उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आहार-विहार

0
36
  • डॉ. मनाली महेश पवार

सध्या अगदी कडक ऊन पडत आहे. शरीराची नुसती लाहीलाही होत आहे. मन बेचैन होत आहे. थंड ठिकाणी जाऊन राहावेसे वाटले तरी प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. मग हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्या आहारामध्ये आणि आचरणामध्ये बदल!

सध्या अगदी कडक ऊन पडत आहे. शरीराची नुसती लाहीलाही होत आहे. मन बेचैन होत आहे. थंड खाण्यापिण्याची इच्छा होते. थंड पाण्यात डुंबून राहावेसे वाटते. थंड ठिकाणी जाऊन राहावेसे वाटते. आपल्या मनाला असे कितीही वाटले तरी प्रत्येकाला व्यावहारिकदृष्ट्या हे शक्य आहे का? मग आपण हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी काय करू शकतो? तर आपल्या आहारामध्ये काही बदल व काही आपल्या आचरणामध्ये बदल!
कडक उन्हाच्या झळा काय फक्त मनुष्यालाच लागतात असे नाही; पशुपक्षीही हैराण होऊन जातात. उन्हाळ्यात झाडाची पाने वाळतात, गवत सुकून पिवळे होते, झुडपे, वेली माना टाकतात, नद्या व इतर प्रवाहांचे पाणी कमी होते, जमिनीला भेगा पडतात…

हवेतील उष्णता वाढल्याने वातावरण रुक्ष होऊन जाते व शरीरात वातदोष साठायला सुरुवात होते. गरम हवेमुळे पचनशक्ती कमी होते व म्हणूनच फारशी भूक लागत नाही. आणि म्हणून आपण चटर-फटर फास्टफूडकडे जास्त आकर्षित होतो व खातो. त्यामुळे पचनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे स्कीन ॲलर्जी, लघवीचे त्रास, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (डिहायड्रेशन) वगैरे त्रास सुरू होतात. मधुमेही व उच्च रक्तदाब असणाऱ्यांना तर विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणून उन्हाळ्यामध्ये आहार-विहाराचे योग्य पालन करावे, किंबहुना ते न केल्याने असे त्रास उद्भवू लागतात.

