उडता गोवा नको!

0
12

राज्याच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने उत्तर गोव्यात केलेली धडक कारवाई स्वागतार्ह आहे. एका स्थानिकासह दोघा रशियनांना या छाप्यात रंगेहाथ पकडले गेले. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या दोघा रशियनांना पकडले गेले, त्यापैकी एक पूर्वी रशियात पोलीस दलात होता, तर जी महिला पकडली गेली आहे ती तर 1980 च्या ऑलिम्पिकमध्ये पोहण्यातील रौप्यपदकविजेती आहे. ही दुक्कल गोव्यात केवळ विदेशी नागरिकांनाच हवे ते अमली पदार्थ पुरवीत होती असे आढळून आले आहे. एक लक्षवेधी बाब या कारवाईत नजरेस आलेली आहे, ती म्हणजे या दोघांकडे सर्व तऱ्हेचे अमली पदार्थ आढळून आले आहेत. म्हणजे त्यात कोकेन आहे, चरस आहे, एलएसडी आहे, हशीश आहे, एमडीएमए आहे, मिथाम्फिटामाइम आहे आणि शिवाय आपल्या निवासस्थानीच अमली पदार्थ बनवण्याचा कारखानाच त्यांनी उघडलेला होता. गोव्यामध्ये अमली पदार्थ समस्या किती गंभीर बनलेली आहे याचा हा जिताजागता नवा पुरावा आहे. एक गोष्ट या प्रकरणातून समोर येते म्हणजे गोव्यातील अमली पदार्थ व्यवहार हे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहेत. एका फार मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग निश्चितपणे यामध्ये आहे. आतापावेतो गोवा हे अमली पदार्थ तस्करीचे केवळ एक केंद्र मानले जायचे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आणि विदेशांत अमली पदार्थ नेण्यासाठी गोव्याचा एक केंद्र म्हणून वापर होतो असेच राष्ट्रीय अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पूर्वीच्या अहवालांत नमूद केलेले असे. मात्र, त्यानंतरच्या काळात खुद्द गोवा राज्यातही या व्यवहारांचा सुळसुळाट वाढत गेला. मध्यंतरी तेलंगणा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत हैदराबाद आणि परिसरामध्ये अमली पदार्थ गोव्यातून पुरवले जात असल्याचे पुराव्यानिशी समोर आले होते आणि हैदराबादहून तेथील पोलीस येथे कारवाईसाठी आले, तेव्हा स्थानिक पोलीस त्यांना सहकार्य देत नसल्याचे त्यांना जाहीरपणे सांगावे लागले होते. मात्र, एवढा स्पष्ट आरोप त्यांनी करूनही येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सारवासारवच चालवली होती. परवाच्या कारवाईतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते ती म्हणजे गोव्यातील अमली पदार्थ समस्या आता गळ्यापर्यंत आलेली आहे. ज्या प्रकारे विदेशी व्यक्ती यात गुंतलेल्या आहेत, ते पाहता आंतररा ष्ट्रीय टोळीचा या व्यवहारातील सहभाग सिद्धच झालेला आहे. एक काळ होता, जेव्हा मेक्सिको आणि कोलंबियाच्या ड्रग माफियांनी संपूर्ण जगामध्ये अमली पदार्थांचे जाळे विणले होते. अमेरिकेने त्यांची पाळेमुळे उखडली. ‘गॉडफादर’ मिंगेल आग्नेल फेलिक्स गॅलार्डोचे ग्वादालाजारा कार्टेल असेल,
मेक्सिकोच्या एल चापो गुझमानचे सिनोलिया कार्टेल असेल, कोलंबियाच्या पाब्लो एस्कोबार गॅव्हीरियाचे मेडेलीन कार्टेल असेल, गिल्बर्टो रुद्रिगिशचे काली कार्टेल असेल, त्यांनी त्या काळात जगाला हादरवून सोडले होते. अमली पदार्थांचा व्यवहार केवळ नशेचा बाजारच घेऊन येत नाही, तर प्रचंड गुन्हेगारी, दहशतवादही घेऊन येतो हे त्या टोळ्यांनी सिद्ध केले. त्यानंतरच्या काळात जगभरात अमली पदार्थ तस्करीचा विषय गांभीर्याने घेतला गेला व त्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्नही झाले, तरीही ही विषवल्ली मिटलेली नाही. भारतामध्ये पंजाबसारख्या राज्याला उडता पंजाब म्हणावे लागेपर्यंत अमली पदार्थांनी वेढले आहे. पलीकडच्या पाकिस्तानातून पंजाबच्या तगड्या, शूर शीख तरुणांना व्यसनी आणि भारतद्रोही बनवण्याचे षड्यंत्र गेली कितीतरी वर्षे सुरू आहे. आता गोव्यासारख्या शांती, सलोखा, सौहार्द यासाठी आजवर ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशालाही उडता गोवा बनवायचे नसेल, तर अमली पदार्थांच्या या संकटाविरुद्ध फार मोठी आघाडी उघडावी लागेल. पोलिसांनी आणि राजकारण्यांनी मनात आणले तर चोवीस तासांत हे सगळे स्वच्छ होऊ शकते, परंतु या व्यवहारांना अभय देणारा व्यापक भ्रष्टाचार आणि विदेशी कातडीपुढे चालणारा स्थानिक राजकारण्यांचा लाळघोटेपणा ही त्यातील सर्वांत मोठी अडचण आहे. परंतु आता हे गोव्याच्या गळ्याशी आलेले आहे याची जाणीव सत्ताधाऱ्यांना ठेवावी लागेल व कारवाईचे व्यापक पाऊल उचलावे लागेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री या नात्याने स्वतः या विषयात लक्ष घालावे आणि अमली पदार्थाच्या संकटाविरुद्ध केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने एक व्यापक, राज्यव्यापी मोहीम उघडावी. दयामाया न दाखवता सर्व संबंधितांच्या मुसक्या आवळाव्यात. जे विदेशी नागरिक पर्यटक असल्याच्या बहाण्याने येथे वर्षानुवर्षे वास्तव्य करून असतात, व्यवसाय चालवतात, त्यांची परत पाठवणी करावी. त्यांना आसरा देणाऱ्या स्थानिकांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारावा. तरच ही वाळवी नष्ट करता येईल, अन्यथा उद्या ती अवघा गोवा पोखरून काढील.