आल्या ग श्रावणधारा…

0
19
  • राधा भावे

भारतीय जीवन-परंपरेला भौतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच अंगांना खूप आत्मीयतेने भिडणारा हा श्रावण, निसर्गाच्या कणाकणाला नवचैतन्य आणि तजेला घेऊन आलेला असतो. सर्वत्र भरून राहिलेली प्रसन्नता आणि पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या देखण्या रूपांच्या आविष्काराने सजलेला हा श्रावण म्हणूनच तर सर्वांना प्रिय वाटतो. सृष्टीने मुक्त हस्ताने उधळलेली विविध रंगगंधांची फुले, हिरव्या अनेक छटांनी नटलेली पाने- हे वैभव नेत्रसुखद तर असतेच, मनात या भवतालाविषयीचे कृतज्ञतेचे भाव जागवणारेही असते. आणि या काळात साजऱ्या होणाऱ्या, सणा-उत्सवांद्वारे आपण हीच कृतज्ञता मनःपूर्वक व्यक्त करण्याची परंपरा सांभाळत असतो.

ग्रीष्माच्या झळा वाढू लागल्या की अवघी सृष्टी आतुरतेने पावसाची वाट पाहू लागते. त्याच्या येण्याचं औत्सुक्य शिगेला पोचतं. सालाबादप्रमाणे तो येणारच हे माहीत असूनही त्याच्या येण्याबाबतची अनिश्चितता, त्याच्या हुलकावण्या बघून, कधी नाराज होऊन तर कधी व्याकूळ होत त्याची प्रतीक्षा केली जाते. आणि एक दिवस अवघ्या चराचरातून उठलेल्या हाकेला, पृथ्वीवरच्या सर्व जिवांच्या आर्जवाला प्रतिसाद दिल्यासारखा तो वाजत-गाजत येतो. अचानक अंधारून येतं, आकाशात गर्द काळ्या मेघांची गर्दी झालेली असते, सोसाट्याचा वारा सुटतो, विजांचा कडकडाट होतो आणि मग सरींचा वर्षाव… एकदाचा पावसाळा सुरू होतो! आषाढभर अतिशय मोठ्ठी जबाबदारी पार पाडत असल्यासारखा अगदी कर्तव्यतत्पर भावाने तो धो-धो कोसळत राहतो. श्रावणाच्या उंबरठ्याशी पोचता-पोचता तो थोडा धिमा, अल्लड, लडिवाळ होतो. खूप सलगीतला असलेल्या शेजाऱ्याच्या मुलासारखा खोडकर आणि लाघवी!

आषाढ संपता संपता पावसाची जणू संततधार आणि त्वेषाने कोसळण्याची चिकाटीही संपून जाते. उन्हे धीट बनतात. पावसाशी लपंडाव खेळू लागतात. मनसोक्त पाणी पिऊन तृप्त झालेल्या, तरारलेल्या सृष्टीवर एक अलौकिक चकाकी येते. जिथं-तिथं साचलेल्या पाण्यातली गढुळता कमी होते. झरे, पावसाळी धबधबे, शुभ्र-धवल पाण्याचे स्रोत विलक्षण हौसेने, ऊर्मीने वाहत असतात. नजर जाईल तिथे हिरवाई दिसते. झाडापेडांनाच नव्हे तर दिसेल त्या, कवेत येईल त्या सजीव-निर्जिवांना वेढा घालून, त्यांना वेगळंच रूप आणि आकार देणाऱ्या रानवेलींची झूल जिथं-तिथं जागा व्यापून असते. हे हिरवं-नवल डोळ्यांना सुखावत राहतं.
सृष्टीला विलक्षण देखणं रूप बहाल करणाऱ्या या श्रावणाला भारतीयांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. सणवार, व्रत-वैकल्यांचे वैपुल्य ही त्याची खासियत. या महिन्यातील प्रत्येक दिवसाचे अक्षरशः वेगळे वैशिष्ट्य आणि महत्त्व असते. आठवड्यातील त्या-त्या वाराशी जोडलेली व्रतवैकल्ये असतात. ही व्रते करताना पूजाअर्चा, उपास-तपास आणि त्या व्रतांस अनुलक्षून पारंपरिक कहाण्या सांगितल्या, ऐकल्या जातात. काही विशिष्ट नेमनियम पाळले जातात. श्रावण सोमवारी अत्यंत भक्तिभावाने श्रीशंकराची पूजा, उपासना केली जाते. नवीन लग्न झालेल्या स्त्रिया शिवामूठ वाटतात. दर मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीचं पूजन करतात. हळदी-कुंकू समारंभ करून, पारंपरिक आरत्या, गाणी म्हणून व फुगड्या, तऱ्हेतऱ्हेचे खेळ खेळून रात्र जागवतात. काही ठिकाणी शुक्रवारी जीवनीदेवीची पूजा केली जाते. कुणी गुरुवारी, शनिवारी एकभुक्त राहण्याचा नेम पाळतात. रविवारी स्त्रिया आदित्यदेवाची पूजा मांडतात. विशेषतः शिवमंदिरांमध्ये जलाभिषेक, भजन, कीर्तन, पोथ्या-पुराणांचे वाचन आदींचे ठरावीक दिवशी अथवा महिनाभर आयोजन केले जाते.

