Home बातम्या एका चुकीमुळे गोवा सरकारने मध्यप्रदेशातीलनागरिकाच्या खात्यामध्ये पाठवले 1.95 लाख

एका चुकीमुळे गोवा सरकारने मध्यप्रदेशातीलनागरिकाच्या खात्यामध्ये पाठवले 1.95 लाख

0

सरकारी खात्यातील रक्कम चुकीने वैयक्तिक खात्यात जमा करण्याचा अजब प्रकार येथील सचिवालयात घडला असून, सुमारे 1 लाख 95 हजार रुपये एवढी रक्कम मध्यप्रदेश येथील एका व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता सदर व्यक्ती पैसे परत करण्यास नकार देत असल्याने त्याच्याविरोधात पर्वरी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सचिवालयातील अवर सचिव श्रेयस डिसिल्व्हा यांनी बुधवारी (दि. 18) राजू भुरिया (रा. कुक्षी, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. कुक्षी येथील राजू यांच्या बँक ऑफ बडोदा बँकेतील बचत खात्यात दि. 30 जुलै 2025 रोजी पहिल्यांदा 1 लाख 62 हजार 125 रुपये आणि नंतर 32 हजार 895 रुपये असे एकूण 1 लाख 95 हजार 20 रुपये चुकीने जमा करण्यात आले होते. त्या रकमेपैकी 89 हजार 108 रुपये राजू यांनी आपल्या खात्यातून काढले.

सचिवालयातील साधारण प्रशासन खात्याकडून चुकीने जमा झालेली रक्कम भरण्यासंबंधी राजू यांना सांगितले असता त्यांनी नकार दिला.
यानंतर तत्संबंधीची तक्रार सचिवालयातील अवर सचिव श्रेयस डिसिल्व्हा यांनी पर्वरी पोलीस स्थानकात नोंदवली असून, राजू यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. 316(2), 314 कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात उपनिरीक्षक संकेत तळकर पुढील तपास
करीत आहेत.