ठेवलेली असतात. पाट असली तरी चुकू नये, खंड पडू नये म्हणून ही व्यवस्था. यातले वेगळेपण ऐकूनही काहीजण बिनाओळखीदेखीचेही उपस्थित राहतात.

रामनवमीचा हा सोहळा सुरू होतो तो भल्या पहाटेपासून. दारातली ठिपके आणि रेखीव रेघांची सुबक रांगोळी आपले स्वागत करते. चैत्रवाऱ्यावर वृंदावनातली तुळस आनंदाने डोलत असते. लाल मिरचीसारखी जास्वंदी चुपचापपणे पण भरघोस स्वागत करते. जाईजुईची वेल पाहून मन सुखावते. दारातून बैठकीच्या खोलीत प्रवेश करताना ‘या या’ असा यजमानांचा अगत्यपूर्ण स्वर कानी पडतो. आत पाऊल टाकताच अगरू चंदनाच्या वासाने मन सुखावते. राम-सीता-लक्ष्मण आणि हनुमानाची अतिशय सुंदर साजिरी मूर्ती, जास्वंदी, झेंडू, चाफा, मोगरा आणि तुळशीच्या भाराने झाकूनही मधुरस्मित जवळच्या दीपमाळेने उजळलेले पाहून मन प्रसन्न होते. हात जोडले जातात. सोफा, खुर्च्या आणि सतरंज्यांवर बसलेली स्त्री-पुरुष-बाल मंडळी दिसतात. कुणी एक स्तोत्र म्हणत असताना बाकीचेही मनातल्या मनात किंवा पुटपुटत स्तोत्र म्हणत असतात. एकाचे झाले की दुसऱ्याने. प्रथम गणेशवंदना झालेली असते. आरंभीचा श्लोक म्हटला गेलेला असतो, त्यामुळे ‘चरित्रं रघुनाथस्य’पासून रामरक्षा सुरू करायची आणि ‘इतिश्री’ ही 1300 व्या वेळीच करायची. एकानंतर दुसरा असे क्रमाने म्हणणे चालू असते. नाश्ता, चहा-सरबत यासाठी थोडावेळ थांबविला जातो. एखादा त्यावेळीही म्हणत राहतो. दुपारी 12 वाजता मात्र सर्वजण रामजन्मावेळी उभे राहून श्रीगणेश, देवी, शिव, राम आणि मारुती अशा आरत्या म्हणून कर्पूरारती मंत्रपुष्पांजली म्हटली जाते आणि अक्षता, फुले सुंदरशा राममूर्तीवर वाहून सुंठवडा वाटला जातो. नंतर सर्वांचे प्रसादाचे भोजन होते. आपापल्या सवडीने दिवसभरात केव्हाही लोक येतात. रामरक्षा म्हणतात. प्रसाद हा सर्वांना दिला जातोच. घरच्या सुग्रण गृहिणीने केलेली गव्हाची खीर, भात, भजी, अळुवडी, पुरणपोळी, भाजी, कढी असे सुग्रास जेवून सारेजण तृप्त होतात. कितीजण येतील याचा अंदाज नसतो तरी अन्न कधीच कमी पडत नाही. आणि ताजेतवाने होऊन पुन्हा स्तोत्र म्हणायला प्रारंभ होतो.

सर्वांनाच चेतना, उत्तेजना, मनःशांती आणि समाधान देणारे हे रामरक्षा स्तोत्र 1300 वेळा म्हणण्याचे व्रताचरण या कुटुंबात गेली 27 वर्षे अखंडितपणे चालू आहे. कोरोनाच्या काळातही ते थांबले नाही. घरातली तिघेजण आणि ऑनलाईनवरची मंडळी अशांनी रामनवमीच्या दिवसाचे उद्दिष्ट त्या संकटकाळातही साधले हे विशेष. सर्वांशी सुखसंवाद साधून मने जोडण्याचे पवित्र काम अतिशय शांतपणे, सहजपणे याद्वारे घडते. राममूर्ती पाळण्यात घालून हलवली नाही तरी रामाच्या ‘श्यामल शांतमूर्ती’चे ध्यान रामरक्षापठणाने, वाचनाने होते आणि लहानांच्याही मनात एक सुरक्षाकवच आपोआप निर्माण होण्याइतके धैर्य आणि सामर्थ्य किंवा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होतो हे नक्की.

