आयुर्वेद घरोघरी

0
30
 • डॉ. मनाली महेश पवार

पणजी कला अकादमीमध्ये नववे जागतिक आयुर्वेद महासंमेलन दि. ८ ते ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनात जगभरातून वैद्यगण सहभागी होणार आहेत. असे हे जागतिक महासंमेलन गोव्याच्या पवित्र भूमीवर होत असल्याने जास्तीत जास्त गोमंतकीयांनी याचा लाभ घ्यावा व आयुर्वेदशास्त्राचे महत्त्व, उपयोगिता जाणून आपल्या ज्ञानात भर घालावी.

आयुर्वेद आणि योग या संकल्पना म्हणा किंवा शास्त्र सध्या जगभरात विकसित होत आहे. भारताबरोबर इतर देशांतही या शास्त्रांचे आचरण करण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. दरवर्षी वेगवेगळ्या रोगांची उत्पत्ती होत आहे व त्याचबरोबर त्या रोगांवर विविध औषधोपचारांचे संशोधन चालू आहे. विविध जीवघेणे रोग बळावत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण विश्‍वाला ‘आयुर्वेदशास्त्र’ हाच आधार वाटू लागला आहे. आयुर्वेदशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन पणजी कला अकादमीमध्ये नववे जागतिक आयुर्वेद महासंमेलन दि. ८ ते ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. वर्ल्ड आयुर्वेद फाऊंडेशन, आयुष मंत्रालय, सीसीआरएएस व गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हे जागतिक महासंमेलन होणार आहे. या महासंमेलनात जगभरातून वैद्यगण सहभागी होणार आहेत. असे हे जागतिक महासंमेलन गोव्याच्या पवित्र भूमीवर होत असल्याने जास्तीत जास्त गोमंतकीयांनी याचा लाभ घ्यावा व आयुर्वेदशास्त्राचे महत्त्व, उपयोगिता जाणून आपल्या ज्ञानात भर घालावी.

आयुर्वेदशास्त्राचे ज्ञान प्रत्येकाला घरोघरी असणे ही आजच्या काळाची गरज आहे. आयुर्वेदशास्त्र म्हणजे फक्त जडी-बुटी औषधे नव्हेत हे सर्वप्रथम प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेद म्हणजे पालापाचोळा, काढे, कडू औषधे नव्हे तर ते एक शास्त्र आहे. ‘आयु’ म्हणजे जीवन आणि ‘वेद’ म्हणजे ज्ञान. जीवनाचे ज्ञान जे शास्त्र देते त्याला ‘आयुर्वेदशास्त्र’ म्हणतात. एवढा व्यापक अर्थ ‘आयुर्वेद’ या शास्त्राचा आहे. हे शास्त्र फक्त आरोग्याचेच वैद्यकशास्त्र नव्हे तर ते जीवन जगण्याचे, जीवन सुखी करण्याचे, आनंदाने निरोगी दीर्घायुष्य जगण्याचे परिपूर्ण शास्त्र आहे.

