27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

ऋतुराज आज वनी आला…

  • मीना समुद्र

हा उदारात्मा वसंत चेतोहर, मनोहर असतो. त्यामुळेच त्याला ‘ऋतुराज’ ही पदवी बहाल झालेली आहे. चैत्रातले त्याचे आगमन सर्व दृष्टीने शुभंकर असते म्हणून पाडव्याला गुढी उभारून आपण त्याचे स्वागत करतो. त्याच्या हातात हात मिळवतो आणि सर्वांचे सुयश, सुख चिंतितो.

दाराबाहेरच्या फरशीशेजारी असणार्‍या मातीतून कमरेएवढं एक झाड उगवलं आहे. बारामाही काळसर हिरवी पानं आणि त्याला दांडोर्‍यांवर लागलेली नाकातल्या चमकीच्या आकाराची फुलं. यातून हिरवे मणी मोठे होत टपोर्‍या वाटाण्याएवढे वाटोळे होऊन त्याचे झुबके वार्‍याने डोलताना दिसले की मग चिमण्या, बुलबूल, धोबी अशी नाना तर्‍हेची पाखरं येतात आणि गोड किलबिलाट करत फलाहार करतात. पिकल्यावर नारिंगी झालेल्या फळांवर तर अक्षरशः ताव मारतात. त्या अनाम फळातले तिळासारखे बी त्यांना आवडत असावे. शेजारीच ठेवलेल्या पाण्यात चोची बुडवून जलपान करतात आणि गोड किलबिलाट करत उडून जातात. ऊन तापू लागलं की पंखांनी पाणी अंगावर उडवून घेतानाचा त्यांचा खेळ मोठा देखणा असतो.

समोरच्या चिकूच्या झाडावर चिर्रऽऽचिर्रऽऽ आवाज करत सातभाई जमलेत. खरंच ते सात आहेत ना, हे मी बाहेर जाऊन मोजून बघते. ते खरंच असे जथ्यानेच येतात. बोलत बोलत फांदीवरून उड्या मारत, उडत कायबाय टिपतात. हे सहकुटुंब, सहपरिवार असतात की सात भावांचं संमेलन, की मित्रमैत्रिणी दाणे टिपायला, गोष्टी करायला असे एकत्र येतात, याचं मोठं कुतूहल वाटतं. आवाज करत एकमेकांची दखल मात्र घेत असतात. त्यांचा आवाज जरासा चिरका पण मोठा. ‘आले वाटतं’ असं कळण्याइतका!

झाडाखाली मनीमाऊच्या हलत्या शेपटीशी खेळणारी मनीची गोजिरवाणी पिल्लं या नवीन खेळण्यांकडे टुकूटुकू पाहत आपल्या शेपट्या भीतीने फुलवताहेत. झाडावर सुरसुरणारी खारूटी या नवागतांना पाहून शेपटी फुलवून सरसर पळत फांदीआड लपते आहे.
मातीत रुजलेल्या जास्वंदीचा लाल बहर सुंदरच दिसतो आहे. कुंडीत लावलेल्या रोपालाही कळ्या आलेल्या पाहून मन हरखते आहे. आपसुक उगवलेल्या चांदवडाची मोठी पानं मात्र उन्हानं सुकल्यासारखी वाटत आहेत. त्याच्या पायाशी फुललेली पिवळट पांढरी आणि मध्ये किरमिजी रंग असलेली फुले मात्र दागिने दाखवून झाल्यावर पेटी बंद करावी तशी बंद झाली आहेत. सूर्योदयानंतर ३-४ तास मात्र डोळ्याला सुखद अशी ही निर्गंध फुले आपला खजिना खुल्या दिलाने दाखवतात. गुमसुम लिंबाला नवे धुमारे फुटले आहेत आणि दूर्वांकुर जोमाने वाढत आहेत. जुई हळूचकन् हसते आहे. असह्य उन्हाची तलखी कमी करण्यासाठी शुभ्र मोगरा हृदयांतरीचा गंध मुक्तहस्ताने वायुलहरींवर सोडत आहे. दारातली तुळस मंजिर्‍यांनी डोलते आहे आणि अबोली या काळात खूपच बोलकी झाली आहे. कोपर्‍यावरचा सोनचाफा अंगोपांगी बहराच्या खुणा लेवून ओंजळीत एकेक सुवर्णमोहोरांचा नजराणा घेऊन उभा आहे. सुगंध असा की प्रत्येक श्‍वासाचं पारणं फेडेल… ही किमया वसंताची!