श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला कुठे नागांच्या प्रतिमा बनवून, तर कुठे वारुळापाशी जाऊन नागपूजा केली जाते. कोळी बांधवांचा- समुद्राला नारळ अर्पण करून पावसाळ्यात बंद असलेल्या मासेमारीची सुरुवात करण्यासाठी पाण्यात होड्या सोडण्याचा, अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा ‘नारळी पौर्णिमा’ हा सण याच महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. याच दिवशी बहीण भावाचे औक्षण करून त्याच्या मनगटावर राखी बांधते आणि ‘रक्षा-बंधन’ हा हृदयसोहळा साजरा होतो. श्रावण वद्य अष्टमीला मध्यान्ह रात्री, धुवाधार पाऊस कोसळत असताना एका कैदखान्यात जन्म घेतलेल्या, पुढे एक खोडकर पुत्र, जिवाभावाचा सवंगडी, घनिष्ठ सखा, उत्कृष्ट प्रियकर, आदर्श पती, बंधू, आत्मज्ञानाचा प्रकाश देणारा युगपुरुष म्हणून भारतीय जनमानसात अत्यंत प्रेमाचे, श्रद्धेचे स्थान मिळवलेल्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस. तो खूपच उत्साहाने अन्‌‍ भक्तिभावाने साजरा केला जातो. आणि त्याहीपेक्षा दुप्पट उत्साहाने आणि धूमधडाक्यात दुसऱ्या दिवशी ‘गोपाळकाला’ आणि ‘दहीहंडी’चा कार्यक्रम साजरा होतो. श्रावण अमावास्येला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, वंशवृद्धीसाठी स्त्रिया व्रत करतात. चौसष्ट योगिनींची पूजा करतात. ही पिठोरी अमावास्या म्हणून ओळखली जाते. याच दिवशी कृषिसंवर्धनात मदत करणाऱ्या बैलांविषयी आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘बैलपोळा’ हा सण शेतकरीबंधू खूप आनंदाने साजरा करतात.