मुळातच आजारपण येऊच नये हे आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट व काही कारणाने रोग झालाच तर त्यावर उपचार अशा प्रकारे करावे ज्या उपचाराने तो रोग बरा होतो, पण दुसरा उत्पन्न होत नाही. रोग आटोक्यात ठेवणे, फक्त रोगांची लक्षणे कमी करणे किंवा रोगामुळे होणारा त्रास कमी करणे हे आयुर्वेदशास्त्राला मान्य नाही. रोग दाबण्याचा प्रयत्न केलाच तर इतर अनेक रोग उत्पन्न होतात. त्यामुळे रोग समूळ नष्ट करण्याचा आयुर्वेदाचा कल असतो. मुळावर घाव घातला म्हणजे विकार, लक्षणे, त्रास सगळे शांत होते. ही औषधमात्रा शास्त्रशुद्ध पाठानुसार स्वच्छतेची, शुद्धतेची काळजी घेऊन बनवलेली असल्याने शंभर टक्के रोगावर कार्य करतात. ही औषधे सेवन करण्यापूर्वी त्यावर आवश्यक ते संस्कार करण्यात आयुर्वेदाने खूप महत्त्व दिले आहे. औषधांवर संस्कार केल्याने औषधे अधिक प्रभावी बनतात, सहजतेने घेता येतात, कमी मात्रेतही गुणकारी ठरतात, कोणत्याही दुष्परिणामांवाचून शरीरात अपेक्षित ठिकाणी आपला प्रभाव दाखवतात. आयुर्वेदाची औषधे ही मुख्यत्वे वनस्पतींपासून बनविलेली असतात. धातू, खनिजांचा वापर करतानाही वनस्पतींद्वारे त्यांच्या भावना देऊन, अगोदर शुद्ध करून रसकल्प, भस्मे तयार केली जातात. त्याशिवाय औषधांचा सर्वोत्तम गुण वनस्पतीच्या कोणत्या भागात (उदा. खोडात, पानात, मुळात इत्यादी) याचा विचार करून औषधे बनविली जातात. तसेच एखादे औषध (वनस्पती) कोणत्या ऋतूत गोळा करायचे किंवा तोडायचे यालाही खूप महत्त्व आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे.

एकच औषध सरसकट सर्वांना लागू पडेलच असंही कधी आयुर्वेदशास्त्राप्रमाणे होत नाही. त्याचप्रमाणे ‘अनुपान’ ही संकल्पना कोणत्याच शास्त्रात न सांगितलेली फक्त ‘आयुर्वेदशास्त्रा’तच वर्णिलेली आहे. काही औषधे मधातून घ्यावीत, काही तुपातून, काही गरम पाण्यातून, काही दुधातून, काही रसांतून तर काही काढ्यांतून इत्यादी. त्या-त्या अनुपानाबरोबर औषधांचा प्रयोग केला तरच ही औषधे योग्य तो परिणाम देतात. तसेच आयुर्वेदशास्त्रामध्ये औषध घेण्याच्या ‘काळाला’, वेळेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. सरसकट सगळी औषधे सकाळी, दुपारी, संध्याकाळी नाही घेता येत. काही औषधांची योजना जेवणानंतर लगेच, काही जेवणानंतर अर्ध्या तासाने, काही जेवण जेवताना मध्ये-मध्ये किंवा घासात, काही उपाशीपोटी, काही झोपताना अशा अनेकप्रकारे कोणता दोष धातू दूषित झाला आहे याचे विवरण करूनच औषधं सेवन करण्याची वेळ ठरविली जाते. उपचारांमध्ये औषध जसे शुद्ध हवे त्याचप्रमाणे ती व्यक्ती (रोगी) शास्त्राप्रती, वैद्याप्रती निष्ठा असणारी हवी. उपचाराचे हे चार आधारस्तंभ जितके भक्कम तितकेच सर्वोत्तम यश मिळते. हे चिकित्साचतुष्पाद फक्त आयुर्वेदातच वर्णन केले आहे.

