इफ्फीच्या प्रतिनिधी नोंदणीला सुरूवात

0
28

>> 20 नोव्हेंबरपासून 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणीला प्रारंभ झाला आहे. गोव्यात येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित (एनएफडीसी) तसेच केन्द्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गोवा राज्य सरकारच्या गोवा एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (इएसजी) आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेमे दाखवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.

54 व्या इफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध आहे. चित्रपटप्रेमी प्रतिनिधी, व्यावसायिक प्रतिनिधी नोंदणीसाठी एक हजार रुपये आणि जीएसटी शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थी प्रतिनिधीसाठी नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केलेल्या 17 व्या फिल्म बझारसाठीदेखील नोंदणी सुरू झाली आहे.

हा वार्षिक चित्रपट महोत्सव, भारतातील आणि जगभरातील चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांना एकाच छताखाली आणतो, तसेच तरुण प्रतिभेला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपुढे कला सादर करण्यासाठी व्यासपीठ देखील प्रदान करतो. इफ्फी, विविध विभागांमध्ये वैविध्यपूर्ण भारतीय आणि जागतिक सिनेमांची निवड करते. आंतरराष्ट्रीय स्पर्धा (15 निवडक दर्जेदार सिनेमांची निवड), आयसीएफटी- गांधी पदक पुरस्कारासाठी स्पर्धा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण चित्रपट स्पर्धा, सर्वोत्तम जागितक सिनेमा (इफ्फीने जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपटातून केलेली अधिकृत निवड), इंडियन पॅनोरमा (विविध भारतीय भाषांमधील सिनेमॅटिक, संकल्पनाधारित आणि सौंदर्यविषयक उत्कृष्टतेचा वैशिष्ट्‌‍यपूर्ण चित्रपट आणि गैर-चित्रपटांचा संग्रह), महोत्सव कॅलिडोस्कोप (दिग्गजांचे असमान्य चित्रपट, उदयोन्मुख प्रतिभांचे काम, इतर महोत्सवातील समीक्षकांनी नावाजलेले चित्रपट) अशा काही विभागांचा यात समावेश आहे. कंट्री फोकस, ॲनिमेशन, माहितीपट आणि गोवन चित्रपट यांसारख्या भारतीय आणि परदेशी चित्रपटांचे विशेष तयार केलेले पॅकेजदेखील वैशिष्ट्‌‍यपूर्ण आहेत.