मुंज झालेल्या ब्राह्मणांमध्ये उपकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करण्याचा धार्मिक विधी- ‘श्रावणी’ याच महिन्यात केली जाते.
भारतीय जीवन-परंपरेला भौतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच अंगांना खूप आत्मीयतेने भिडणारा हा श्रावण, निसर्गाच्या कणाकणाला नवचैतन्य आणि तजेला घेऊन आलेला असतो. सर्वत्र भरून राहिलेली प्रसन्नता आणि पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या देखण्या रूपांच्या आविष्काराने सजलेला हा श्रावण म्हणूनच तर सर्वांना प्रिय वाटतो. सृष्टीने मुक्त हस्ताने उधळलेली विविध रंगगंधांची फुले, हिरव्या अनेक छटांनी नटलेली पाने- हे वैभव नेत्रसुखद तर असतेच, मनात या भवतालाविषयीचे कृतज्ञतेचे भाव जागवणारेही असते. आणि या काळात साजऱ्या होणाऱ्या, सणा-उत्सवांद्वारे आपण हीच कृतज्ञता मनःपूर्वक व्यक्त करण्याची परंपरा सांभाळत असतो. आपल्या जगण्यास सहकार्य करणाऱ्या निसर्गसाखळीतील नाग, बैल, जल, अग्नी या सर्वांचेच ऋण मान्य करून फुले, पत्री, पाण्याद्वारे केले जाणारे हे पूजन, परस्पर साहचर्य आणि आत्मीयता वृद्धिंगत करण्याचा संदेश देणारे हे सणवार मानवी मनाला आनंद व ऊर्जा देतात. शिवाय हे श्रावण-सण कौटुंबिक, सामाजिक सौहार्द वाढवण्यासही मदत करतात. पूजेसाठी फुला-पानांची सजावट करणे, स्वतः सजणे-धजणे, सणावाराच्या निमित्ताने उत्तमोत्तम खाद्यपदार्थ बनवणे, इतरांना खाऊ घालणे, स्वतः सेवन करणे, एकमेकांच्या घरी जाणे, यामुळे परस्पर संबंध, नाती दृढ होतात. सुरक्षिततेची भावना वाढीस लागते. व्रतांचा अंगीकार करून विशिष्ट संकल्प करणे, ते तडीस नेणे, नेम-नियम पाळणे, पोथी वाचन, जपजाप्य, तीर्थयात्रा या साऱ्यांद्वारे आपल्या मानसिक शक्तीला उन्नत करण्याच्या, सात्त्विकता वाढवण्याच्या दृष्टीने पण नकळत उपयोग होतो. भारतीय कृषिसंस्कृतीचे अधिष्ठान लाभलेले श्रावणातील हे सणवार, उत्सव, सोहळे आपल्या दैनंदिन जीवनात, विशेषतः स्त्रियांच्या रोजच्या जगण्यात विशेष रंग भरतात एवढे खरे. उपवास, व्रत-उत्सव, पठण-श्रवणाद्वारे शारीरिक आरोग्य, मानसिक आनंद आणि बौद्धिक समाधानाची वर्षभरासाठीची शिदोरी बांधून देणारा हा श्रावण म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटतो आणि श्रेष्ठही मानला जातो.
क्षणात रिमझिमणाऱ्या, क्षणात अदृश्य होणाऱ्या, कधी सोनेरी उन्हाचं तर कधी भिरभिरत्या वाऱ्याचं बोट धरून येणाऱ्या श्रावणसरी, विलोभनीय दृश्यनिर्मितीतून निसर्गाच्या लालित्याचे दर्शन घडवतात. आभाळाच्या गडद निळाईवर कधी-कधी नयनरम्य इंद्रधनू उमटतं, तर कधी तृणपात्यांवर अथवा झाडावेलींच्या पानांच्या टोकाशी अडकलेला पाण्याचा थेंब, पाहुण्या आलेल्या सूर्यकिरणात एखाद्या हिऱ्यासारखा चमकतो, पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करतो. चांदण्यारात्री रिमझिमणाऱ्या श्रावणसरीची तर गोष्टच न्यारी! चांदण्यात चमचमणाऱ्या मृदुमुलायम चंदेरी लडीच जणू!! सौंदर्याची ही इतकी नेत्रसुखद उधळण या श्रावणधाराच करू जाणे!
श्रावण पाहताना, श्रावण अनुभवताना, सृजनशील मनाला निर्मितीचे अंकुर फुटले नाहीत तरच नवल! म्हणूनच तर कवी-लेखकांच्या आणि गायक-संगीतकारांच्या शब्द-स्वरात तो वैविध्यपूर्ण रूपात पुन्हा-पुन्हा आविष्कृत होत असतो.
भारतीय शास्त्रीय संगीतातील बंदिशीमध्ये श्रावण जसा मिसळून गेलेला दिसतो, तसाच उत्तर भारतातील लोकसंगीतामध्ये- नागपंचमी, मंगळागौरीच्या पारंपरिक गीतांमध्ये, कोळीगीतांमध्ये- त्याचे मोहक रूप आढळते.

कवी मंडळीनी तर श्रावणाची इतकी रूपं शब्दबद्ध केलीत की या शब्दा-शब्दातून, ओळी-ओळीतून उभं राहणारं श्रावणचित्र मनाला आल्हाद देऊन जातं. कवी कुसुमाग्रजांच्या ‘हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला’ वाचताना त्याचे लडिवाळ लोभस रूप जसे मनःचक्षूपुढे उभे राहते तसेच कवी मंगेश पाडगावकर यांची ‘श्रावणात घननीळा बरसला’ ही रचना वाचता-ऐकताना खरोखर श्रावण आपल्या दारात बरसू लागल्याचा सुखद भास होतो. ‘पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले’ किंवा ‘मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा’ हे श्रावणक्षणाचे यथार्थ वर्णन मन मोहवून टाकते. अर्थात, कवी वैभव जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे-
हा श्रावण म्हणजे त्रास पुन्हा
घनगर्द स्मृतींचा भास पुन्हा
असाही कुणाचा अनुभव असू शकतो.
एक खरं, तो येतो, दिसतो तेव्हा कवी गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेले हेच भाव मनात आनंदाचे, उल्हासाचे कारंजे बनून नाचू लागतात.
मातीच्या गंदात, झिंगून सांगतो
उनाड अल्लड वारा
सोनिया उन्हात, न्हाऊन माखून
आल्या ग श्रावणधारा…