फिरायला बाहेर पडलं की घराजवळचं शिरीषाचं झाड भेटतं. दुपारी उन्हाच्या काहिलीत याच्या घनगर्द सावलीत घटका- दोन घटका विसावलं की शांत वाटावं असा हा वृक्ष. याने तर फिकट गुलाबी पांढर्‍या रंगाच्या तलम पाकळ्यांची (उभ्या रेघांसारख्या) फुले अंगावर विणून सुंदर कशिदा काढला आहे. त्याच्या पानांतच बोर कुठेतरी गुरफटली आहे. पांढर्‍या आणि लाल चाफ्याचे हिरव्याजर्द पानातले गुच्छ नजरबंदी करत आहेत. शंकासुराची झाडे केशरट पिवळ्या फुलांची तुर्रेदार ऐट मिरवीत आहेत. सुबाभळीची पिवळीजर्द फुले भंडारा उधळल्यासारखी रस्त्यावर गालिचा अंथरून आहेत. फुललेला बहावा कुणीही पाहावा आणि पाहतच राहावा असा आनखशिखांत बहरून आल्याने वाहवा मिळवीत आहे. सावरीच्या फुलांचे लालचुटूक मधुप्याले- फुलचुखी पाखरे उलटी-सुलटी लोंबून-झोंबून त्यातला मधुरस मनसोक्त प्राशन करीत आहेत. कडुनिंबावर निळसर छटा शोभते आहे आणि आता दोनच दिवसांनी येणार्‍या गुढीपाडव्याच्या गुढीची शोभा आणि सर्वजणांचे आरोग्य वाढविण्यासाठी तो सज्ज आहे. लाल, पांढर्‍या, केशरी रंगाच्या बोगनवेली रंगपंचमी खेळून आल्यासारख्या प्रचंड उत्साहाने, उल्हासाने फुलल्या आहेत. रस्त्याच्या कडेला आपसुक उगवलेल्या रुईची पांढरट जांभळी फुले तिचे रूप खुलवीत आहेत. माहीत नाही अशा कितीतरी वृक्षांना नवीन पालवी फुटली आहे. नवा तजेला अंगी चढल्यासारखी बहुतेक झाडे टवटवीत, ताजीतवानी दिसत आहेत. भर उन्हातही त्याचीच ‘जर’ अंगाला लावल्यासारखी त्यांची कांती. ही किमया कुणाची? ऋतुराज वसंताची!

पिंपळ गुलाबी-सोनेरी-लालुस पालवीने सळसळत आहे. अशोकावरही आनंदकळा आहे. फणस नवीन पानांनी भरगच्च झाले आहेत आणि बुंध्याला त्यांनी लडिवाळपणे मिठी घातली आहे. होळीच्या सुमारालाच कोकिळेच्या सादाने घमघमणार्‍या आम्रमंजिरीतून फळांचे हिरवे मणी आणि मग वाढत जाऊन कोयरीसारखा आकार धारण केलेल्या, तोंडाला चटकन पाणी फोडणार्‍या हिरव्यागार नखरेल कैर्‍या. झुळझुळत्या वार्‍यावर लांब देठाला झोका देऊन कैर्‍या जणू आंब्याचे गाणे गात मधुर स्वप्ने जोजवत आहेत. आता चैत्र आलाच. चैत्र-वैशाख हे वसंतऋतूचे महिने मानले तरी फाल्गुनातच त्याची चाहूल लागते आणि चैत्राच्या हातात हात गुंफून वैशाखापर्यंत या ऋतुराजाचे पाऊल वनात पडून तो मनावरही राज्य करतो. नवकलिकांचा, नवसुमनांचा बहर घेऊन तो येतो. सारी सृष्टी अनोख्या रूप-रस-गंधात नहात असते. मानवासाठी वसंतवरदान घेऊन येते. ग्रीष्माच्या मदोन्मत्त पावलाखाली जळणार्‍या, तगमगणार्‍या माणसाच्या मनाला वसंतात मनःशांतीही मिळते. हा तर मधुमास! मधुर रसांची उत्पत्ती करणारा, अतिशय मधुर असे सौंदर्य सृष्टीला प्रदान करणारा. शारदनयनी उमलणार्‍या मधुमासाची रम्य नीलिमा आठवीत आणि अरुणकपोली लज्जेचा लालिमा असणारी कण्वमुनींची मानसकन्या बकुलफुलांची माळ गुंफत रम्य आठवणीत हरवते तीही याच मधुमासात. मदनाचे चाप सार्‍या सृष्टीवर सोडलेले असताना उन्हाची, निराशेची काय टाप की त्यांना थोपवू शकेल! सृष्टीचा हा सारा साजशृंगार वसंताच्या स्वागतासाठी, पक्षी-प्राणी-मनुष्य जीवनातील मधुर मीलनासाठी, उत्कट भेटीसाठी, आर्त भावांसाठी, प्रणयासाठी! या काळातले हळदीकुंकवाचे रंग सृष्टीत कलात्मकता आणि पावित्र्य आणतात. नवजीवनाची शुभवार्ता किलबिलणार्‍या घरट्या-घरट्यांतून ऐकू येत असते. फुलांशी, फळांशी लाडीगोडी करणारे पक्षी आणि त्यांच्या रेलचेलीमुळे तृप्त प्राणिमात्र हे सारे वसंतवैभव! ऋतुराज, हा मधुमास प्रेम उत्पन्न करतो, शिकवतो, स्वसंवेद्य करतो आणि दुसर्‍याला देणेही सांगतो.