रामजन्माचा सुंदर क्षण अशा पद्धतीने साजरा करण्याची कल्पना केव्हा आणि कशी सुचली असे विचारले असता त्या सत्त्वशील गृहिणीने त्यामागची हकिकत सांगितली ती अशी की, 23 वर्षांपर्यंत मनातच ‘ॐ नमः शिवाय’चा जप करणाऱ्या तिला 24 व्या वर्षी गुरू भेटले. या जपाऐवजी ‘श्रीराम जयराम जयजय राम’ हा जप करशील का? असे त्यांनी विचारल्यावर तिने ‘करीन’ असा तात्काळ होकार भरला, आणि ‘आजपासून चालेन तर तुमच्या बुद्धीने चालेन’ असा मनोमन निश्चय केला. त्याचवेळेपासून गुरूंनी घातलेल्या अटीही आजन्म पाळण्याचे ठरविले. 1. प्रापंचिक कर्तव्ये पार पाडून मगच उरलेला वेळ नामस्मरणात घालवणे, 2. कोणतेही इतर आध्यात्मिक ग्रंथ न वाचणे, 3. गावात आलेल्या कोणत्याही साधुसंताचे दर्शन वा भेट घ्यायची नाही, 4. कधीकाळी संन्यास घेऊन जंगलात जावेसे वाटले तरी तसे करायचे नाही- या त्या चार अटी.

त्याप्रमाणे वर्तन करताना इतर भरतकाम, विणकामासारखे छंद आणि मानसन्मानाचे प्रसंगही बाजूला केले. दूरदर्शनसारखे करमणुकीचे माध्यमही बंद केले. आणि सारा प्रपंच, आला-गेला, पै-पाहुणा, आजारपणं, सांसारिक दुःख-संकटांचे क्षण सांभाळून रामनामजपाला जास्तीत जास्त वेळ दिला. रामरक्षा, मारुतीस्तोत्र म्हणणे दिवसातून अनेकवार चालू ठेवले. नंतर रामनाम जप स्वहस्ताक्षरात लिहावासा वाटला म्हणून आधी कुठल्याही कागदावर आणि मग सरळ हिशेबाच्या मोठ्या वह्या आणून तासन्‌‍तास जप लिहिणे सुरू केले. जपातूनच त्यांना एकाग्रता आणि अनुभूती आल्या. माळेचा मणी, हाताची बोटे, हृदयाचा ठोका आणि रामनाम यांच्यातला संबंध लक्षात येऊ लागला. गोडी निर्माण झाली, तळमळ लागली. प्रत्यक्ष दर्शन घडले नाही तरी 30-35 वर्षं रामनाम आणि पुढे रामरक्षेची पारायणे आणि लेखन यामुळे प्रचंड अनुभव, एकाग्रता लाभली. स्वप्नदृष्टांत आणि वाचासिद्धीसारखी काही उदाहरणे गुरूंना फोनवरून ऐकवली, आणि कोणतीही तशी आध्यात्मिक पार्श्वभूमी नसताना जप आणि लेखनामुळे अतीव मनःशांतीचा लाभ झाला.

आशीर्वादामुळे ताकद येते. कोणत्याही संकटाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य, शक्ती स्वतःत निर्माण होते. म्हणून रामरक्षास्तोत्र 1300 वेळा म्हणण्याची त्यांना प्रेरणा झाली. घरच्यांची अनुकूल साथ मिळाली, ती सुनेच्या रूपानेही यंदा दिसली. रामासाठी मरावं म्हणजे राम भेटेल आणि रडायचंच असेल तर रामासाठी रडावं. आपले दुःख-कष्ट त्या नामामुळे हलके होतील हे त्या कुटुंबातल्या सत्त्वशील गृहिणीचे शब्द आहेत.