योगसाधना- 609, अंतरंगयोग- 194
- डॉ. सीताकांत घाणेकर
श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अशिक्षित… यांच्याशी चांगले वागून त्यांचे आशीर्वाद मिळण्याची संधी जास्त असते. शेवटी इतरांच्या शुभेच्छा, आशीर्वाद हीच प्रत्येकाची खरी संपत्ती आहे, जी दैवी खजिन्यात संचित रूपाने जमा होऊन प्रारब्धात येईल!
प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात विविध कारणांसाठी विविध व्यक्ती येतात. कुठल्या तरी कामासाठी, व्यवहारासाठी, सणानिमित्ताने, कौटुंबिक अथवा सामाजिक उत्सवाप्रीत्यर्थ, आरोग्याच्या समस्येवरील उपायासाठी वगैरे… अशा अनेक प्रसंगी! यांतील प्रत्येक व्यक्तीचा व्यवहार आपल्या संस्कारांप्रमाणे वेगवेगळा असतो. घटना घडून गेली की आपण त्या व्यक्तींना विसरूनही जातो.
युवकांच्या मेळाव्यात एका संताचे प्रवचन होते. त्यांनी युवकांना एक प्रश्न विचारला, ‘तुम्हाला एखादी सुंदर व्यक्ती दिसली- स्त्री किंवा पुरुष- अत्यंत आकर्षक- तर त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या मनात किती वेळ राहील? काही मिनिटे, तास, दिवस…?’
उत्तर होते- ‘थोडा वेळ!’
‘तुम्ही कुणाच्या तरी घरी काही कामासाठी गेला. त्या व्यक्तीने तुमचे स्वागत केले. तुम्हाला बसायला सांगितले. खायला-प्यायला दिले. तुम्ही कुठे जात होता तिथे आपल्या गाडीने सोडले… सारांश- मधुर वाणी, छान व्यवहार (स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून!) तर अशी व्यक्ती, घटना तुमच्या मनात किती वेळ राहील?’
उत्तर होते- ‘चिरकाल… अनेक वेळा त्यांची आठवणदेखील होईल. आम्ही इतरांनासुद्धा त्यांच्याबद्दल सांगू…’
सारांश काय तर व्यक्तीच्या व्यवहाराचा प्रभाव प्रत्येकावर पडतो; तिच्या बाह्य सुंदरतेचा, दिखाव्याचा नाही! तसेच त्या व्यक्तीला प्रत्येकाकडून शुभेच्छा मिळतील. अशा व्यक्तीला भेटून इतरांना आनंदही होईल!
प्रवचनाचा दिवस होता. विषय होता- ‘बाह्य देखावा व व्यवहार.’ प्रवचनात संताने हे फार छान उदाहरण दिले होते. समारोपाच्या वेळी संताने युवकांना आठवण करून दिली, आपला व्यवहार इतरांकडे कसा असावा? येशू ख्रिस्त तर म्हणतात, ‘आपल्याकडे इतरांनी कसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण दुसऱ्याकडे वागावे! जीवन सर्वांना सुसह्य, सुखद होईल.’
समाजावर नजर फिरवली तर बहुतेकवेळा आपला अनुभव वेगळाच असतो. अर्थात अपवाद आहेतच. पण जास्त करून सरकारी दफ्तरांमध्ये कामगार आपुलकीने काम करत नाहीत. नम्रता त्यांच्याकडे जवळजवळ नसतेच. मोठे लोक- उदा. मंत्री आले तर त्यांचा व्यवहार चांगला असतो. खरे म्हणजे त्यांच्याकडे सर्व तऱ्हेच्या व्यक्ती येतात- श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अशिक्षित… म्हणून त्यांना त्यांच्याशी चांगले वागून त्यांचे आशीर्वाद मिळण्याची संधी जास्त असते. शेवटी इतरांच्या शुभेच्छा, आशीर्वाद हीच प्रत्येकाची खरी संपत्ती आहे, जी दैवी खजिन्यात संचित रूपाने जमा होऊन प्रारब्धात येईल!