एकूण चैत्रमास म्हणजेच चैतन्य मास. वसंतागमन होऊन तो यावेळी चैत्रात स्थिरपद झालेला असतो, त्यामुळे आंबा, फणस, काजू यांची रेलचेल असते. फळा-फुलांतून रसरंग सांडत, ओसंडत असतात. ‘देता किती घेशील दो करांनी’ अशी अवस्था होऊन जाते. शिशिरातले गोठलेपण वितळून, विरघळून नद्या-झर्‍यांच्या रूपात चैतन्य अवतीर्ण होते. सृष्टीत एक चैतन्यनाद घुमून राहिलेला असतो. नवसृजन, नवा उत्साह, नवी आशा, नवी उमेद यांनी माणसे अंतःकरणापासून आनंदी असतात. हाशहुश करीत वसंतवैभव उपभोगत असतात. रस-रंग-गंधांचा आस्वाद घेत असतात. दृष्टी, कान, रसना आणि मन संतुष्ट होत असतात. फुलाफळांचा बहर आणि विपुलता दानाला उद्युक्त करतो. हा उदारात्मा वसंत चेतोहर, मनोहर असतो. त्यामुळेच त्याला ‘ऋतुराज’ ही पदवी बहाल झालेली आहे. चैत्रातले त्याचे आगमन सर्व दृष्टीने शुभंकर असते म्हणून पाडव्याला गुढी उभारून आपण त्याचे स्वागत करतो. त्याच्या हातात हात मिळवतो आणि सर्वांचे सुयश, सुख चिंतितो. येत्या गुढीपाडव्यासाठी सर्वांना वासंतिक शुभेच्छा!!

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

गोव्यात कोरोनाचा थयथयाट!

प्रमोद ठाकूर ‘कोरोना’च्या दुसर्‍या लाटेने दणका दिल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग आली. यापुढे कोरोना महामारीबाबत निष्काळजीपणा नको. ‘जीएमसी’वरील रुग्ण...

मतदारांचा स्पष्ट संदेश

दत्ता भि. नाईक या निवडणुका म्हणजे केंद्रातील सत्ताधारी व सत्ताधारी बनण्याची आकांक्षा बाळगणार्‍यांसाठी संदेश देणारी उपांत्य फेरी आहे....

‘कोविड-१९’चा रोजंदारीवर परिणाम

शशांक गुळगुळे दुसर्‍या लाटेने भारतातील फार मोठा गट आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. या लोकांसाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर साहाय्य...

कोरोनाचे संकट आणि देशातील अराजक

प्रा. विनय ल. बापट संकट मोठे आहे आणि आव्हानही मोठे आहे. यापूर्वीही भारताने अशा महामार्‍यांचा सामना केला आहे...

भारतीय सागरी हद्दीत अमेरिकेचे विनाशकारी जहाज

दत्ता भि. नाईक जे घडले ते वरकरणी साधे वाटत असले तरी दिसते तेवढे ते साधे प्रकरण नाही. एक...