उन्हाळ्यातील आहार

  • उन्हाळ्यात चवीला गोड, थंड, द्रव व स्निग्ध असे अन्नपान करायचे आहे, तर खारट, आंबट, कडू व उष्ण अन्नपदार्थ वर्ज्य करावेत.
  • दूध तसेच घरचे ताजे लोणी व तूप यांचे नित्य सेवन करावे. उन्हाळ्यात दह्यापेक्षा ताक हे अधिक पथ्यकर व हितकर आहे. ताकामध्ये जिरे व सैंधव टाकून प्याल्यास पित्ताचे शमन होते. छाछ, ताकाची कढी या ऋतूत सेवन करावी. लस्सी हा प्रकारही उन्हाळ्यात सेवन करू शकता.
  • धान्यांमध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरीपासून तयार केलेला भात, भाकरी, पोळी खावी.
  • कडधान्यांपैकी तूर, मूग, मटकी, मसूर अशी अधूनमधून खावीत.
  • भाज्यांमध्ये दुधी भोपळा, बटाटा, भेंडी, दोडका, पालक, काकडी, कोहळा, पडवळ या भाज्या नित्य वापराव्यात.
  • फळांमध्ये द्राक्षे, कलिंगड, खरबूज, कैरी, आंबा, केळी, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे खावीत.
  • सुक्यामेव्यापैकी मनुका, खारीक, बदाम खावेत.
  • स्वयंपाक करताना जास्त मसाला, मिरची वापरू नये. धणे, जिरे, दालचिनी, जमालपत्र, हळद, कोकम, वेलची, आले असा मसाल्याचा वापर करावा.
  • काकडीची कोथिंबीर नेहमी खावी. काकडी कापून मीठ लावून खावी.
  • पालक, तांदूळजा, माठ, राजगिरा एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा.
  • प्यायचे पाणी सकाळी चांगले उकळून, माठामध्ये भरून ठेवावे. माठामध्ये चंदन, वाळा, तसेच मोगऱ्याची ताजी फुले टाकावीत आणि हे सुंगधी व थंड पाणी प्यावे.
  • तांदळाची खीर, गव्हाची खीर, रव्याची खीर, साखर-भात, नारळाची बर्फी, कोहळ्याचा पेठा, दुधीहलवा अशा गोड गोष्टीचे आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा सेवन करावे.
  • कोकम हे उष्णता व पित्तावरचे उत्तर औषध आहे. उन्हाळ्यात पिकणाऱ्या रातांब्याचा यासाठी उपयोग करावा. 4-5 कोकम फुस्करून पाणी गाळून घ्यावे व त्यात चवीनुसार साखर, मीठ व चिमूटभर जिऱ्याची पूड टाकावी. हे सरबत दुपारच्या उन्हातून फिरून आल्यानंतर घेतल्याने उन्हाचा त्रास होत नाही व पित्ताचेही शमन होते.
  • उन्हाळ्यात मानवाला निसर्गाने दिलेली एक देणगी म्हणजे कलिंगड. कलिंगड शीतकारक, पित्तहारक, मधुर व मूत्रल असते. कलिंगडाचा लाल गर थोडा-थोडा खावा व सालीच्या आत असणारा पांढरा गर मऊ करून आंगाला बाहेरून लावावा. याने उन्हाळ्यात अंगाचा दाह कमी होतो.
  • कैरीचे पन्हे उन्हाळ्याच्या दिवसात उत्तम. कैरी उकडून, आतील गर पाण्यात कुस्करून, गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ, जिरे घालून पन्हे करावे.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत फळांचा राजा आंब्याचेही सेवन करावे. आंबा खाण्याआधी तासभर तरी पाण्यात भिजवून ठेवावा. नंतर त्यांचा रस काढून त्यात घरचे साजूक तूप व चिमूटभर सुंठीचे चूर्ण घालून घ्यावा. अशा प्रकारे खाल्लेला आंबा स्फूर्ती व शरीरशक्ती वाढवण्यास समर्थ ठरतो.
  • शहाळ्याचे पाणी पिणे या ऋतूत अत्यंत लाभदायी ठरते.
  • सरबत या ऋतूत शरीर व मनाला तृप्त करते. त्यामुळे या ऋतूत चहा-कॉफीचे प्रमाण कमी करून त्याऐवजी कोकम, लिंबू यांचे सरबत घ्यावे. कैरी पन्हे प्यावे. उसाचा रस घ्यावा. याने उन्हामुळे आलेला थकवा व तगमग कमी होते.
  • कांदा ग्रीष्य ऋतूसाठी लाभदायक आहे.
  • कोहळ्याचा पेठा उन्हाळ्यात कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी उत्तम.
  • अत्याधिक गरमीमुळे क्षीण झालेल्या रसधातूला पुन्हा तजेला देणारे व शीतल गुणधर्माच्या शतावरी व इतर उपयुक्त वनस्पतींपासून तयार केलेले शतावरीकल्पासारखे टॉनिक रोज दुधात टाकून घ्यावे.
  • उष्माघात झाल्यास कांद्याचा रस घ्यावा.
  • उन्हाळ्यात गुलवेल सत्त्व, प्रवाळ, मोतीभस्म, गुलकंद, मोरावळा या औषधींचा खास उपयोग करावा.
  • दूर्वांचा रस पोटातून घ्यावा.
  • मूत्रल म्हणून धण्याची पूड काही वेळ पाण्यात भिजवून खडीसाखर घालून प्यावे.
  • औदुंबराच्या फळाचे सरबत हे उन्हाळी लागल्यास उत्तम औषध आहे.
  • शरीरातील उष्ण्ातेमुळे नाकातून रक्त येत असल्यास दूर्वाच्या रसाचा उपयोग करावा. गुलकंद, प्रवाळ यांसारखी औषधे घेतल्यास, कांदा हुंगल्यास किंवा उगाळलेल्या चंदनाचा लेप कपाळावर लावल्याने त्रास कमी होतो.
  • तळपाय व तळहाताची जळजळ होत असल्यास मेंदी वाटून लेप केल्याने किंवा तूप लावून काशाच्या वाटीने तळपाय व तळहात घासल्याने दाह कमी होतो.

उन्हाळ्यात आचरण कसे असावे?

  • कामाशिवाय उन्हात घराबाहेर पडू नये.
  • पातळ व सुती कपडे घालावेत व तेही शक्यतो पांढऱ्या किंवा फिक्या रंगाचे असावेत.
  • बाहेर जाताना छत्री, टोपी व गॉगल्स यांचा वापर करावा.
  • घरात पंखा, एसी किंवा खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावून, पाणी शिंपडून थंडावा निर्माण करावा.
  • घामाघूम होईल असा व्यायाम न करता पोहण्याचा व्यायाम करावा.
  • शक्यतो गार पाण्यानेच स्नान करावे. अंगाला चंदन, वाळा अशा शीतद्रव्यांचे चूर्ण लावावे.
  • इतर ऋतूत दुपारची झोप अत्यंत निषिद्ध सांगितलेली असली तरी उन्हाळ्यात अर्धा-पाऊणतास झोप घेणे चांगले.
  • रात्री चांदण्यात झोपावे.
  • रात्री जागरण करू नये.
  • शरीर व मनाला आल्हाद देणारी रसरशीत, गोड, पाणीयुक्त अशा फळांचा, फळरसांचा, अधिकाधिक सरबतांचा रतीब वाढवावा.
  • आहारामध्ये चटपटीत, मसालेयुक्त, जडान्नाचे सेवन करू नये.
  • पचण्यास हलका आणि चवीला गोड अशा आहाराचे सेवन करावे. रात्री चांदण्यात फिरावे; दिवसा फिरू नये. व्यायामही स्वशक्तीचा विचार करून बेताचाच करावा. रात्र लहान असल्याने दुपारी अर्धा तास झोपता येते व त्याचबरोबर प्राणायाम, ध्यान, नामस्मरणसारख्या योगसाधनेचा अवलंब करून उन्हाळा सुसह्य करता येतो.