>> हेलिकॉप्टर कोसळून परराष्ट्रमंत्र्यांसह 9 जणांचे निधन
इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी व परराष्ट्रमंत्री होसेन अमीराबदुल्लाहियान हे अजरबैजानमधून परतत असताना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली होती. 17 तास उलटल्यानंतर शोध आणि बचाव पथकाला हे हेलिकॉप्टर सापडले. अपघातात साडलेले हे हेलिकॉप्टर जळून खाक झाले असून या अपघातात रईसी यांच्यासह कुणीही वाचलेले नाही. एकूण 15 प्रवासी क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमधून एकूण 9 जण प्रवास करत होते. हेलिकॉप्टरचे अवशेष अझरबैजानच्या टेकड्यांमध्ये सापडले होते.
इराणच्या प्रेस टीव्हीने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये, बचाव पथकाने अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवली आहे. त्यांना त्या ठिकाणी कुणीही जिवंत असल्याचे आढळून आलेले नाही. अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर्स होती. ज्यातली दोन सुखरुप परतली. मात्र इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियन ज्यामध्ये होते ते हेलिकॉप्टर कोसळले आणि मोठा अपघात झाला. 16 तासांहून अधिक काळ शोधमोहीम चालू होती. आता या पथकाला हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले आहेत. या घटनेत इब्राहीम रईसींसह हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सगळ्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.
अंतरिम अध्यक्ष
रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद मोखबर (वय 68) हे आता अंतरिम अध्यक्षपद भूषविणार आहेत. रईसी यांच्याप्रमाणेच मोहम्मद मोखबर हेदेखील इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या जवळचे असल्याचे मानले जाते.
मोदींकडून दुःख
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या संदेशात रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या बातमीने मी चिंतेत आहे. या कठीण काळात आम्ही इराणसोबत असल्याचे म्हटले आहे.
गोव्यात आज दुखवटा
गोवा सरकारकडून 21 मे 2024 रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इब्राहिम रायसी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री होसेन अमीराबदुल्लाहियान यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत रविवारी निधन झाले आहे. राज्य सरकारकडून आज 21 रोजी दिवंगत राष्ट्राध्यक्ष डॉ. इब्राहिम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरकारी कार्यालयातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहेत. तसेच, सरकारी पातळीवर कुठलाही मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार नाही, असे सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन विभागाने कळविले आहे.