बालपणात आजी म्हणायची- ‘लोकांची, विशेषतः गरिबांची ‘हाय’ घेऊ नका!’ त्यावेळी याचा अर्थ समजला नव्हता; आता समजतो. अनेकवेळा आपण इतरांकडे चांगले वागतो. पण काही कारणांमुळे ती व्यक्ती व्यवस्थित वागत नाही. आपल्या मनाला वेदना होतात. तेव्हा आपणदेखील स्वतःचा व्यवहार बदलण्याची शक्यता असते. अशावेळी सभ्य व्यक्तीने स्वतःचा व्यवहार बदलू नये. त्याने चांगुलपणाच दाखवावा. ‘स्व-माना’मध्ये राहावे. स्वतःच्या आत्मिक गुणांचे ध्यान ठेवावे.
पवित्रता, ज्ञान, सत्य, प्रेम, शांती या आध्यात्मिक ज्ञानामुळे मनाची चलबिचल होत नाही. चित्त शांत राहाते. समस्येला सामोरे जाण्याची ताकद वाढते. विश्वाच्या इतिहासात अशा अनेक व्यक्तींची उदाहरणे आहेत- यम, कृष्ण, बुद्ध, येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस… अशा चरित्रांचा अभ्यास केला तर ऐनवेळी त्यांची आठवण होते. आपला व्यवहार बदलत नाही. यासाठी थोडा अभ्यास व नियमित चिंतनाची आवश्यकता असते.
जगात वावरताना अनेक वेळा दक्षता घ्यावी लागते नाहीतर काहीवेळा आपण फसवलेही जाऊ शकतो. अशा काही घडलेल्या घटना आहेत. एकदा एका सज्जनाची रेल्वेमध्ये एका अपरिचित व्यक्तीशी ओळख झाली. गप्पा करता करता दोस्ती जमली. जेवणाची वेळ झाली. त्या व्यक्तीने आपल्याकडचे थोडे अन्न सज्जनाला दिले. देवाण-घेवाण झाली. आभार प्रदर्शनदेखील झाले.
थोड्या वेळानंतर सज्जन झोपी गेला. उठून बघतो तर ती दुसरी व्यक्ती तिथे नव्हती आणि त्याचे सगळे सामान चोरीला गेले होते. सज्जनपणाची ही किंमत त्यांना द्यावी लागली. म्हणून थोडी दक्षता आवश्यक आहे.
काही वेळा आपल्या सज्जनतेचा फायदा घेऊन गोड गोड बोलून आपले आप्तेष्टदेखील आर्थिक व्यवहारात फसवतात. तरुण मुला-मुलींच्या प्रेमप्रकरणातदेखील अशा विविध घटना घडतात. अनेक वेळा घरच्या वडीलधाऱ्यांचा विरोध सहन करून प्रेम प्रकरण वाढत जाते. अनेक वेळा लपून-छपून प्रेमाचे चाळे केले जातात. अनेकवेळा घटस्फोटदेखील होतात. केव्हा केव्हा मुलगी लग्नाआधीही गर्भवती होते. मग सर्व तऱ्हेच्या समस्या उद्भवतात. सर्वांना माहीत आहे, हे पवित्र प्रेम नसून केवळ मोह आहे. काही वेळा शास्त्रशुद्ध पद्धतीने- नक्षत्र बघून, कौल-प्रसाद घेऊनदेखील भांडणे, घटस्फोट होतात. अनेकवेळा ओळखीच्या कुटुंबातदेखील असे घडते. वकील सांगतात की हल्ली घटस्फोटाची संख्या पुष्कळ वाढली आहे. या सर्व घटनांची कारणे वेगवेगळी आहेत. प्रेमाचा फक्त देखावा असतो. अनेकवेळा प्रेम शारीरिक असते. स्वार्थामुळेही लग्ने केली जातात. उदा. हुंडा. या घटना कथाकथित सुशिक्षित समाजाला भूषणावह नाहीत. विवाह हे एक पवित्र बंधन आहे याची जाणीव सर्व संबंधितांना हवी.
सारांश, प्रत्येक व्यक्तीने आपल्या व्यवहाराच्या परिणामांबद्दल विचार व चिंतन केले तर जीवन सुसह्य होईल.