आरोग्यमंत्र्यांवर कॉंग्रेसची टीका

0
116

गोव्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची घोषणा करून खळबळ उडवून नंतर सदर वृत्त चुकीचे असल्याचे जाहीर करणार्‍या आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्यावर गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल जोरदार टीका केली.
कोरोना विषाणू हा संवेदनशील विषय असल्याने जबाबदारीने वागणे गरजेचे असताना आरोग्यमंत्री राणे यांनी कोरोनाचा गोव्यात पहिला रुग्ण सापडल्याची माहिती जाहीर करण्यापूर्वी योग्य प्रकारे शहानिशी न केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण केले, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

पर्वरीत कोरोना रुग्णाच्या अफवेने खळबळ
पर्वरी भागात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हारयल झाल्याने खळबळ उडाली. पर्वरी येथील एका व्यक्तीच्या नावासह एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही माहिती मिळताच अनेकांनी मित्रांना पाठवून वृत्ताबाबत खातरजमा केली असता सदर माहिती खोटी असल्याचे आढळून आल्याने अनेकांनी सुस्कारा सोडला.

पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी सदर चुकीच्या पोस्टबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करून पोलीस यंत्रणेकडे याबाबत तक्रार करून चौकशी करण्याची विनंती केली आहे. आमदार खंवटे यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली.