आरसा

0
30

(क्षणचित्रं… कणचित्रं…)

  • – प्रा. रमेश सप्रे

आरशाला संस्कृतमध्ये दर्पण, आदर्श, मुकुर असे शब्द आहेत. आपलं सर्व बाजूंनी (आ)दर्शन घडवतो (दर्श) तो आदर्श. व्यक्तिमत्त्व, चारित्र्य, गुण, मूल्यं इ. म्हणून ‘आदर्श’ या शब्दाचा एक अर्थ ज्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखं आपलं जीवन घडवावं अशी व्यक्ती.

‘‘तुला ‘त’ आला गं आजी!’’ सारी नातवंडं कोरसमध्ये ओरडली. हे ऐकून आजी तिच्या गतीनं धावत आली नि वरच्या आवाजात गाऊ लागली- ‘तोरा मन दर्पन कहलाये| भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाये…’ तसा तो कार्यक्रम होता भेंड्यांचा म्हणजे अंताक्षरीचा. पण का कुणास ठाऊक, छोट्या-मोठ्या मुलांना आश्‍चर्य वाटायचं की अंताक्षरीची गाणी म्हणताना आजी-आजोबा इतके भावुक का होतात? ‘स’ अक्षर आलं की मुलांचा कोरस- ‘‘आजोबा, ‘स’ आला तुमचा!’’ मग आजोबांचं खर्जात गाणं सुरू व्हायचं- ‘स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी| आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी|’ हे म्हणताना आजोबा गंभीर होत. आजी-आजोबांच्या या नेहमीच्या गाण्यात एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे- ‘दर्पण’ किंवा ‘आरसा.’ त्याचबरोबर एक जीवनातील सत्य. असो.
आरसा! तसा तो रामायणकालापासून अस्तित्वात आहे. त्यापूर्वीही असेल. जेव्हा बालक रामानं आकाशातल्या चंद्राचा हट्ट धरला तेव्हा सुमंत्रांनी त्याचं आरशात चंद्र दाखवून समाधान केलं होतं. एका अर्थानं राम हा रामचंद्र झाला होता.

आरशाला संस्कृतमध्ये दर्पण, आदर्श, मुकुर असे शब्द आहेत. आपलं सर्व बाजूंनी (आ)दर्शन घडवतो (दर्श) तो आदर्श. पण सर्वबाजूंनी म्हणजे शरीराभोवती फिरवलेल्या कॅमेर्‍यातलं सर्वांगीण छायाचित्र नव्हे किंवा एक्स-रे, एमआरआय, पेटस्कॅन यांसारखं शरीरातील अंतर्भागाचं दर्शन नव्हे. आदर्श शब्दातल्या ‘आ’मध्ये सर्व पैलू येऊन जातात. उदा. व्यक्तिमत्त्व, चारित्र्य, गुण, मूल्यं इ. म्हणून ‘आदर्श’ या शब्दाचा एक अर्थ ज्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखं आपलं जीवन घडवावं अशी व्यक्ती. ज्याला हल्ली ‘रोल मॉडेल’ असंही म्हणतात.

पूर्वी समाजातील शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा सर्वच क्षेत्रांत हिमालयाएवढ्या व्यक्तिमत्त्वाची माणसं होती. आजच्या डिजिटल आणि सायबर युगात अशी माणसं समाजात मिळणं कठीण झालंय. म्हणून विचारवंत म्हणतात- ‘उमलत्या फुलांसाठी (मुलांसाठी) नि उगवत्या युवांसाठी (तरुणांसाठी) घरी आईवडील नि शाळेत शिक्षक हेच समोर दिसणारे आदर्श असायला हवेत!’
दक्षिण भारतात संत नारायणगुरू (स्वामी) यांचे असंख्य अनुयायी आहेत. त्यांच्या पूजास्थानाचं, मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. मोठा प्राकार (परिसर), भव्य मंडप यातून आत गर्भकुडीत (गाभार्‍यात) देवदर्शनासाठी गेल्यावर कोणत्याही देवाची किंवा साधुसंताची मूर्ती नसते; असतो फक्त मोठा आरसा. त्यात आपलं रूप पाहताना आपण अंतर्मुख होतो. बाह्यांगापेक्षा आपल्या अंतरंगाचं दर्शन होऊन आपले गुणदोष कळल्यामुळे आपण स्वतःला सुधारण्याचा, उपासना अधिक जोमानं करण्याचा संकल्प करून परततो.
याच तत्त्वावर आधारित कार्य करत होती एक वधुवर संशोधन संस्था. तिचा विशेष म्हणजे, तुमच्या अपेक्षांना उतरेल अशा मुलीशी तुमची प्रत्यक्ष गाठभेट घडवून आणणे. तुमच्या भावी वधूबद्दलच्या अपेक्षांचा फॉर्म घेऊन तुम्ही इमारतीत प्रवेश करता. त्या फॉर्ममध्ये सूचना असतात. गोरी बायको हवी असेल तर समोरच्या दिशेनं, शिकलेली हवी तर डाव्या बाजूनं, गृहकृत्यदक्ष (म्हणजे सर्व घरकामांत हुशार) हवी असल्यास उजव्या बाजूनं असं करत करत आतल्या खोलीत तुमच्या स्वप्नांची राणी तुमची वाट पाहत असते. उत्सुकतेनं प्रवेश केल्यावर लक्षात येतं की मुलगीबिलगी काही नसते, असतो तो भलामोठा आरसा. त्यात आपलं ‘ध्यान’ (व्यक्तिमत्त्व) पाहिल्यावर लाज वाटून, आपला फॉर्म फाडून समोरच्या कचरापेटीत टाकून खालच्या मानेनं आपण बाहेर येतो. आरशानं आपलं काम केलेलं असतं.

