‘एक देश, एक निवडणूक’साठी गोवा तयार

0
21

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा; मध्यप्रदेशातील भाजपच्या ‘जनआशीर्वाद’ यात्रेत सहभाग

‘एक देश, एक निवडणूक’ ही काळाची गरज आहे. देशाच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारची ही संकल्पना सत्यात उतरणे आवश्यक आहे. गोवा राज्य ‘एक देश, एक निवडणूक’साठी पूर्णपणे तयार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ग्वाल्हेर-मध्यप्रदेश येथे पत्रकारांशी बोलताना काल केला.
मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे मागील दोन दिवसांपासून मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मध्यप्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच त्याचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच मध्यप्रदेशात निवडणूकपूर्व प्रचाराला सुरुवात केली आहे.

मध्यप्रदेशच्या शिवराज सिंग चौहान सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जनआशीर्वाद’ यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सहभागी झाले असून, ते जाहीर सभांना संबोधित करीत आहेत. दरम्यान, विश्वजीत राणे यांच्याकडे मध्यप्रदेशातील इंदौरनगर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाची सर्वच क्षेत्रांमध्ये भरभराट होत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करीत आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखालील मध्यप्रदेश सरकारने प्रचारात आघाडी घेतलेली आहे, असा दावाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.
भारत हे नाव देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच प्रचलित आहे; परंतु विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी याचे राजकारण सुरू केले आहे. विरोधकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीला देशातील सनातन हिंदू धर्म नष्ट करायचा आहे, असा आरोपही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला.

विश्वजीत राणेंकडे मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे मध्यप्रदेशातील पाच विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविली आहे. सध्या विश्वजीत राणे हेही मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उत्तर कर्नाटकातील काही विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी राणे यांच्यावर सोपविण्यात आली होती. मध्यप्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. भाजपने मध्यप्रदेशमध्ये सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.