औषधोपचार करताना कशाबरोबर करायचे, कोणत्या काळी करायचे याचा विचार तर करावा लागतोच, त्याचबरोबर कोणत्या मार्गाने करावे हेही आयुर्वेदात सांगितलेले आहे. संशोधन उपक्रमाने शरीरातील दूषित दोष शरीराबाहेर काढून टाकणे याला आयुर्वेदशास्त्र ‘पंचकर्म’ असे संबोधते. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करून औषध योजना केल्यास स्वास्थ्य लाभते. उदा. थेट आतड्यात औषध पोचवायचे असेल तर ते बस्तीमार्फत पोचवले जाते. मेंदूवर काम करताना नस्याची योजना करावी लागते. अधोगत व्याधीसाठी ‘विरेचन’ मलद्रवरूप बाहेर काढण्यासाठी योजना करावी. रक्त-पित्ताच्या काही आजारांमध्ये रक्तमोक्षणासारखे उपाय योजावे. वेदना व सुज कमी करायची असल्यास बाहेरून लेप लावावा लागतो. धातुपोषणासाठी औषधे दूध किंवा तूप-साखरेबरोबर घ्यावीत. श्‍वसनसंस्थेवरची औषधे मधाबरोबर, पचनावर काम करणारी औषधे जेवणाच्या आधी, नंतर किंवा मध्ये घ्यावीत इत्यादी बारीकसारीक, सूक्ष्म विचार औषधयोजना करताना आयुर्वेदशास्त्रात केलेला आढळतो.
औषधोपचारांपेक्षा खूप जास्त महत्त्व आयुर्वेदशास्त्रामध्ये आहार-विहार व सद्वृत्तपालनाला दिले आहे. कोणत्याच शास्त्रामध्ये सद्वृत्तपालनाचे वैशिष्ट्य रोगाचरण टाळण्यासाठी केलेले नाही. रोगांची उत्पत्ती वडीलधार्‍यांचा, गुरुजनांचा अनादर केल्याने होऊ शकते हे केवळ व केवळ आयुर्वेदशास्त्रामध्येच सांगितले आहे. अशाप्रकारची अनेक कारणे रोगोत्पत्ती घडवते व सद्वृत्तआचरणाने हे रोग बरे होऊ शकतात याचे वर्णनही केवळ आयुर्वेदशास्त्रातच आहे.

आज बदललेल्या जीवनशैलीत, धकाधकीच्या काळात, तणावग्रस्त जीवनात ‘आयुर्वेदशास्त्र’ हे एक वरदानच आहे. बदललेल्या आहारपद्धतीमुळे, सतत बदलणार्‍या नैसर्गिक हवामानामुळे, वातावरणामुळे, वेगवेगळ्या व्यवसाय पद्धतीमुळे नवनवीन आजारांची लागण, उत्पत्ती होत आहे व या सर्वांना उत्तर म्हणजे आयुर्वेदाची कास धरणे हेच होय! आयुर्वेद हे असे शास्त्र आहे ज्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले आचरण कसे हवे? आपण कधी उठावे- कधी झोपावे? काय खावे, काय नको? इत्यादी इत्यंभूत आचरण आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितले आहे. ‘दिनचर्या’ कशी असावी हे सांगितले आहे. आजच्या काळात ‘दिनचर्या’ तंतोतंत पाळायला जरी जमत नसली तरी काही नियम जे शक्य आहेत ते पाळायला काहीच हरकत नाही. दिनचर्येप्रमाणेच आयुर्वेदशास्त्रामध्ये ऋतुचर्येला महत्त्व दिले आहे. ऋतुचर्या म्हणजे सहाही ऋतूंमध्ये त्या-त्या ऋतूनुसार करावयाचे आचरण. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानुसार बाह्य जगतात जे जे बदल होत असतात त्यानुसार आपल्या शरीरातही सतत बदल होत असतात. याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अनुकूल परिणामांचा उपयोग स्वास्थ्यवर्धनासाठी व शरीरशक्ती वाढवण्यासाठी करता येऊ शकतो, तर प्रतिकूल परिणामांमुळे शरीराचे नुकसान न होता आरोग्य टिकविले जावे यासाठी प्रयत्न करता येतो. आहार-विहार व औषध या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रत्येक ऋतूनुसार आपल्या राहणीमानात, खाण्यापिण्यात, वागण्यात बदल केल्यास आपण आरोग्याचे उत्तम प्रकारे रक्षण करू शकतो.

औषधाला जोड म्हणून तर आहारयोजनेला पर्याय नसतोच, पण प्रसंगी औषधाला पर्याय म्हणूनही आहाराची (पथ्य) योजना करता येते. अन्नयोजना करताना केवळ चवीचा विचार न करता प्रकृतीला अनुकूल, प्रतिकूल काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदा. पित्तप्रवृत्ती असणार्‍यांनी निखट, चमचमीत खाऊ नये. तसेच अन्नावर योग्य तो संस्कार व्हावा. असे संस्कारित अन्न निसर्गचक्राला धरून योग्य वेळी सेवन करणे आरोग्यासाठी गरजेचे ठरते. कितीही चांगले संतुलित जरी अन्न असले तरी अजीर्ण असताना सेवन केले किंवा भलत्याच वेळी सेवन केले तर त्याने नुकसान हे होणारच. तेव्हा सूर्याच्या अनुषंगाने जीवनशैली आखावी.