इतिहासात अल्लाउद्दिन खिलजीला सर्वांगसुंदर राजपूत राणी पद्मिनी हवी असते. पण त्याची वासनेनं बरबटलेली, वखवखलेली नजर पद्मिनीवर पडणं योग्य नसतं. पद्मिनी मिळाली नाही, तर एक मध्यमार्ग निघतो. अल्लाउद्दिननं आरशातील पद्मिनीच्या प्रतिबिंबाचं दर्शन घ्यायचं नि समाधान मानायचं. आरशाचा हा एक ऐतिहासिक प्रयोग नि उपयोग होता.

लमाणी या भटक्या जातीच्या स्त्रियांच्या अंगावरील कपड्याला लहान-लहान शेकडो आरसे बसवलेले असतात. त्यात एकाच वेळी एका व्यक्तीची असंख्य प्रतिबिंबे दिसतात. लहान मुलांना याची गंमत वाटते. आज अर्थात असे लमाणी अपवादानेच आढळतात. पण कपड्यात आरसे बसवण्याची (शिवण्याची) ही कला हे लमाणी लोकसंस्कृतीचं एक विशेष लक्षण आहे.

यावरून आठवलं ते ‘मुगल-ए-आझम’ या भव्य चित्रपटातील रूपसुंदरी मधुमालाचं ते अद्भुत दर्शन. रागावलेला अकबर बादशहा, अनारकलीच्या सौंदर्यानं वेडावलेला राजपुत्र सलीम, इतर दरबारी मंडळी नि सर्वांसमोर सुरू असलेलं अनारकलीचं अप्रतिम नृत्य आणि जोडीला ते अमर गीत ‘जब प्यार किया तो डरना क्या?’मध्येच एक अफलातून चित्र पडदाभर दिसतं. असंख्य आरसे नि प्रत्येक आरशात दिसणारं अनारकलीचं लोभस रूप नि विलोभनीय नृत्य. आरसेच आरसे पडदाभर नि अनारकलीची असंख्य थिरकती रूपं! एका अर्थानं हा आरशाचा सन्मानच होता. असो.

शेवटी एक मार्मिक कथा. एक प्रजाहितदक्ष राजा. त्याला त्याचा मित्रराजा एक शीशमहल (आरसेमहाल) बांधून देतो. या महालाच्या जमिनीवर, सर्व भिंतींवर, तक्तपोशीवर (सिलिंगवर) आरसे लावलेले होते. कुठंही पाहिलं तरी राजाला आपलीच अगणित रूपं दिसायची. राजा स्वतःच्याच एवढा प्रेमात पडला की त्या महालातून तो दरबारातसुद्धा येईना. राज्यकारभाराकडे दुर्लक्ष झाल्याने राज्याच्या सर्व क्षेत्रांत बेशिस्त व गैरव्यवस्था निर्माण झाली. हिंसा, गुन्हेगारी वाढली. आपल्या शिष्याचं म्हणजे राजाचं असं वागणं नि त्याचे परिणाम राजगुरूंच्या कानावर पडले. त्वरित निघून ते राजाकडे पोहोचले. वाटेत त्यांना भिकारी, चोर, गुंड, पीडित महिला यांचे दर्शन झाले होते. पण राजा बेफिकीर होता.

आत्ममग्न! राजगुरूंनी राजाला हाताला धरून त्या आरसेमहालातून बाहेर आणलं नि बाहेर असलेल्या पारदर्शक काचांतून (ग्लास) बाहेरची दृश्यं दाखवली. राजाला आपली चूक कळली. पश्‍चात्ताप झाला. स्वतःच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी तो आता आरसेमहालाबाहेर राहू लागला. राज्यातील लोक सुखी झाले. खरंच आहे आरशाचा झोत (फोकस) आपल्या स्वतःवर असतो (सेल्फीसारखा)! पण काचेतून दुसर्‍याकडे पाहणंही आवश्यक असतं. त्यांच्या सेवेसाठी, माणुसकीनं जगण्यासाठी!