Home Featured एआयचे पंचशील

एआयचे पंचशील

0

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय संदर्भातील जगातील आजवरची सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन सध्या भारतात दिल्लीत सुरू आहे आणि तिच्या सांगतेचा क्षण जवळ आला आहे. सोमवारच्या अंकातील अग्रलेखात ह्या महत्त्वपूर्ण परिषदेकडून असलेल्या अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या होत्या. काल मुख्य परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ‘मानव’ हे एआयसंदर्भातील पंचशील त्यात मांडले आहे. नैतिकता, सर्वसमावेशकता, वैधता, सार्वभौमता आदी मुद्द्यांचा त्यात समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये जसजशी प्रगती होत चालली आहे, तसतसे त्यातील धोकेही जगाला दिसू लागले आहेत. त्यामुळेच ह्या क्षेत्रातील प्रगतीला काही निश्चित दिशा असावी आणि लगामही असावा, असा विचार सर्वच क्षेत्रांतील जाणकार व्यक्त करू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मांडलेली ही पाच सूत्रे दिशादर्शक ठरणारी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे केवळ यंत्रे अधिकाधिक हुशार बनवण्यासाठी नसून मानवी क्षमतांमध्ये अधिकाधिक वाढ होण्यास ते कारण ठरले पाहिजे अशी भावनाही पंतप्रधानांनी ह्यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासरशी हे तंत्रज्ञान अब्जाधीशांच्या आणि केवळ प्रगत, विकसित देशांच्या हाती उरण्याची भीतीही व्यक्त होते आहे. संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांनी ह्या परिषदेतही हीच भीती व्यक्त केली. परंतु भारतासारख्या विकसनशील देशाने अल्पावधीत ह्या क्षेत्रात जी झेप घेतली आहे ती पाहिली, तर सरकारने योग्य पाठबळ पुरवणे सुरू ठेवले तर जगभरात आपला ठसा उमटवलेल्या भारतीय बुद्धिमत्तेच्या बळावर भारत निश्चितच येणाऱ्या काळात एआयचे केंद्र बनू शकतो. ती क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे हा देश ह्या क्षमतेचा दुरूपयोग करणार नाही हा विश्वासही जगाला आहे. भारताची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्याच्यापाशी असलेले प्रचंड मनुष्यबळ. ही एक विशाल बाजारपेठ तर आहेच, परंतु त्याचबरोबर त्यातील वैविध्य, वैचित्र्य आणि वैशिष्ट्य हा एक प्रचंड स्वरूपाचा ‘डेटा’ही आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘डेटा’ हा आधार असतो आणि तो आपल्यापाशी एवढ्या प्रचंड प्रमाणात मिळवता येण्यासारखा आहे. त्यामुळेच आपल्या ‘सर्वम’ ने अल्पावधीत सर्व भारतीय भाषांमध्ये आपली उत्पादने उतरवून जागतिक स्पर्धकांवर मात करून दाखवली आहे. दिल्लीतील परिषदेचे महत्त्व अशासाठी आहे की ह्या निमित्ताने देशाच्या ह्या क्षेत्रातील सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. ह्या प्रदर्शनात एका विद्यापीठाने चिनी उत्पादन आपले म्हणून भासवण्याचा जो काही प्रकार केला आणि गालबोट लावले किंवा राहुल गांधींनी ह्या परिषदेला ज्या प्रकारे हिणवले त्याकडे दुर्लक्ष केले, तर ह्या परिषदेच्या आणि प्रदर्शनाच्या दरम्यान जे व्यापक विचारमंथन सर्व क्षेत्रांना कवेत घेत झाले आहे, त्यातून भारताच्या नव्या उगवत्या पिढीला नक्कीच फार मोठा आत्मविश्वास मिळवून दिला आहे. ओपनएआयच्या सॅम अल्टमनपासून अँथ्रोपिकच्या डेरियो अमोदेईपर्यंत ह्या क्षेत्रातील दिग्गजांना पाहण्या – ऐकण्या – अनुभवण्याची संधी ह्या परिषदेत नव्या पिढीला मिळाली. भारतीय बुद्धिमत्ता एआयच्या क्षेत्रात प्रचंड ऊर्जेनिशी आज उतरलेली आहे. भारतीय उद्योगपती ह्या क्षेत्रात प्रचंड पैसा गुंतवत आहेत, भारत सरकारही ह्याकामी उत्साही प्रोत्साहन देते आहे. ह्या संयोगातून येणाऱ्या काळात चमत्कार घडू शकतात. भारतीय जनतेचे जीवनमान सुधारण्याची, शिक्षणापासून आरोग्यापर्यंतच्या क्षेत्रांमध्ये क्रांती घडवण्याची क्षमता एआयमध्ये आहे. मात्र, त्यासाठी केवळ कागदावरच्या घोषणा नव्हे, तर प्रत्यक्षातले काम होणे महत्त्वाचे असेल. ही परिषद, त्यातील विचारमंथन हा केवळ प्रारंभबिंदू आहे. भारताचा, येथील संसाधनांचा वापर केवळ पाणी आणि विजेचा प्रचंड वापर करणाऱ्या डेटा सेंटरपुरता केला जाता कामा नये. एआय तंत्रज्ञान निर्मिती आणि विकासाची ही पंढरी बनली पाहिजे. ह्या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचा वापर केवळ ‘डेटा’ मिळवण्यापुरता होता कामा नये. तिच्या रोजच्या जगण्यातील अडचणी दूर सारण्यासाठी ह्या क्षेत्राचा, त्यातून मानवाच्या हाती आलेल्या क्षमतांचा वापर झाला पाहिजे. तरच ह्या एआय क्रांतीला खरा अर्थ येईल. शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यापार, अशा विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र क्रांती घडविण्याची क्षमता एआयमध्ये आहे. मात्र, त्याचा जनतेवर, तरुणाईच्या रोजगारावर कोणताही विपरीत परिणाम न होऊ देता हे तंत्रज्ञान केवळ सदैव पूरक आणि उपकारकच कसे ठरेल आणि त्यातून भारतीयांचे जीवनमान कसे सुधारेल ह्याचा विचार झाला तर ही परिषद सार्थकी लागली असे म्हणता येईल.