 • सकाळी लवकर उठावे. ब्रह्ममुहूर्तावर उठणेच इष्ट आहे. किमान सकाळी ६ वाजण्यापूर्वी तरी आजच्या काळात सर्वांनीच उठावे.
 • सूर्य वर येण्यापूर्वी मल-मूत्र विसर्जन करावे.
 • कफाच्या काळात सूर्योदयानंतर सकाळी व्यायाम, प्राणायाम आदी क्रिया कराव्या. आज थोडासा का होईना व्यायाम, प्राणायम, ध्यान करण्याची कामाला जाणार्‍यांपासून शाळेत जाणार्‍या मुलांना अत्यंत गरज आहे.
 • रोज गरमागरम ताजा नाश्ता करणे हे चांगले आरोग्य टिकविण्याचे लक्षण आहे.
 • दुपारी एक ते दीडच्या सुमारास ज्यांना शक्य असेल त्यांनी दुपारचे जेवण घ्यावे. मुलांना हल्ली शाळेतून घरी येण्यास उशीर होतो म्हणून शाळेत जो माध्यान्ह आहार दिला जातो तो चांगल्या प्रतीचा असावा व मुलांनी तो सेवन करावा.
 • संध्याकाळी अरबट-चरबट खाण्यापेक्षा सूर्यास्तानंतर लवकर जेवावे.
 • रात्री अकराच्या आत झोपायला जावे.
  असा दिनक्रम आजच्या युगात ठेवल्यास तो आरोग्यास पूरक ठरेल व असे हे छोटे-छोटे बदल आपण नक्कीच करू शकतो.
 • रोजच्या दिनक्रमामध्ये जेव्हा सुट्टी असेल, वेळ असेल तेव्हा व्यायामासाठी जरा जास्त वेळ काढावा. त्यामध्ये अनुलोम-विलोम, दीर्घ श्‍वसन, सूर्यनमस्कार, पोहणे, योगासने करावीत.
 • ॐकार जप, प्राणायाम, ध्यान, नामस्मरणासारखे आध्यात्मिक उपाय हेही आजच्या काळात गरजेचे आहेत.
 • मानस रोग, बुद्धी-स्मृतीशी संबंधित रोगात आयुर्वेदामध्ये ध्यानाचा उल्लेख आढळतो. मुळात असे रोग होऊच नयेत, आत्मा, इंद्रिय, मन यांना प्रसन्नता यावी यासाठी ध्यानाचा समावेश रोजच्या दिनक्रमात करणे उत्तमच आहे.
  तसेच आयुर्वेदशास्त्रामध्ये जी आपण भावी पिढी घडवणार आहोत ती उत्तम, सुदृढ होण्यासाठी रसायन वाजीकरण प्रयोग, गर्भिणी परिचर्या तसेच प्रसूतीनंतर परिचर्या सांगितली आहे. त्यानुसार जर आचरण केले तर आज जे वंधत्वाचे प्रमाण वाढत आहे त्याला आळा बसेल. नैसर्गिक प्रसूती होण्याचे प्रमाण जे कमी झाले आहे तेही वाढेल. ‘सुवर्णप्राशन’सारखा बालकांच्या सर्वांगीण वाढीसाठी उपाय सांगितला आहे तो अगदी बालक जन्मल्यापासून ते साधारण बाळ दहा वर्षांचा होईपर्यंत करावा म्हणजे सुदृढ पिढी तयार होईल.

थोडक्यात सांगायचे म्हणजे, आयुर्वेद हे मनुष्य जीवनाचे ‘स्वास्थ्य’ टिकवण्याचे शास्त्र आहे. आपल्या शास्त्राचा आपण स्वीकार केला, त्याचे महत्त्व समजून त्याचा रोजच्या दिनक्रमात उपयोग केला तर आपल्याला निरोगी दीर्घायुष्य नक्कीच लाभेल.