उमेद

0
25
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

उमेद कोणत्याही कार्यातून अथवा रचनेतून बाहेर काढता येत नाही; ती त्या प्रक्रियेतच विलीन झालेली असते. कलाकार किंवा साहित्यकार जेव्हा व्यथित होतो तेव्हा त्या उमेदीनेच त्याला त्या कलेत जिवंत ठेवायला हवे.

स्फूर्ती व प्रेरणा या चेतना माणसाच्या उमेदीचा झरा वाहता ठेवण्यात अखंडपणे यशस्वी होतात. कितीही संकटे चारी बाजूंनी उभी राहिली तरी नाउमेद न होणे हेच विजयाचे रहस्य असते. ‘जो खचला तो संपला’ तसेच ‘जो थांबला तो संपला.’ पुढे जायची आपली गती जरा कमी-जास्त होईल; पण प्रगती थांबता कामा नये. आपल्या वाटचालीचा आलेख खाली झुकू नये. आलेखाचा चढता क्रम अविरत राहावा याकडे आपले लक्ष असायला हवे.

कित्येक उत्कृष्ट चित्रे काढणारे चित्रकार एका रात्रीत तयार झाले नाहीत. प्रयत्न करताना खूपशी चित्रे अबोड-धोबड होतात. जसे चित्र मनाच्या आतील पडद्यावर उभे असते तसे चित्र हातातल्या ब्रशातून निर्माणच होत नाही. आपल्याच मनाचे समाधान होत नाही तेव्हा काढलेली चित्रे अयशस्वी म्हणून आपल्यालाच फाडून टाकावी लागतात. आपल्या हातांना थकवा येतो; पण मनातल्या उर्मीला व इच्छेला थकवा येऊच नये. आपली जिज्ञासू वृत्ती नेहमीच चिरतरुण असावी.

कविता लिहिताना आपल्या मनातला विचार समाधानकारकपणे कागदावर उतरत नाही. जी आपली कविता आपणच वाचतो तेव्हा शब्द नादमय व औचित्यपूर्ण वाटत नाहीत. ओळी लहान-मोठ्या होऊन एका आकारात येतच नाहीत. कविता शब्दबद्ध न होता पसरत जाते व आपल्यालाच ती एकदम बालीश वाटते. मनासारखी रचना न झाल्यामुळे आपणच आपलीच कविता फाडून टाकतो.
कागदावरच्या कलाकृती फाडून किंवा जाळून टाकल्या तरी मनातील रचना कशाच पुसून टाकता येत नाहीत. कोणत्या तरी दुसर्‍याच स्वरुपात त्या आतल्या आत घोळत असतात आणि योग्य वेळ येताच त्या उत्स्फूर्तपणे प्रकट होतात. मनात खूप वेळ चिंतन, मनन, चर्वण व मंथन झालेली रचना अद्वितीय आणि असाधारण स्वरुपात साकार होते.

नाटक रचणारे नाटककार खूपदा अयशस्वी होतात. कधी संवाद जुळत नाहीत. संवादामध्ये सहजता व वास्तविकता येत नाही. प्रसंग एका घटनेतून दुसर्‍या घटनेत सहज सरकत जात नाहीत तर कमालीचा कृत्रिमपणा जाणवतो. कथानक आणि उद्दिष्ट यांचा ताळमेळ जमत नाही. कधी पात्रे लांबलचक निवेदन करतात, तर कधी स्वगत भाषणच कंटाळवाणे वाटते. भाषा बोजड व जटिल ठरते. प्रेक्षकांवर समर्पक प्रभाव टाकण्यात भाषा असफल बनते. पात्रे आपले व्यक्तित्त्व समर्थपणे रेखाटू शकत नाहीत, आणि सगळा मसालाच प्रयोगासाठी दर्जेदार उतरत नाही.

एकदा नाट्य-रचनेत अपयश मिळाल्यावर तो नाटककार परत एकदा नाट्यरचनेसाठी धडपडताना दिसत नाही. कित्येक नाटककारांनी एक-दोन नाटकांचा प्रयत्न करून नंतर ते क्षेत्रच संपूर्णपणे सोडल्याची कित्येक उदाहरणे आहेत. अवघे थोडेच नाटककार अखंड साधनेने पुढे-पुढे जात नावारूपाला आले आहेत.
कथेचे तंत्र वेगळेच असते. कथा लिहिणार्‍याला वचकाची