‘इफ्फी’चे कवित्व

0
33

शिमगा संपल्यावर कवित्व उरावे, तशी गोव्यात भरलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची म्हणजेच ‘इफ्फी’ची सांगता ‘द काश्मीर फाईल्स’ संदर्भातील वादाने झाली आहे. महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागाच्या परीक्षक मंडळाचे प्रमुख व इस्रायली चित्रपटनिर्माते नदाव लॅपिड यांनी समारोप सोहळ्यात त्या चित्रपटाची संभावना ‘प्रचारकी’ आणि ‘बीभत्स’ अशा शेलक्या शब्दांत करून, असा चित्रपट कलात्मक व स्पर्धात्मक विभागात येणे अयोग्य असल्याचे समस्त परीक्षक मंडळाचे मत असल्याचे विधान केले. काल परीक्षक मंडळाच्या वतीने मात्र एक निवेदन जारी झाले, त्यात लॅपिड यांचे मत हे त्यांचे वैयक्तिक मत असून परीक्षक मंडळाची ती भूमिका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. इस्रायलच्या राजदूतांनी तर त्याही पुढे जात आपल्या देशबांधवाला खुले पत्र लिहून महोत्सवात औचित्यभंग केल्याबद्दल फैलावर घेतले आहे. आता तर लॅपिड विरोधात पोलीस तक्रारही दाखल झालेली आहे. त्यामुळे ‘इफ्फी’ संपता संपता त्याला गालबोट लावणार्‍या या वादाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ हा काश्मिरी पंडितांची ठसठसती वेदना मांडणारा दाहक चित्रपट आहे, त्यामुळे त्यासंदर्भात आजवर दोन्ही टोकाची मते व्यक्त झालेली आहेत, परंतु चित्रपट परीक्षक मंडळाच्या प्रमुखाने महोत्सवाच्या व्यासपीठावर, समारोप सोहळ्यामध्ये एखाद्या चित्रपटाचे नाव घेऊन त्याची अशी शेलकी संभावना करणे हे औचित्याला धरून आहे का, हा यातील मूलभूत प्रश्‍न. ‘आपले हे म्हणणे आपण खुलेपणाने मांडतो आहोत, कारण कलेसाठी आणि जीवनासाठी अशी गंभीर चर्चा होणे अशा प्रकारच्या महोत्सवांमध्ये आवश्यक आहे,’ असेही विधान त्यांनी आपल्या या शेरेबाजीच्या समर्थनार्थ केले. मग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ‘द काश्मीर फाईल्स’च्या निर्मात्यांना नाही का असाही प्रश्‍न निश्‍चित विचारला जाऊ शकतो. लॅपिड यांना भले तो चित्रपट आवडला नसेल, रुचला नसेल, किंबहुना खरे तर त्यातील उघडेवागडे वास्तव सोसले नसेल, परंतु त्याचा अर्थ त्या चित्रपटाला ते समस्त परीक्षक मंडळाचे प्रातिनिधिक मत असल्याचे सांगून ‘प्रचारकी’ म्हणून असे जाहीरपणे कसे काय हिणवू शकतात? ‘द काश्मीर फाईल्स’ मध्ये दाखवले गेलेले प्रसंग प्रत्यक्षात भोगावे लागलेली काश्मिरी पंडित आणि त्यांचे जवळचे सगेसोयरे आज हयात आहेत. ते त्या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. हा चित्रपट बघताना त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. त्या कटू काळाच्या आठवणींनी ते क्षणोक्षणी कासावीस होत होते, ही सगळी पार्श्‍वभूमी ‘बीभत्स’ म्हणून निकालात काढणारे हे लॅपिड कोण? त्या चित्रपटातील दृश्ये ‘बीभत्स’ वाटत असतील, तर त्याचे कारण मुळात काश्मीरमध्ये जो नंगानाच दहशतवाद्यांनी त्या काळात घातला, तोच एवढा बीभत्स होता, अमानुष होता हेच आहे. अर्थात, लॅपिड यांना हे वास्तव एवढे का झोंबले त्यालाही एक पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे येथे त्यांची कुंडली मांडणे जरूरी आहे.
लॅपिड हे इस्रायली असले, तरी ते पॅलेस्टाईन समर्थक आहेत. न्यू टोरंटो नामक मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वतःच्याच देशाला यापूर्वी ‘सीक सोल’ संबोधलेले होते. ‘इस्रायलचे अस्तित्व खोट्यावर आधारित आहे’ असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तेथील सरकारने चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक निधी उभारण्याचे ठरवले, तेव्हा लॅपीड यांनी त्याविरोधात आघाडी उघडली होती. लॅपिड यांचे वय केवळ ४७ आहे. आजवर त्यांनी केवळ तेरा चित्रपटांची निर्मिती केली आहे व त्यातील बहुतेक लघुपट आहेत. एवढा अल्प अनुभव असलेल्या या व्यक्तीची ‘इफ्फी’ मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागासारख्या प्रतिष्ठित विभागाच्या परीक्षक मंडळाच्या प्रमुखपदी वर्णी कशी लागली हाही कुतूहलाचा भाग ठरतो. पूर्वी एकदा हे नदाव इफ्फीतील एका अन्य विभागात परीक्षक होते. त्यांच्या काही चित्रपटांची लोकार्नो, बर्लिन आणि कान येथील चित्रपट महोत्सवांमध्ये तेथील परीक्षकांकडून वाहवा झाली. नंतर लॅपिड यांचीच त्या महोत्सवांच्या परीक्षक मंडळावर वर्णी लागली. त्यामुळेच त्यांना ‘इफ्फी’चे आवतण गेेले असावे. स्वतःला ‘अँटी एस्टाब्लिशमेंट’ असल्याचे दाखवले की आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा लोकांची वाहवा होते. पुरस्कार वगैरे देऊन प्रोत्साहन दिले जाते. अशा विचारांच्या मंडळींचा प्रभाव कला, शिक्षण यासारख्या क्षेत्रांवर पूर्वीपासून जगभर राहिला आहे. कोणी कोणती विचारधारा अनुसरायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. हे मतस्वातंत्र्य असणे अत्यंत आवश्यकच आहे. परंतु कलात्मक निर्मितीमध्ये केवळ एकाच दिशेने विचार मांडले गेले पाहिजेत असा आग्रह जर धरला जाणार असेल, तर तो मांडणारे कोणीही का असेना, त्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कसे मानायचे? कलेची मूल्ये कोणती, ती कोणी ठरवायची? त्यांचा मक्ता अमूक एका विचारधारेलाच बहाल केलेला आहे का? असे अनेक प्रश्न या वादाने उपस्थित केले आहेत. कलात्म अभिव्यक्तीचे एकतर्फी मापदंडही या वादात नक्कीच उघडे पडले आहेत!